लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान उद्या दि. १ जून रोजी होत आहे. त्याआधीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठं विधान केलं आहे. जर इंडिया आघाडीने या निवडणुकीत एनडीएचा पराभव केला तर पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना माझी पहिली पसंती असेल, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे. तसेच प्रियांका गांधी वाड्रा यांनी काँग्रेस कुटुंबाच्या पांरपरिक रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी आम्ही आग्रह धरला होता. मात्र त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला, असेही खरगे म्हणाले.
मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशात दौरा केला. तसेच निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राहुल गांधी यांनी न थांबता अविरत प्रचार केला. फक्त काँग्रेसच नाही तर आघाडीमधील पक्षांसाठीही त्यांनी प्रचार केला होता. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी हेच लोकप्रिय पर्याय असतील, असेही खरगे म्हणाले.
एनडीटीव्हीशी बोलताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, राहुल गांधी हे माझी पहिली पसंती असतील. ते युवकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मल्लिकार्जून खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांनी पंतप्रधानपदाबाबत थेट बोलणे टाळले होते. निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीची बैठक घेऊन त्यात आघाडीच्या प्रमुखाबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
दोनच दिवसांपूर्वी मल्लिकार्जून खरगे यांना पंतप्रधानपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. खरगे म्हणाले की, आघाडी असल्यामुळे आम्ही कुणाचेही नाव आतापासूनच जाहीर करू इच्छित नाही. निकालानंतर सर्वांबरोबर बैठक घेतल्यानंतर त्यातून आघाडीचा नेता कोण असेल? याचा निर्णय घेतला जाईल.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जून खरगे यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. यावर तुम्हीच पंतप्रधान होणार का? असा प्रश्न विचारला असता खरगे म्हणाले की, मी माझेच नाव कसे सुचवू शकतो? त्याचा निर्णय काँग्रेस पक्ष घेईल. आघाडीच्या पक्षांनी भलेही माझे नाव घेतले असेल, पण आमच्या पक्षात आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. २००४ आणि २००९ साली जी प्रक्रिया राबविली गेली, तीच यावेळीही राबविली जाईल.