लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान हेत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाकडे देशवाशियांचे लक्ष लागले आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमध्ये लढत होत आहे. त्यामुळे ही निवडणूक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आज सकाळी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना बारामतीच्या निवडणुकीबाबत सूचक भाष्य केले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिले. त्या संविधानानुसार प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. मात्र, मतदान लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने व्हावे, अशी आमची इच्छा आहे”, असं त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून इन कॅमेरा मतदान प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली होती. यावरही त्यांनी भाष्य केले.

हेही वाचा : “मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजाने…”, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, “एका गृहिणीला…”

इन कॅमेरा मतदान घ्यावे असे का वाटले? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एक तर मला कशाचीच भिती वाटत नाही. मात्र, मला चुकीचं होण्याची काळजी आणि चिंता असते. जे मतदान होत असते ते पारदर्शकपणे व्हावे. बोर्डाची परीक्षा कशी असते? बोर्डाच्या परीक्षेत कोणीही कॉपी करून पास होऊ नये, यासाठी निरीक्षक असतात. या निवडणुकीत दबदबत्या काही चर्चा सातत्याने ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे मतदान पारदर्शकपणे व्हावे, यासाठी आम्ही ती इन कॅमेरा मतदान घेण्याची मागणी केली होती”, असे स्पष्टीकरण यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिले.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी भोर आणि वेल्हे येथील काही व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले आहेत. यामध्ये आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच अजित पवार गटाच्यावतीने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “काल रात्री भोर-वेल्हे आणि बारामतीमधून सारखे फोन येत होते. पण पोलिसांनी जे सत्य आणि पारदर्शक आहे त्याला न्याय द्यावा. आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलेला बँकेचा व्हिडीओ आहे. त्यामध्ये तो कधीचा आणि किती वाजताचा आहे. त्यामध्ये वेळ आहे”, असे त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक आयोगाकडे काय मगणी केली होती?

सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून बारामती लोकसभा मतदारसंघमधील काही संवेदनशील बूथ आहेत. त्यावर गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता खबरदारी म्हणून इन कॅमेरा मतदान प्रक्रिया राबवण्यात यावी, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. यामध्ये त्यांनी ३०० बूथपैकी १५३ बूथ संवेदनशील असल्याचे म्हटले होते.