-हृषिकेश देशपांडे

हिमाचल प्रदेशपाठोपाठ गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने लढत तिरंगी केली आहे. नेहमीच्या भाजप विरुद्ध काँग्रेस अशा पारंपरिक दुरंगी लढतीत यंदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आपने अस्तित्व दाखवून दिले आहे. तो किती जागा जिंकेल हा मुद्दा वेगळा. मात्र त्या पक्षाने आपल्या प्रचाराने चर्चेत राहण्यात यश मिळवले हे नक्की. हरयाणातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल दोनच दिवसांपूर्वी जाहीर झाले. आम आदमी पक्षाने १५ जागा जिंकत राज्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. त्यामुळे राज्याराज्यांतील चित्र पाहता आता राष्ट्रीय पातळीवर आप हा एक पर्याय म्हणून ठळकपणे पुढे येत आहे.

election
प्रचाराची सांगता; लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या मतदान
narendra modi
“जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, राज्याला लवकरच…”, पंतप्रधान मोदींच्या तीन मोठ्या घोषणा
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
Kerala bjp campaign
केरळमध्ये तिसरा पर्याय निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न

भाजपला फटका

हरयाणात २०२४मध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. राज्यातील २२ जिल्हा परिषद तसेच १४३ पंचायत समित्यांच्या या निकालात सत्ताधारी भाजपला कमळ या त्यांच्या चिन्हावर केवळ २२ जागा जिंकता आल्या, अर्थात भाजपने पक्ष चिन्हावर १०२ जागा लढविल्या होत्या. पक्षाने पाठिंबा दिलेले दीडशेवर उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे. पंचकुला जिल्ह्यात सर्व दहा जागांवर भाजपचा पराभव झाला. सिरसामध्येही पक्षाला खाते उघडला आले नाही. भाजप खासदार व पंचकुला निवडणूक प्रभारी नायब सैनी यांच्या पत्नीचा पराभव झाला. अंबाला जिल्ह्यातही भाजपला १५ पैकी केवळ २ जागा जिंकता आल्या. महागाई, बेरोजगारी, ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता तसेच गुन्हेगारी हे काही प्रमुख मुद्दे प्रचारात होते. ग्रामीण भागातील हा कल पाहता आगामी २०२४ विधानसभा निवडणूक राज्यातील सत्ताधारी भाजपसाठी आव्हानात्मक आहे. राज्यात गेली आठ वर्षे भाजप सत्तेत आहे.

`आपʼ दुसऱ्या स्थानी

आम आदमी पक्षाने त्यांच्या झाडू या पक्ष चिन्हावर ११५ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १५ जागा जिंकत ते दुसऱ्या स्थानी आले. तर ओमप्रकाश चौताला यांचा लोकदल हा पक्ष तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यांना १३ जागा जिंकता आल्या. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाने पाठिंबा दिलेले ७० उमेदवार विजयी झाल्याचा दावा केला आहे. चौताला यांचा पक्ष राज्यात भाजपबरोबर सत्तेत आहे. ग्रामीण मतदारांनी आपला दिलेली साथ प्रस्थापित पक्षांना धडकी भरवणारी आहे. प्रचारतंत्राद्वारे आप हे लक्ष वेधून घेते. आता थेट जिल्हा परिषदांमध्ये जागा मिळवणे ही मोठी गोष्ट आहे. त्या दृष्टीने आपने राज्यात स्थान निर्माण केले आहे.

काँग्रेसची कामगिरी गुलदस्त्यात

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पक्ष चिन्हावर निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे प्रत्येक पक्षाप्रमाणे काँग्रेसनेही विजयी झालेल्या अपक्षांमध्ये आमचेच समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत असा दावा केला आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती अध्यक्षांच्या निवडीनंतरच चित्र स्पष्ट होईल. मात्र काही दिवसांपूर्वी आदमपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. ती भाजपने जिंकली होती. त्यामुळे काँग्रेसची स्थिती उत्तम आहे हे मानता येणार नाही. पक्षात गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. सातत्याने पराभव होत आहे. त्यामुळे पंजाबपाठोपाठ शेजारच्या हरयाणातही काँग्रेससाठी कामगिरी सुधारणे आव्हानात्मक आहे. ग्रामीण भागातील हे निकाल पाहता राज्यातील सत्ताधारी भाजप तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष तसेच लोकदल आणि जननायक जनता पक्ष या दोन स्थानिक पक्षांच्या संघर्षात आपचीही भर पडली आहे.

राष्ट्रीय स्तरावर पर्याय

दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्तेत आल्यानंतर आम आदमी पक्ष भाजपला पर्याय म्हणून वातावरणनिर्मिती करत आहे. अर्थात त्या पक्षाचे देशव्यापी संघटन नाही. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकीत एक पर्याय म्हणून वातावरणनिर्मिती करण्यात आम आदमी पक्षाला यश आले आहे. जागा किती जिंकतील हा मुद्दा वेगळा; पण दोन पक्षांच्या लढाईत यंदा तिसऱ्याची दखल घ्यावी लागली. हिमाचल असो वा गुजरात, आपने जर काही जागा जिंकल्या तर त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याची संधी तर आहेच, पण राष्ट्रीय स्तरावर पर्याय म्हणून पुढे येईल. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी चार राज्यांमध्ये राज्यपक्ष म्हणून दर्जा त्यासाठी सहा टक्के मते आणि विधानसभेत किमान दोन जागा मिळणे गरजेचे आहे. आप दिल्ली, पंजाबमध्ये सत्तेत आहेत. गोव्यात त्यांचे २ आमदार आहेत. त्यामुळे गुजरातच्या कामगिरीवर त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. त्यातून आता २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांच्या ऐक्याच्या चर्चेत आम आदमी पक्ष केंद्रस्थानी राहील.