उत्तर भारतात भाजपविरोधकांना फटका बसत असताना, झारखंडमध्ये इंडिया आघाडीने सत्ता राखण्यात यश मिळवले. शेजारच्या बिहारमध्ये पोटनिवडणुकीत भाजप व मित्रपक्षांना यश मिळाले तरी झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा दारुण पराभव झाला. झारखंड मुक्ती मोर्चाने पुन्हा सत्तेत येण्याची किमया करून दाखविली. इतकेच नव्हे तर, गेल्या वेळच्या तुलनेत ९ टक्के (यंदा मते २३.४ टक्के ) इतकी घसघशीत वाढ मतांमध्ये केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन व त्यांच्या पत्नी कल्पना हेच विजयाचे शिल्पकार आहेत. भाजपने सत्तेत येण्यासाठी राज्यात सारी ताकद लावली होती, मात्र अपयशाने प्रदेशस्तरावरील त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.

सहानुभूतीचा लाभ

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हेमंत सोरेन हे तुरुंगात होते. त्याची सहानुभूती मोठ्या प्रमाणात सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाला मिळाली. त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली असा संदेश मतदारांमध्ये गेला. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. हेमंत सोरेन पाच महिने कारागृहात असताना, पत्नी कल्पना यांनी राज्यभर झंझावाती सभा घेतल्या होत्या. निवडणुकीच्या आसपास हेमंत व कल्पना यांनी राज्यभर दोनशेहून अधिक सभा घेतल्या. त्यातच सरकारच्या काही योजना निर्णायक ठरल्या. त्यात १८ ते ५० वयोगटातील महिलांना प्रति महिना एक हजार रुपये आर्थिक लाभ देणारी ‘मैय्या सन्मान योजना’ यामुळे पक्षाला विजय मिळाला. याखेरीज ४० लाख कुटुंबांना वीज थकबाकी माफी, ४० लाख नागरिकांना एक हजारांचे निवृत्तिवेतन या थेट लाभ देणाऱ्या योजनांमुळे मतदार पक्षाशी जोडला गेला. विशेष म्हणजे यंदा झारखंड मुक्ती मोर्चाची राज्य स्थापनेपासूनची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांनी लढविलेल्या ४३ जागांपैकी ३४ ठिकाणी यश मिळवले. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक व हेमंत यांचे वडील शिबू सोरेन यांनाही अशी कामगिरी करता आली नव्हती.

हेही वाचा >>> ‘Walking pneumonia’ काय आहे? जाणून घ्या या गंभीर आजाराची लक्षणे अन् उपाय…

भाजपचे धोरण फसले

बांगलादेशातून घुसखोर येत असून, राज्यातील लोकसंख्येत बदल झाल्याचा आरोप भाजपने सातत्याने प्रचारात केला होता. यातून आदिवासींची जमीन आणि नोकऱ्या धोक्यात येतील असा दावा भाजपने केला होता. मात्र शेजारील देशाशी झारखंडची सीमा येत नसताना हा आरोप मतदारांना विश्वासार्ह वाटला नाही हे निकालातून स्पष्ट झाले. कारण सीमेवरील सुरक्षा हा केंद्राचा विषय आहे, असे प्रत्युत्तर झारखंड मुक्ती मोर्चाकडून प्रचारात देण्यात आले. याउलट आदिवासी अस्मिता भाजपच्या नेतृत्वात धोक्यात येईल असा प्रचार हेमंत सोरेन यांनी केला. राज्यात २७ टक्के आदिवासी मतदार आहेत. आदिवासींसाठी राखीव असलेल्या २७ जागांपैकी एक जागा चंपई सोरेन यांच्या रूपाने भाजपला जिंकला आली. चंपई हे झारखंड मुक्ती मोर्चातून आले आहेत. मात्र ते पक्षात आल्याने त्यांना कोल्हन पट्ट्यात भाजपला यश मिळवून देता आले नाही. एकूणच आदिवासी पट्ट्यातच फटका बसल्यानंतर राज्यात सत्तेत येणे भाजप अशक्यच होते. भाजपला राज्यात सर्वाधिक ३३ टक्के मते मिळाली असली तरी शहरी भागात भाजपला मोठे यश मिळाले नाही. त्यामुळे पक्षाची कामगिरी खालावली.

नेतृत्व बदल?

राज्यात भाजप हा बाबुलाल मरांडी, अर्जुन मुंडा या जुन्या आदिवासी नेत्यांवर अवलंबून आहे. मात्र त्यांचा जनतेशी थेट संपर्क किती, असा प्रश्न आता पक्षातून विचारला जाऊ लागला आहे. अर्जुन मुंडा हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. तर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी मीरा या आदिवासींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून पराभूत झाल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले बाबुलाल मरांडी हे धनवर या खुल्या जागेवरून निवडणूक लढले. या निकालानंतर पुन्हा नवे नेतृत्व आणले जाईल अशी शक्यता आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक असलेले माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन हे काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये आले. मात्र त्यांची नेमकी भूमिका प्रचारात स्पष्ट झाली नाही. त्यांचे मताधिक्यही कमी झाले आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ या घोषणा आदिवासीबहुल भागात फारशा चालल्या नाहीत. सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करण्यात विरोधी पक्ष म्हणून भाजप अपयशी ठरला.

हेही वाचा >>> देश संकटात आणि राजाच्या राज्याभिषेकावर दौलतजादा; नागरिकांची आगपाखड

नव्या पक्षाचा उदय

झारखंडमध्ये कुडमी समुदाय (ओबीसी) हा ८ ते १० टक्के आहे. झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे प्रमुख जयराम महातो यांचा विजय हा त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या पक्षाने जरी एक जागा जिंकली असली तरी १४ जागांवरील निकाल फिरवला. भाजपचा मित्रपक्ष असलेला एजेएसयू हा कुडमी समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करतो. मात्र त्यांना एक जागा तीदेखील २३१ मतांनी जिंकता आली. त्यामुळे भविष्यात कुडमी मतांच्या दृष्टीने झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चा महत्त्वाचा ठरेल असे वाटते. झारखंड हा बिहारच्या विभाजनानंतर २००० मध्ये अस्तित्वात आले. मात्र येथे बिहारमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. यावेळी इंडिया आघाडीतून निवडणूक लढवत त्यांनी सहापैकी चार जागा जिंकल्या. तर झारखंड मुक्ती मोर्चाचा प्रमुख मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने आपल्या १६ जागांचे बळ कायम ठेवले. भाजप २५ वरून २१ वर खाली आला. हेमंत सोरेन यांच्या करिष्म्यापुढे भाजप फिका पडला असेच म्हणावे लागते. पुन्हा सत्तेत आल्याने विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतही त्यांचे महत्त्व वाढले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

hrishikesh.deshpande@expressindia.com