देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून महाराष्ट्रातही जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत राज्यासह देशात असे काही मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघांवर देशभरातील लोकांचं लक्ष लागलं आहे. असाच एक मतदारसंघ म्हणजे बारामती. नेहमीच देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (एनसीपी शरदचंद्र पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार यांचं संपूर्ण कुटुंब या निवडणुकीसाठी प्रचारच्या मैदानात उतरलं आहे. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे गेल्या वर्षी (२०२३) जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि दोन गट तयार झाले. अजित पवार यांच्या गटाकडून बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवार गटाने बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भायजय असा सामना रंगणार आहे.

बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत स्वतः शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, शरद पवारांचे नातू रोहित पवार, अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार, रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार, अजित पवारांचे थोरले भाऊ श्रीनिवास पवार हे सर्वजण सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेते सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत आहेत.

दरम्यान, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई आणि अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या चुलत वहिनी सुनंदा पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. सुनंदा पवार म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या उमेदवाराकडे (सुप्रिया सुळे) मताधिक्य आहे. आमचा उमेदवार पुढे आहे यात कसलीही शंका नाही. मात्र सध्या गावात वेगळ्या गोष्टी चालू आहेत. गावात काही अनोळखी माणसं फिरत आहेत. ही माणसं वेगळ्या भाषे बोलताना दिसत आहेत. आम्हाला अंदाज आहे की, शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये बारामतीत धनशक्तीचा वापर होणार आहे. दडपशाहीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे मतदारांनी सजग राहावं.

हे ही वाचा >> “…म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”, राऊतांचा विशाल पाटलांना टोला; म्हणाले, “त्यांच्यामागे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले सत्ताधारी लोक तुरुंगातील कैद्यांना बाहेर काढतील. निवडणूक जिंकण्यासाठी या लोकांचा वापर केला जाईल. सुनंदा पवारांचा या गोष्टीकडे रोख होता का? ते अद्याप समजू शकलेलं नाही.