आयपीएलच्या इतिहासात गुणतालिकेत तळाशी राहण्याची चेन्नईच्या संघावर ही पहिल्यांदाच वेळ आली आहे. आतापर्यंत प्रत्येक हंगामात धोनीच्या चेन्नई संघानं वर्चस्व राखलं आहे. धोनीनं चेन्नईला तीन वेळा चषक जिंकून दिलाय तर प्रत्येक हंगामात प्ले ऑफमध्ये खेळला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघामध्ये सीएसके अव्वल स्थानावर आहे. मात्र, आयपीएलच्या १३ व्या हंगामात सीएसके तळाशी का राहिला? आतापर्यंत १० सामन्यात धोनीला सात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे धोनीचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. धोनी आणि सीएसकेच्या चाहत्यांना हा यक्षप्रश्न सतावत असेल. सीएसके अपयशी होण्यामागची कारणं काय असावीत?? याचा घेतलेला हा आढावा…

रैनाची माघार-
IPL चा तेरावा हंगाम चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी फारसा चांगला गेलेला नाही. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी रैना-हरभजन यांनी घेतलेली माघार त्यानंतर संघातील खेळाडूंना झालेली करोनाची लागण, प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापती, धोनीचे निर्णय आणि धोनीचं फॉर्मात नसलं या सर्वांचा संघाला चांगलाच फटका बसला आहे. आतापर्यंत रैनानं एकहाती अनेक सामने जिंकून दिले आहेत. रैनाच्या अनुपस्थित सीएसकेची मधली फळी कुमकुवत वाटतेय.

धोनीचं कुमकुवत नेतृत्व –
कॅप्टन कूल एम.एस. धोनी जगातील सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक म्हणून ओळखला जातो. आपल्या चतूर निर्णयामुळे त्यानं अनेकदा संघाला विजय मिळवून दिलाय. पण या हंगामात धोनीच्या कुमकुवत नेतृत्वाचा फटका सीएसकेला बसल्याचं दिसतेय. संघ निवड करताना घेतलेले निर्णय, फलंदाजीचा क्रम, अपयशी ठरत असतानाही केदार जाधव, चावला, कर्ण शर्मा यांना दिलेली संधी तसेच युवा खेळांडूवर न दाखवलेला विश्वास अशे अनेक निर्णय घेतना धोनी चुकल्यासारखं वाटतेय. आयपीएलच्या १० सामन्यानंतरही सीएसकेला संघातील समतोल साधता आला नाही.

फलंदाजीतील अपयश –
फॅफ ड्युप्लेसिस वगळता एकाही फलंदाजाला छाप सोडता आली नाही. वॅटसन आणि रायडू यांच्या ठरावीक सामने वगळता त्यांनाही फलंदाजीत सातत्य राखता आलं नाही. रविंद्र जाडेजानं अखेरच्या षटकात येऊन चेन्नईला काही सामन्यात सन्माजनक धावसंख्या उभारुन दिली. मात्र, केदार जाधव आणि धोनी यांना फलंदाजीत आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. धोनीला दहा सामन्यात फक्त १६४ धावाच करता आल्या. एकेकाळी षटकारांचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने य हंगामात फक्त सहा षटकार लगावले आहेत.

धोनीला तरुण खेळाडूतील स्पार्क दिसलाच नाही –
संघातील दिग्गज खेळाडू अपयशी ठरत असतानाही धोनीनं युवा खेळाडूंना संधी दिली नाही. एन जगदिशन आणि गायकवाड यांना संधी मिळाली. पण जगदिशनने आपला स्पार्क दाखवूनही धोनीनं त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. गायकवाड वरच्या फळीतील फलंदाज असताना त्याला फिनशरची भूमिका दिली. पहिल्याच आयपीएलमध्ये दबावात फलंदाजी करताना गायकवाडला अपयश आलं. केएम आसिफ भारताचा वेगवान गोलंदाज आहे. २७ वर्षीय आसिफ 140 किमी प्रतिघंटा वेगानं गोलंदाजी करतो. परंतु, धोनीनं आसिफला अद्याप संधी दिली नाही. शिवाय.. जाडेजा, चावला आणि कर्ण शर्मा अपयशी ठरत असताना युवा साई किशोरला संघात स्थान दिलं नाही. सैयद मुश्ताक अली ट्राफीमध्ये साई किशोर सर्वात विकेट घेणारा गोलंदाज आहे. तसेच साई किशोर पावरप्लेमध्ये गोलंदाजी करण्यासह तरबेज आहे. युवा खेळाडूंवर विश्वास न दाखवणं धोनी आणि सीएसके संघाला महागात पडलेय.

इम्रान ताहिर आणि मिशेल सँटनरला संधी नाहीच –
गेल्या हंगामात सीएसकेकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या इम्रान ताहिरला धोनीनं अद्याप एकाही सामन्यात संधी दिली आहे. शिवाय न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिशेल सेंटनरलाही धोनीनं संघात स्थान दिलं नाही. मिशेल सँटनर मधल्या फळीत चेन्नईला बळकटी देऊ शकतो. शिवाय उत्तम फिरकी गोलंदाजीही करु शकतो. लुंगी एंगिडीने सुरुवातीच्या काही सामन्यात धारधार गोलंदाजी केली. त्यानंतरही त्याला धोनीनं बाहेरचा रस्ता दाखवला.

ताकदच बनली संघाची कुमकुवत बाजू –
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा युएईत भरवण्यात आली. येथील उष्ण वातावरणात धोनीच्या संघाला लौकीकास साजेशी कामगिरी करता आली नाही. धोनीच्या संघ सर्वात वयोवृद्ध संघ म्हणून ओळखला जातो. अनुभव ही या संघाी ताकद म्हटली जात होती. मात्र, युएईमधील उष्ण वातावरणात खेळाडूंना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. धोनी आणि इतर खेळाडू मैदानावर अनेकदा धापा भरताना दिसले. एकप्रकारे संघाची ताकदच कुमकुवत बाजू ठरली.

एक पराभव आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात –
IPL चा तेरावा हंगाम चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी फारसा चांगला गेलेला नाही. स्पर्धेतील एक पराभव चेन्नईच्या संघाचं आव्हान संपुष्टात आणू शकतो. चेन्नईच्या संघाने आतापर्यंत दहा सामन्यात फक्त तीन विजय मिळवले आहेत. उर्वरीत चारही सामन्यात चेन्नईच्या संघाला मोठ्या फरकानं विजय आवशक आहेत.