कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केल्याच्या प्रसंगाचा समारंभ साजरा करणारा चित्ररथ साकारण्यात आला. या समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतातून नाराजी व्यक्त होत आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि काँग्रेस पक्षाने या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानी समर्थकांनी पाच किलोमीटरची एक परेड काढली होती, ज्यामध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग एका नावेवर दाखविण्यात आला होता. बलराज देओल या ट्विटर हँडलवर सर्वात आधी हा सहा सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, ज्यामुळे भारत आणि कॅनडामध्ये द्विपक्षीय वाद निर्माण झाला आहे. कॅनडामध्ये खलिस्तान्यांनी परेड का काढली? भारत आणि कॅनडाने या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया दिल्या? काँग्रेसचे याबाबत काय म्हणणे आहे? यावर घेतलेला हा आढावा.

वादग्रस्त व्हिडिओची पार्श्वभूमी

ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये इंदिरा गांधी यांचा पांढऱ्या साडीतला एक पुतळा उभा केलेला दिसतो. त्यावर रक्ताचे शिंतोडे दिसत आहेत. या पुतळ्याच्या समोरच दोन बंदुकधारी सुरक्षारक्षक उभे असून ते इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडत असताना दिसत आहेत. या नावेवर देखाव्यासोबत एक फलकही झळकवलेले दिसत आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘श्री दरबार साहिब येथे झालेल्या हल्ल्याचा सूड’. या फलकाचा संदर्भ १९८४ रोजी भारतीय लष्कराने अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात राबविलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तानी समर्थकांनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३९ व्या वर्धापनदिनाच्या दोन दिवस आधी ४ जूनला ग्रेटर टोरंटो येथील शहरात ही परेड काढली होती. ६ जून रोजी ऑपरेशन ब्लू स्टारचा वर्धापन दिन होता.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी ऑपरेशन ब्लू स्टारचा राग धरून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी नवी दिल्ली येथील निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या केली होती.

हे वाचा >> विश्लेषण: बनावट पत्रामुळे ७०० भारतीय विद्यार्थ्यांवर कॅनडातून हद्दपारीची वेळ; हे रॅकेट कसे चालते?

भारत सरकारने काय प्रतिक्रिया दिली

भारत आणि कॅनडाच्या द्विपक्षीय संबंधासाठी ही चांगली बाब नसल्याची प्रतिक्रिया परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या घटनेनंतर (दि. ८ जून) दिली. ते पुढे म्हमाले, “कॅनडाने भारतविरोधी घटकांना कारवाया करण्याची मुभा देणे हे द्विपक्षीय संबंधासाठी, तसेच कॅनडासाठीही चांगले नाही. कॅनडाने अशा घटकांना थारा देणे, हे न समजण्यासारखे आहे. ही केवळ मतपेढीच्या राजकारणाची गरज असू शकते. आमच्या संबंधासाठी, तसेच कॅनडासाठीही ही गोष्ट योग्य नाही”

दरम्यान, ओटावा मधील भारतीय उच्चायुक्ताने ग्लोबल अफेअर्स कॅनडाला (GAC) एक पत्र पाठवून घडलेल्या प्रसंगावर असहमती दर्शविली आहे. “एका लोकशाहीवादी देशातील नेत्याच्या हत्येच्या प्रसंगाचे उदात्तीकरण करून, तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा अशाप्रकारे ओलांडू शकत नाहीत”, अशा शब्दात भारतीय अधिकाऱ्यांनी कानउघाडणी केली असल्याची बातमी एचटीने दिली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, दोन महिन्यापूर्वीच एप्रिल महिन्यात ओटावामधील भारतीय उच्चायुक्तालयामध्ये फुटीरतावादी आणि कट्टरतावाद्यांनी धुडगूस घातला होता, त्याबद्दल भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी कॅनडाच्या उच्चायुक्तांकडे नाराजी व्यक्त केली होती. या फुटीरतावादी आणि कट्टरतावाद्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कॅनडाच्या उच्चायुक्तांना केल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी तेव्हा सांगितले होते.

हे वाचा >> VIDEO : कॅनडात खलिस्तान समर्थकांनी इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला, काँग्रेससह परराष्ट्र मंत्र्यांचा संताप

काँग्रेसने केंद्र सरकारकडे काय मागणी केली?

काँग्रेसचे नेते, माजी खासदार मिलिंद देवरा यांनी ट्विटरवरून या प्रसंगावर टीका केली आहे. एक भारतीय या नात्याने, ही पाच किमीची परेड पाहून आश्चर्यचकीत झालो आहे. या परेडमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा देखावा दाखविण्यात आला. हा मुद्दा कुणाची बाजू घेण्याचा नाही. हा प्रसंग भारताबद्दल आदरभाव दाखविणे आणि माजी पंतप्रधानांच्या हत्येबाबत वेदना व्यक्त करणारा आहे. या कट्टरतावाद्यांचा जागतिक स्तरावर निषेध झाला पाहीजे.

हा विषय कॅनडाच्या यंत्रणेपर्यंत नेला जावा, अशी मागणी काँग्रेसने भारत सरकारकडे केली आहे. देवरा यांचे ट्विट रिट्विट करत असताना काँग्रेसचे खासदार जयराम रमेश म्हणाले की, मी पूर्णपणे या मताशी सहमत आहे. ही घटना निंदनीय असून डॉ. एस. जयशंकर यांनी कॅनडाच्या यंत्रणेसमोर याचा कडक शब्दात निषेध करायला हवा. तर खासदार शशी थरूर म्हणाले की, कोणतेही राजकारण न करता या घटनेचा निषेध व्यक्त व्हायला हवा.

फुटीरतावाद्यांनी भारतीय पंतप्रधानांची हत्या केली. खलिस्तानी समर्थकांकडून कॅनडा येथे या हत्येचा समारंभ आयोजित केला जातो आणि आपले केंद्र सरकार यावर फक्त एक प्रतिक्रिया देऊन शांत बसते. सरकारने आपल्या प्रतिक्रियेत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नावही घेतले नाही, अशी ट्विट काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केले. आपल्या देशाचा विषय आणि सुरक्षेचा मुद्दा हा राजकीय विचारधारेच्या वर असला पाहीजे. भारताने अधिकृतरित्या कॅनडाशी याबाबतीत संवाद साधला पाहीजे, असेही त्या म्हणाल्या.

कॅनडाच्या राजदूतांनी काय म्हटले?

कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांनी म्हटले, “द्वेष किंवा हिंसाचाराचे उदात्तीकरण यांना कॅनडात काहीही स्थान नाही”

कॅनडामध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा समारंभ आयोजित करण्यात आल्याची बातमी पाहून मलाही धक्का बसला. द्वेष किंवा हिंसाचाराचे उदात्तीकरण यांना कॅनडात काहीही स्थान नाही. या घटनेचा स्पष्टपणे निषेध करतो, असे ट्विट कॅमेरून यांनी केले आहे.