Cancer Symptoms in Marathi : कर्करोगाची वाढती गंभीरता लक्षात घेता त्यावर उपचार व संशोधनाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्करोग उपचार सेवांचा बहुपातळी विस्तार आणि पायाभूत सुविधा उभारणीस मंजुरी देण्यात आली. फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात कर्करोग उपचार सेवांचे व्यापक जाळे आणि अधिक सक्षम आरोग्यसेवा प्रणाली निर्माण होणार आहे. यानिमित्ताने कॅन्सरचा धोका कसा ओळखता येईल? त्याची सुरुवातीची १० लक्षणे कोणती? या संदर्भात घेतलेला हा आढावा…

कर्करोगाचे वाढते प्रमाण हे आरोग्य व्यवस्थेसाठी एक आव्हान झाले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मे महिन्यात सादर केलेल्या अहवालानुसार २०२५ पर्यंत भारतातील कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या सुमारे १५.७ लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २०२२ साली ही संख्या १४.६५ लाख होती. आता त्यात सुमारे १२.५ टक्के वाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कर्करोगाचे हे आकडे केवळ एक आरोग्यतांत्रिक संकट नव्हे, तर संपूर्ण देशासाठी सामाजिक व आर्थिक आव्हान असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. आयसीएमआरच्या नवीन अहवालात स्तन, गर्भाशय, फुफ्फुस, तोंड आणि गुदाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत स्तनाचा आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग लक्षणीय प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रातही वाढतोय कॅन्सरचा धोका

शहरी भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे कर्करोगाचं निदान अंतिम टप्प्यात असल्यामुळे मृत्यूदर वाढतो. आयसीएमआरच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १.३ लाख कॅन्सरच्या नवीन रुग्णांची नोंद होते. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) आणि नाशिक यांसारख्या शहरात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. केवळ मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दरवर्षी ७०,००० पेक्षा अधिक कर्करोग रुग्णांची नोंद केली जाते. पुरुषांमध्ये तोंडाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो.

आणखी वाचा : हार्ट अटॅक आल्यानंतरच्या पुढच्या काही सेकंदात काय कराल? जीव कसा वाचवता येतो? जाणून घ्या ५ महत्त्वाचे मुद्दे!

कॅन्सरच्या या १० लक्षणांकडे दुर्लक्ष नको

  • अचानक वजन कमी होणे हे कर्करोगाचे पहिले लक्षण असू शकते. पाच किलो किंवा त्याहून अधिक वजन अचानक कमी झाल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांना ताप येणे खूप सामान्य बाब आहे. कर्करोग पसरत असताना तापाची वारंवारता वाढते, त्यामुळे दुर्लक्ष करू नका.
  • अत्यंत थकवा येणे आणि विश्रांती घेऊनही तो न जाणे हे कर्करोग वाढत असल्याचे एक महत्त्वाचं लक्षण असू शकते, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • त्वचा गडद होणे आणि शरीराला खाज सुटणे हेदेखील कॅन्सरचे लक्षण असू शकते. अशी समस्या उद्भवल्यास वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहेत.
  • लघवी करताना वेदना होणे किंवा त्यातून रक्त येणे हे मूत्राशयाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकते, त्यामुळे अशी लक्षणे दिसल्याच सावध व्हायला हवे.
  • दीर्घकाळ तोंडात झालेली जखम बरी होत नसेल तर तात्काळ डॉक्टर किंवा दंतवैद्याचा सल्ला घ्यायला हवा, कारण हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.
  • कर्करोगाच्या सुरुवातीला असामान्य रक्तस्त्राव होऊ शकतो. खोकल्यामुळे रक्त येणे हे फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.
  • शरीरावर गाठ किंवा कडकपणा तयार होणे हेदेखील कर्करोगाचे लवकर किंवा उशिरा दिसणारे लक्षण असू शकते.
  • सतत अपचन किंवा अन्न गिळताना त्रास होणे यांसारखी लक्षणे ही अन्ननलिका, पोट किंवा घशाच्या कर्करोगाची असू शकतात.
  • तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, कारण हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.

कॅन्सर कशामुळे उद्भवतो? तज्ज्ञ काय सांगतात?

तंबाखू, विडी, सिगारेट आणि गुटखा यांसारख्या गोष्टींचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. भारतात दरवर्षी सुमारे एक लाखापेक्षा जास्त पुरुष तंबाखूजन्य कर्करोगामुळे मृत्यू होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात नमूद केले आहे. केंद्र सरकारने तंबाखूविरोधी कायदे आणि त्याच्या विक्रीवर बंदी आणली असली तरी प्रत्यक्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. फक्त तरुण आणि महिलांनाच नव्हे तर बालकांमध्येही कर्करोगाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होत आहे. दरवर्षी सुमारे ५० हजार बालकांना रक्ताचा कर्करोग किंवा मेंदूशी संबंधित कर्करोगाचे निदान होते. ग्रामीण व निमशहरी भागांतील औद्योगिक प्रदूषण, रसायनांचा साठा आणि कीटकनाशकांचा वापर या कारणांमुळे लहान वयातच मुलांना हा दुर्धर आजार जडतोय, असे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : World Heart Day 2025: हार्टअटॅकची वेदना दात, जबडा किंवा मानेतही जाणवते का? या मार्गाने येणारा हृदयविकार कसा ओळखाल?

महाराष्ट्र सरकारने काय निर्णय घेतला?

महाराष्ट्र सरकारने टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई (जे.जे.), कोल्हापूर, पुणे (बैरामजी जीजीभॉय), नांदेड येथील सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत दर्जेदार कर्करोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे राज्यातील कर्करोग उपचार सेवांचे व्यापक जाळे, प्रशिक्षित तज्ज्ञ व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होऊन रुग्णांसाठी अधिक सक्षम आरोग्यसेवा प्रणाली निर्माण होणार आहे. या सेवांचा समन्वय साधण्यासाठी “महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन” (महाकेअर) ही कंपनी स्थापन करण्यासही मंजुरी मिळाली आहे. सुरुवातीला १०० कोटी रुपयांचा कॉर्पस फंड, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील २० टक्के शुल्क तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधी उभारण्याची मुभा यासाठी देण्यात आली आहे.