देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असतानाच राष्ट्र्वादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या काळात अनेक लहान-मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा पक्ष सर्वप्रथम काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, अशी चर्चा राजकी वर्तुळात सुरू झाली आहे. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवारांनी ४ एप्रिल रोजी ती मुलाखत दिली होती आणि त्यावेळी मी तिथेच उपस्थित होतो. त्या पत्रकारांशी बोलताना शरद शरद पवार म्हणाले की अनेक छोटे प्रादेशिक पक्ष हे आगामी काळात काँग्रेसला सहकार्य करू शकतात किंवा काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीनही होऊ शकतात. त्यावर माझी टिप्पणी अशी आहे की हे सगळं ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर घडेल.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, जर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीला बहुमत मिळालं, देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार असेल तर एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होईल आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी अनेक छोटे पक्ष काँग्रेसबरोबर हातमिळवणी करतील. कदाचित त्यावेळी विलीनीकरणाचा प्रश्नदेखील निर्माण होईल किंवा तसा विचार होईल. मात्र हे सर्व लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे शरद पवारांच्या अंदाजात नक्कीच तथ्य आहे. फक्त ४ जूनच्या निकालात काय होतं ते आपल्याला पाहावं लागेल.

चव्हाण म्हणाले, दिल्लीत कोणाचं सरकार स्थापन होतंय त्यावर बरंच काही अवलंबून आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला की, सध्या कुठल्या पक्षाने काँग्रेसशी बातचीत केली आहे का? किंवा शरद पवारांनीच हे वक्तव्य केलं असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, असी चर्चा सुरू झाली आहे त्यावर काय सांगाल? या प्रश्नावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवारांची मुलाखत चालू असताना मुलाखतकारांनीदेखील हाच प्रश्न शरद पवारांना विचारला होता. त्यावर शरद पवार म्हणाले, काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फार मोठं वैचारिक अंतर नाहीये. काँग्रेस पक्षदेखील फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणारा पक्ष आहे. त्यामुळे आमच्यात वैचारिक अंतर नाही. तसेच ते म्हणाले, याबाबत (विलीनीकरण) मी माझ्या सहकाऱ्याशी चर्चा करेन. केव्हाही एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा सर्वच नेते आपापल्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी चर्चा करत असतात.

हे ही वाचा >> “मी मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, पंतप्रधान मोदींची रोखठोक भूमिका

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विलीनीकरणाबाबत बोलायचं झाल्यास लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये काय निकाल लागतो? पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतो? शरद पवारांच्या गटाला किती जागा मिळतात? काँग्रेसला किती जागा मिळतात? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.