Nitin Gadkari Faints in Yavatmal Rally : केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना आज प्रचारसभेत अचानक भोवळ आली. यवतमाळ येथील पुसद येथे महायुतीची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करत असतानाच त्यांना व्यासपीठावर भोवळ आली.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ पुसद येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी २ वाजता नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सर्वांची भाषणे झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी सुधाकरराव नाईक यांच्या आठवणी सांगत शेतकऱ्यांना शेती फायद्यात कशी आणायची याचे सल्ले दिले. जवळपास १५ मिनिटे ते बोलत होते. भाषणाच्या अखेरीस त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मंचावरील व्यक्तीस कुलर आपल्याकडे करण्यास सांगितले. त्यावेळी पुढे बोलताना त्यांचा स्वर कापरा झाला. तरीही त्यांनी राजश्री पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन केले आणि हे आवाहन करत असतानाच त्यांचा तोल गेला. त्यांना पोडियमला धरून सावरण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक व मंचावरील इतरांनी धावत जावून त्यांना उलचून खुर्चीत बसविले. त्यानंतर गडकरी यांना तातडीने ग्रीन रूममध्ये नेण्यात येवून डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Congress Leader P N Patil
काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचं निधन, निष्ठावान शिलेदार काळाच्या पडद्याआड
Police Commissioner Amitesh Kumar porsche car crash
Pune Car Crash : अल्पवयीन नव्हे, आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवणार? आयुक्तांनी सांगितलं पोलिसांचं पुढचं नियोजन
hazaribagh sinha family haunts bjp loksabha
भाजपाला हजारीबागच्या ‘या’ कुटुंबाची भीती? कारण काय?
Murlidhar Mohol - Ravindra Dhangeka
Pune Accident : “दोन उद्ध्वस्त कुटुंबांचे अश्रू पुसायचे सोडून बिल्डरची बाजू घेताय?” धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना टोला
Pune accident accused in Rehabilitation Home
Pune Car Accident : १७ वर्षांच्या आरोपीची बालसुधारगृहात रवानगी, जामीन रद्द; बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय
Kissu Tiwari Arrested
२२ हत्या करणारा किस्सू तिवारी साधूच्या वेशात रामलल्लाच्या दर्शनाला गेला, पोलिसांनी केली अटक, नेमकं घडलं काय?
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Narendra Modi
‘खान मार्केट गँगला न्यायालयाची चपराक’, तृणमूलच्या काळातील ओबीसी दर्जा रद्द झाल्यानंतर मोदींची टीका

दरम्यान, त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. वैद्यकीय उपचारांनंतर त्यांची प्रकृती व्यवस्थित झाल्यावर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. देशात विकासाचे पर्व सुरू असून यामध्ये प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.

विदर्भात उन्हाचा प्रचंड तडाखा आहे. पुसदमध्ये तुलनेने अधिक ऊन आहे. गडकरी यांची सभा भर उन्हात ठेवण्यात आली होती. त्यातही सभा विलंबाने सुरू झाली. कापडी मंडप असल्याने उकाडा खूप होता. नितीन गडकरी यांचे भाषण रंगात आले असतानाच त्यांनी कुलर आपल्याकडे वळविण्याची सूचना केली तेव्हाच त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. तेथून दोन मिनिटांत ते बोलताना कोसळल्याने तारांबळ उडाली. या प्रकाराने सभास्थळी एकच खळबळ उडाली असून अनेकांनी गडकरींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सभास्थळी धाव घेतली.

सभेत काय म्हणाले नितीन गडकरी?

विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षांच्या काळात देशभरात रस्ते-महामार्ग तसेच शिक्षण, स्वास्थ्य व अन्य क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवल्या गेल्या. यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेलाही अनेक महत्वपूर्ण सुविधांचा लाभ घेता येत आहे. सातत्याने विकासाची ओढ असलेली यवतमाळ जिल्ह्यातील जनता यावेळीही सर्वांगीण विकासाचा विश्वास देणाऱ्या भाजप-महायुतीला विजयी करेल असा मला विश्वास आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरींनी पोस्ट

तसंच, “माझी प्रकृती आता बरी असून मी पुन्हा दुसऱ्या कार्यक्रमासाठी वरूड येथे जाण्यासाठी निघालो आहे. तुमच्या स्नेह आणि आशीर्वादासाठी धन्यवाद”, अशी एक्स पोस्ट नितीन गडकरी यांनी केली.

भरसभेत भोवळ येण्याचं ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नितीन गडकरी यांना अनेकदा भोवळ आलेली आहे.