Cholesterol causing Heart Attack काही वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) येणे अगदी दुर्मीळ होते. मात्र, आता अगदी कमी वयातही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तिशीच्या आतल्या व्यक्तींनाही हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी अनेक घटनांसाठी शरीरातील अनियंत्रित कोलेस्ट्रॉलची पातळी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी राखणे अत्यंत गरजेचे आहे. हृदयविकाराचा झटका येण्यात कोलेस्ट्रॉल कसे कारणीभूत ठरते? ते नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे? तज्ज्ञ याविषयी काय सांगतात? जाणून घेऊयात…
२५ वर्षीय तरुणीला आलेला अनुभव
वय वर्षे २५ असताना आद्या वाडियार (नाव बदललेले) हिला असाच काहीसा अनुभव आला. ती एका आयटी कंपनीतील कर्मचारी आहे. तिची कोलेस्ट्रॉलची पातळी २२० एमजी/डीएल (मिलीग्राम प्रति डेसीलीटर) असल्याचे आढळून आले. कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी २०० एमजी/डीएलपेक्षा कमी असते. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा असतो, जो रक्तांच्या नसांमध्ये साचत जातो. कोलेस्ट्रॉलचे एकूण दोन प्रकार असतात. एक म्हणजे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) किंवा वाईट कोलेस्ट्रॉल आणि हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) किंवा चांगले कोलेस्ट्रॉल.

तरुणीने सांगितले, “मला यातील प्रत्येक घटकाचे आकडे महत्त्वाचे का आहेत हे माहीत नव्हते. २५ व्या वर्षी तुम्ही तरुण असता आणि तुम्हाला वाटते की हे थोडे वाढलेले आकडे फार फरक करणार नाहीत. पण, त्यांचा माझ्या आरोग्यावर फरक जाणवला. बरोबर एका दशकानंतर, म्हणजेच ३५ व्या वर्षी मला हृदयविकाराचा झटका आला.” बंगळूरू येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक डॉ. रंजन शेट्टी यांनी तरुणीची अँजिओप्लास्टी (ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या उघडण्याची प्रक्रिया) केली.
डॉ. रंजन शेट्टी म्हणतात, “लोकांमध्ये वर्षानुवर्षे, अगदी अनेक दशके कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असू शकते आणि त्यांना कोणतीही अडचण जाणवत नाही. मात्र, काही काळानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ‘प्लाक’ जमा होण्याची सुरुवात होते. रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.” ते पुढे म्हणाले, “तरुणी तंदुरुस्त होती आणि त्यांना इतर कोणताही धोका नव्हता, त्यामुळे मी तिला कौटुंबिक इतिहासाबद्दल विचारले. तेव्हा तिने सांगितले की, तिच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला होता.
कौटुंबिक इतिहास आणि अनुवांशिक धोका
- जेव्हा तुमच्या कुटुंबात लहान वयात हृदयविकाराचे झटके आल्याचा इतिहास असतो, तेव्हा याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हालाही उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगाचा धोका असतो.
- डॉ. शेट्टी म्हणतात, “काही रुग्णांना फॅमिलीअल हायपरकोलेस्टेरोलेमिया नावाचा अनुवांशिक आजार असतो. यात शरीरातून LDL कोलेस्ट्रॉल प्रभावीपणे काढले जात नाही, ज्यामुळे ते रक्तप्रवाहात जमा होते.”
