scorecardresearch

विश्लेषण : धरसोड वृत्तीमुळे नितीशकुमार यांचा राजकीय फायदा की तोटा?

राजकीय क्षेत्रात कोलांटउड्या मारण्याचा नितीशकुमार यांनी परंपराच पाडली आहे. अशा त्यांच्या या राजकीय खेळीमुळे त्यांच्या विश्वासाहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.

विश्लेषण : धरसोड वृत्तीमुळे नितीशकुमार यांचा राजकीय फायदा की तोटा?
धरसोड वृत्तीमुळे नितीशकुमार यांचा राजकीय फायदा की तोटा?

संतोष प्रधान

नितीशकुमार यांनी भाजपबरोबर काडीमोड घेत पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद पदरी पाडून घेतले. पाचच वर्षांपूर्वी लालूंच्या पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. राजकीय क्षेत्रात कोलांटउड्या मारण्याचा नितीशकुमार यांनी परंपराच पाडली आहे. अशा त्यांच्या या राजकीय खेळीमुळे त्यांच्या विश्वासाहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता असूनही त्यांच्या अशा या खेळीमुळे नितीशकुमारे यांचे नेतृत्व बिहारच्या बाहेर प्रस्थापित होऊ शकलेले नाही.

नितीशकुमार यांनी आतापर्यंत किती वेळा भूमिका व आघाड्या बदलल्या?

१९९४ – नितीशकुमार यांनी मूळ जनता दलातून बाहेर पडून जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर समता पार्टीची स्थापना केली होती. पुढे समता पार्टीने भाजपबरोबर युती केली. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये जॉर्ज आणि नितीशकुमार हे दोघेही मंत्री झाले. नितीशकुमार हे तेव्हा रेल्वेमंत्री होते

२००३ : लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केल्यावर नितीशकुमार यांनी समता पार्टी जनता दलात विलीन करून या पक्षाचे नाव जनता दल (युनायटेड) असे केले.

२०१३ : भाजपने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करताच नितीशकुमार यांनी भाजपबरोबरील युती तोडली. गुजरात दंगलीचा डाग असलेल्या मोदी यांच्याबरोबर जाण्यापेक्षा आपली निधर्मवादी प्रतिमा जपण्यावर नितीश यांनी भर दिला होता.

२०१७ : २०१५ मध्ये बिहार विधानसभेत नितीशकुमार-लालू- काँग्रेस या महागठबंधन आघाडीला बहुमत मिळाले. नितीशकुमार मुख्यमंत्री तर लालूपूत्र उपमुख्यमंत्री झाले. पण भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल- काँग्रेस महागठबंधन आघाडीबरोबर संबंध संपुष्टात आणले. लगेचच भाजपबरोबर हातमिळवणी केली. भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले.

२०२२ : भाजपकडून जनता दल (यू) पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत नितीशकुमार यांनी भाजपशी साथ सोडत पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस महागठबंधनचा प्रयोग केला. आघाडी करून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले.

धरसोड वृत्तीमुळे नितीशकुमार यांच्या कारकिर्दीवर परिणाम होतो का?

कधी भाजप, कधी लालूप्रसाद यादव यांचा पक्ष यांच्याशी सलगी करून मुख्यमंत्रीपद कायम ठेवले तरी यातून नितीशकुमार यांच्या राजकीय विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. वास्तविक २०१५ नंतर आगामी म्हणजे २०१९च्या निवडणुकीत मोदी यांना स्पर्धक किंवा पंतप्रधापदाचा चेहरा म्हणून नितीशकुमार यांच्याकडे बघितले जात होते. सर्व विरोधी पक्षांना मान्य होणारा नितीश यांचा चेहरा होता. परंतु नितीशकुमार यांनीच भाजपशी युती केली. परिणामी विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून नितीश स्पर्धेतून बाद झाले. आता पुन्हा २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांना स्पर्धक म्हणून नितीशकुमार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. काँग्रेस कमकुवत असून, राहुल गांधी यांचे नेतृत्व अन्य समविचारी पक्षांना मान्य होत नाही. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाबाबत मर्यादा आहेत. शरद पवार यांना काँग्रेसची साथ लाभणे कठीण आहे. तेलंगणाचे चंद्रशेखर राव यांची महत्त्वाकांक्षा वाढली असली तरी त्यांना कोणाचाच पाठिंबा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत नितीशकुमार यांचे नेतृत्व सर्वमान्य होऊ शकते. पण पुन्हा विश्वासाहर्तेचा प्रश्न येतो.

“…म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली”, बिहारमधील राजकीय भूकंपानंतर सुशील मोदींचा मोठा खुलासा

नितीशकुमार यांनी साथ सोडल्याने भाजपवर काही परिणाम होऊ शकतो का?

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजप-नितीशकुमार आणि पासवान यांच्या पक्षाने ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. लोकसभेतील विजयाचा मार्ग हा उत्तर प्रदेश आणि बिहारमधून सुकर होत असतो. गेल्या वेळी उत्तर प्रदेश व बिहारमधील १२० पैकी १०१ जागा भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या होत्या. नितीशकुमार- राष्ट्रीय जनता दल आघाडीमुळे यादव, कुर्मी व अन्य दुर्बल घटकांची मते एकत्रित होतात. त्याचा भाजपला फटका बसू शकतो. नितीशकुमार कुर्मी व अन्य दुर्बल घटकांची काही प्रमाणात तरी मते भाजपपासून दूर जाऊ शकतात. त्याचा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bihar cm nitish kumar benefit alliance with rjd bjp politics news print exp pmw