Shivsena Uddhav Thackeray Maharashtra Assembly election 2024 : दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर सरकार स्थापन केलेलं असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी नव्याने पक्ष बांधण्यास सुरुवात केली. नवे साथीदार जोडले, नव्या लहान-मोठ्या पक्षांना बरोबर घेतलं. याच काळात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने वंचित बहुजन आघाडीबरोबर युती केली. तसेच २६ ऑगस्ट २०२२ रोजी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं (ठाकरे) हातमिळवणी केली होती. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची घोषणा केली होती. त्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समितीदेखील नेमण्यात आली होती. उद्धव ठाकरेंच्या पक्षाबरोबर असलेल्या युतीमुळे संभाजी ब्रिगेडने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षासह महाविकास आघाडीसाठी काम केल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे नेते करतात. मात्र, ही युती फार काळ टिकली नाही. आपण शिवसेनेबरोबरची (ठाकरे) युती तोडत असल्याचं संभाजी ब्रिगेडने आज जाहीर केलं.

दोन वर्षांपूर्वी झालेली संभाजी ब्रिगेड व ठाकरेंच्या शिवसेनेची युती तुटली असून संभाजी ब्रिगेड आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढू शकते. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी तसेच संकेत दिले आहेत. आखरे यांनी काही वेळापूर्वी झी २४ तासशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीला मदत केली होती. त्यानंतर विधानसभेत आम्ही तुम्हाला पाच ते सहा जागा देऊ असं मविआच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं होतं. या निवडणुकीसाठी आम्ही राज्यभर तयारी केली आहे. आम्ही विदर्भात तीन व मराठवाड्यात तीन जागांची मागणी केली आहे. मात्र आम्हाला एकही जागा मिळत नसेल तर आम्ही या आघाडीत का राहावं? भविष्यात आपल्या राज्याला पुढे न्यायचं असेल तर आमच्या चळवळीचा हातभार लागेल. परंतु, मविआमधील कोणत्याही घटकपक्षाला आमची अथवा आमच्या चळवळीची गरज नसेल तर आम्ही मविआतून बाहेर पडतो”.

हे ही वाचा >> Priyanka Gandhi : ‘मी ३५ वर्षे दुसऱ्यांसाठी मतं मागितली, पण पहिल्यांदाच स्वत:साठी…’, प्रियंका गांधींचं वायनाडकरांना भावनिक आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीत मतभेद? नाना पटोले म्हणाले…

“महाविकास आघाडीत चार ते पाच जागांवर मतभेद होते, जे आता मिटले आहेत”, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतंच केलं आहे. तसेच आता मविआत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असंही पटोले यांनी सांगितलं. पटोले यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “चार ते पाच जागांवर थोडी अडचण निर्माण झाली होती. मात्र, आम्ही काल सर्व पक्षांनी मिळून चर्चा केली व त्यावर तोडगा काढला आहे. उद्या आम्ही जागावाटप जाहीर करू.”