“आद्याचा २५ व्या वर्षी एकूण कोलेस्ट्रॉल २२० एमजी/डीएल होता. त्यावेळी ती याविषयी जागरूक नव्हती. तुमच्या विशीत सुरुवातीला याची पातळी १८० एमजी/डीएलपेक्षा जास्त असल्यास हे दर्शवते की, तुम्हाला कौटुंबिक धोक्याचा इतिहास असण्याची शक्यता आहे. हृदयविकार टाळण्यासाठी नियमितपणे फॉलो-अप चाचण्या करणे आणि एकूण स्थितीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
कमी वयातच करावे कोलेस्ट्रॉल नियंत्रित
कोलेस्ट्रॉल शरीरात धोकादायक पातळीवर पोहोचायला बराच वेळ लागतो. डॉ. शेट्टी म्हणतात, “रक्तवाहिन्यांमध्ये ‘प्लाक’ तयार होण्याची प्रक्रिया सामान्यतः लहानपणापासूनच सुरू होते. नंतर त्याला धोकादायक पातळीवर पोहोचायला बराच वेळ लागतो आणि हा वेळ तुम्हाला जीवनशैलीत सुधारणा करून स्वतःला सावरण्याची एक संधी देतो. एकदा का कोलेस्ट्रॉल उच्च पातळीवर पोहोचले, तर ते कमी करण्यासाठी तुम्हाला औषधोपचारांची गरज भासू शकते.” आद्या सांगते, “माझे कोलेस्ट्रॉल आणि कौटुंबिक इतिहासाविषयीचे मूलभूत तथ्य मला माहीत असते तर कदाचित मी माझा हृदयविकार टाळू शकले असते.”
तरुणांनी कोलेस्ट्रॉलची चाचणी कधी करावी?
डॉ. शेट्टी सांगतात की, किशोरवयीन मुलांनी त्यांची कोलेस्ट्रॉल तपासणी १८ ते २१ वर्षांच्या वयातच करून घ्यावी. लठ्ठपणा किंवा मधुमेह असलेल्या मुलांची तपासणी लवकर करावी. त्यांची तपासणी एकापेक्षा अधिकवेळाही करावी लागू शकते. कौटुंबिक इतिहास आणि इतर आजार (co-morbidities) असलेल्या लोकांनी वार्षिक तपासणी करावी. कोणताही आजार नसलेल्या लोकांनी त्यांची पुढील तपासणी चार ते सहा वर्षांच्या अंतराने करावी.
कोलेस्ट्रॉलसाठीच्या चाचण्या
“इतर लोकसंख्येच्या तुलनेत भारतीयांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो आणि ३१ टक्के भारतीयांमध्ये उच्च एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉल असते, तर अनुवांशिकरित्या त्यांच्यात एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉल कमी असण्याची शक्यता असते, त्यामुळे तपासणी आणि संतुलन राखणे आवश्यक आहे,” असे डॉ. शेट्टी म्हणतात. त्यांच्या मते, एलडीएल (LDL) ७० एमजी/डीएलपेक्षा कमी असावे, तर एचडीएल (HDL) किमान ४० एमजी/डीएलपेक्षा कमी नसावे. ट्रायग्लिसराइड्स १५० एमजी/डीएलपेक्षा कमी असावे. त्याच वेळी रक्तातील साखर आणि रक्तदाब यांसारख्या तपासण्याही या धोक्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे डॉक्टर सांगतात.
डॉ. शेट्टी धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सच्या पातळीवर लक्ष केंद्रित करतात. “यांच्यात एकत्रित झालेली वाढ धोकादायक असू शकते. लिपोप्रोटीन-ए किंवा Lp(a)देखील मोजायला हवे, जे रक्तात कोलेस्ट्रॉल वाहून नेते. सुमारे २५ टक्के भारतीयांमध्ये त्याची पातळी जास्त असते, जी आदर्शपणे ३० एमजी/डीएलपेक्षा कमी असावी; त्यामुळे हे सर्व धोक्याचे घटक दूर करण्यासाठी याची तपासणी किमान एकदा तरी केली पाहिजे,” असे ते सांगतात.
हृदयविकाराचा झटका रोखण्यासाठी आणखी काय करावे?
आद्या सांगतात की, बसून काम करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांची शारीरिक हालचाल कमी होती. कामाच्या तणावामुळे ‘रेडी-टू-ईट’ पदार्थांची (convenience foods) त्यांची आवड वाढली होती. “आहार आणि कमी व्यायामामुळे मी स्वतःसाठी धोका निर्माण करत होते हे माझ्या लक्षात आले नाही. हा धोका टाळण्यासाठी कमी चरबीयुक्त, कमी कॅलरी असलेले अन्न खाणे, जास्त फळे आणि भाज्या सेवन आवश्यक आहे. तसेच बदामातून, अक्रोडातून आणि जवसातून ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स मिळतात, जे फायद्याचे ठरू शकतात. डॉ. शेट्टी यांनी व्यायाम करण्याचाही सल्ला दिला आहे.