राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर बारामतीतून टीका केली आहे. शरद पवार यांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या, या गोष्टीचा पुनरुच्चार केला तसंच पुलोदच्या सरकारचं उदाहरण देत शरद पवारांना धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणातूनच सवाल केले आहेत.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

“तुम्ही पुलोद सरकार स्थापन केलं, ते संस्कार आणि अजित पवार महायुतीबरोबर गेले तर ते गद्दार? शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या. शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला. ते सगळे संस्कार होते, आम्ही निर्णय घेतला तर आम्ही गद्दार? ही निवडणूक भाऊबंदकीची नाही. देशाचा पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान मोदी होतील की इतर कोण? हे ठरवण्याची ही निवडणूक आहे.” असं धनंजय मुंडे म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर या ठिकाणी राष्ट्रवादीचा युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात धनंजय मुंडे शरद पवारांवर टीका केली.

हे पण वाचा- “अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची?”, शरद पवारांना कुणी विचारला प्रश्न?

अजित पवारांचा विवाह १९८५ साली झाला. सुनेत्राताई पवारांची सून म्हणून १९८५ ला आल्या. त्या आधी १९७८ मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती. जबाबदारीने बोलतो. तुम्हीही इतिहास तपासा. १९८५ ला सुनेत्राताईंचे पाय बारामतीला लागले त्यानंतरच बारामतीचा विकास सुरू झाला हे विसरता कामा नये, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

आता कुटुंब का निवडलं?

देशातील प्रत्येक कॅमेऱ्यासमोर बोलतोय. प्रत्येकाला उत्तर देण्याची तयारी ठेवून बोलतो. ते म्हणतात (शरद पवार) दादांनी (अजित पवार) गद्दारी केली. दादा गद्दार आहे. आमच्यासारख्यांनी काही बोललं तर लगेच यांची लायकी आहे का?साहेबांच्या विरोधात बोलावं? होय, साहेब आमचं दैवत आहेत. आजही जाणते राजा आहेत. जाणता राजाला घर नसतं. पोरं नसतात. बाळ नसतं. संबंध कुटुंब त्यांचं घर असतं. रयत त्याचं घर असतं. रयत आणि कुटुंबात निवड करताना कुटुंब निवडायची वेळ का आली? असा सवाल त्यांनी शरद पवार यांना केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही केलं तर ते संस्कार, आम्ही केलं तर आम्ही गद्दार?

पुलोदचं सरकार स्थापन केलं तर संस्कार म्हणायचे आणि दादाने केलं तर गद्दारी म्हणायची. हे दादांनी एकट्याने केलं नाही. असंख्य जणांनी केलं. लोकशाहीचा निर्णय होता. २०१४ मध्ये जे केलं ते संस्कार आणि दादाने केलं गद्दारी आहे. २०१७ मध्ये गणेशचतुर्थीला एक बैठक झाली. कुठे? कशी बैठक झाली? दिल्लीला कुणाच्या घरी बैठक झाली? शिवसेनेला कसं बाजूला काढायचं हे कसं ठरलं? त्या बैठकीचे व्हिडीओ देऊ शकतो. तुम्ही केलं ते संस्कार आणि आम्ही केलं तर गद्दार? असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.