News Flash

Coronavirus: समजून घ्या सहजपणे : भारताने केले स्वत:ला ‘विलग-बंदिस्त’

भारत सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ११ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी जारी कलेले सर्व व्हिसा स्थगित केले आहेत

Coronavirus: समजून घ्या सहजपणे : भारताने केले स्वत:ला ‘विलग-बंदिस्त’
संग्रहित छायाचित्र

– सिद्धार्थ खांडेकर

जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूच्या साथीला जागतिक साथ असे संबोधल्यानंतर भारत सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ११ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी जारी कलेले सर्व व्हिसा स्थगित करण्यात आले आहेत. ही स्थगिती १३ मार्च, शुक्रवारपासून लागू होईल.

पार्श्वभूमी
करोना विषाणूचा फैलाव जगभर होत असून भारतही त्याला अपवाद नाही. गुरुवारी, १२ मार्च सायंकाळपर्यंत भारतात ७३ जणांना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. भारतातील फैलाव रोखण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या उपायांचा एक भाग म्हणून, परदेशी पर्यटकांच्या आगमनावर निर्बंध घालण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. हा प्रस्ताव मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिवांच्या समितीने मंत्रिगटाकडे सादर केला. या मंत्रिगटामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (अध्यक्ष), परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, नागरी विमानवाहतूक मंत्री हरदीप पुरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, जहाजबांधणी मंत्री मनसुख मंदाविया, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांचा समावेश होता. ११ मार्च रोजी या मंत्रिगटाची बैठक होऊन, त्यात पर्यटक व इतर व्हिसा पुढील १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कुणाचे व्हिसा स्थगित होणार?
राजनैतिक अधिकारी, मुत्सद्दी, संयुक्त राष्ट्रे किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय संघटनांचे अधिकारी, नोकरी किंवा विशिष्ट प्रकल्पांसाठीचे १३ मार्चपूर्वी जारी केलेले व्हिसा वगळता इतर सर्व प्रकारचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहेत. ही स्थगिती १३ मार्चपासून मध्यरात्री १२ ग्रीनविच मध्यवर्ती वेळेनुसार लागू होईल. परदेशी नागरिकांच्या त्या-त्या विमानतळांपासून ही वेळ ग्राह्य धरली जाईल. त्याचबरोबर, परदेशस्थ भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी (ओसीआय) भारतात फिरण्यासाठी जारी केलेली मोफत प्रवास सुविधाही १५ एप्रिलपर्यंत स्थगित राहील. या स्थगितीचा आरंभबिंदू १३ मार्च मध्यरात्री १२ वाजता ग्रीनविच मध्यवर्ती वेळेनुसार लागू होईल. (ग्रीनविच मध्यवर्ती वेळेनुसार मध्यरात्री 12 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचपासून).

भारतात १३ मार्चपूर्वीपासून असलेल्या परदेशी नागरिकांच्या व्हिसात कोणताही फरक पडणार नाही. त्यांना व्हिसा मुदतवाढ हवी असल्यास भारतातच संबंधित कार्यालयांकडे संपर्क साधता येईल. एखाद्या परदेशी नागरिकास भारतात येणे अत्यावश्यक बनल्यास (उदा. वैद्यकीय कारणास्तव), त्या देशातील भारतीय दूतावास किंवा कचेरीशी संपर्क साधणे बंधनकारक आहे.

भारतात परतणाऱ्या भारतीय नागरिकांचे काय?
त्यांना काही अटींचे पालन करावे लागेल. महत्त्वाच्या कारणासाठी भारतात येणारे परदेशी नागरिक आणि भारतात परतणारे भारतीय नागरिक हे १५ फेब्रुवारी रोजी किंवा नंतर चीन, द. कोरिया, इराण, इटली, फ्रान्स, जर्मनी किंवा स्पेन या देशांत गेलेले असतील, तर त्यांचे १४ दिवस अनिवार्य विलगीकरण केले जाईल. उपरोल्लेखित देशांतून ते थेट येत असल्यास, करोनाचा संसर्ग झालेला नाही असे प्रमाणपत्र त्यांना सादर करावे लागेल. त्यानंतरही विलगीकरण होईलच. विलगीकरणाचा निर्णय विमानतळावरील वैद्यकीय पथके घेतील आणि त्यावर अंमलबजावणी बंधनकारक आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्ग आणि जमिनीवरील आंतरराष्ट्रीय सीमांद्वारे भारतात येणाऱ्यांसाठीही हाच नियम लागू राहील.

या नव्या नियमांचा परिणाम काय होईल?
आयपीएलला येणाऱ्या परदेशी क्रिकेटपटूंवर परिणाम होऊ शकतो. कारण याच काळात ही मंडळी भारतात येऊ लागतील. पण त्यांचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा कसा मानायचा, हा प्रश्न आहे. भारतातील इतर काही स्पर्धा, परिषदांवरही परिणाम होऊ शकतो.

आर्थिक आघाडीवरील नुकसान मोजदाद न करण्यासारखे आहे. विमान कंपन्या, पर्यटन कंपन्या, येथील हॉटेले, रेस्तराँ यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. आयपीएल स्पर्धा काही शहरांमध्ये होईल. त्यांसाठीचे हॉटेल बुकिंग आगाऊ झालेले असेल. ते रद्द होण्याची भीती आहे. विलगीकरणाच्या या मोहिमेमध्ये भारताने स्वतःवरही निर्बंध घालून घेतले आहेतच. सर्व मंत्र्यांचे आगामी काळातील परदेश दौरे रद्द झालेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 11:11 am

Web Title: coronavirus india has separated itself from the entire world sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 समजून घ्या सहजपणे : जागतिक साथ (pandemic) म्हणजे काय?
2 समजून घ्या सहजपणे : ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर कोण ?
3 समजून घ्या सहजपणे : खनिज तेलाच्या किमती का कोसळत आहेत? भारताला यातून काही लाभ होईल?
Just Now!
X