-किशोर कोकणे  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या शिवसैनिकांविरोधात होत असलेल्या प्रशासकीय कारवायांमुळे येथील महापालिका आणि पोलीस दलाच्या कामाविषयी विरोधी गटाकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घडामोडी ताज्या असताना ठाणे शहर आणि संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाढलेल्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही चितेंचा विषय ठरू लागले आहे. ठाणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून महिलांचा आणि विशेषत: तरुणींचा दिवसाढवळ्या विनयभंग होण्याच्या घटना वाढल्या असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील काही लोकप्रतिनिधींनी याविषयी आवाज उठविताच पोलीस दल अचानक कामाला लागले. त्यातही रिक्षा चालकांकडून होणाऱ्या महिलांच्या विनयभंगाचे प्रकारही थांबलेले नाहीत. सोनसाखळी चोऱ्या, वाढते गुंडगिरीचे प्रकार, वाळू, रेती माफियांचा उच्छाद, रेती बंदरांवर सुरू असलेला बेकायदा भराव, वाढती बेकायदा बांधकामे अशा प्रकारांकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याची चर्चाही आता उघडपणे सुरू झाली आहे. हे सगळे प्रकार ताजे असताना शुक्रवारी ठाण्याच्या दोन भागांत गोळीबाराच्या घटना घडल्या. हे प्रकार करत असताना गुंडांचा ज्या बिनधास्तपणे वावर सुरू होता ते पाहता ठाणे पोलीस नेमके करतात तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

ठाणे शहर पोलीस दल वादग्रस्त का ठरले आहे?

ठाणे शहर पोलीस दल हे मुंबईनंतरचे पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण मानले जाते. मुंबई महानगर प्रदेशाचा बराचसा महत्त्वाचा भाग या पोलीस दलाच्या अखत्यारित येतो. ठाण्यात पोलीस आयुक्त पद भूषविणारा अधिकारी पुढे मुंबईचा पोलीस आयुक्त होतो असा इतिहास आहे. असे असले तरी ठाण्याचे पोलीस दल वादग्रस्तही ठरू लागले आहे. दीड वर्षांपूर्वी ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांवर अनेक आरोप झाले. या प्रकरणात जे अटकसत्र झाले त्यातील बरेचसे अधिकारी ठाणे पोलीस दलात कार्यरत होते आणि येथील त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. उशिरापर्यंत सुरू असलेले डान्सबार, लाचप्रकरणी अटकेत असलेले अधिकारी, बदल्या असो किंवा अंतर्गत धुसफूस यामुळे ठाणे पोलीस दल सतत चर्चेत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ठाणे पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये विस्तवही जात नसल्याची चर्चा होती. 

गुन्हेगारी रोखण्यात अपयशाला जबाबदार कोण?

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हेगारीचा आलेख वारंवार चढा असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांत ठाणे शहरात चोरी, सोनसाखळी चोरी, जबरी चोरी यासारखे ३०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यातील चोरीचे गुन्ह्यांचा पूर्णपणे शोध घेण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. मागील महिन्यांतील २५२ चोरीच्या घटनांपैकी केवळ ६७ प्रकरणात आरोपींना शोधून काढणे पोलिसांना शक्य झाले. त्यातच दोन महिन्यात गोळीबारीच्या चार घटना आणि विनयभंगाचे दिवसाढवळ्या दोन प्रकार समोर आले आहेत. यातील एका गोळीबार प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांना अटक करता आलेला नाही. विनयभंगाचे प्रकारही भर दिवसा घडल्याने पोलीस यंत्रणेविषयी सामान्य नागरिक देखील प्रश्न विचारू लागले आहेत. 

वाढत्या गुन्ह्यांना डान्सबार, मटका, जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट कारणीभूत? 

ठाण्यात डान्सबार, मटक्याचा व्यवसाय आणि जुगाराच्या अड्ड्यांचा सुळसुळाट झाल्याचे बोलले जात आहे. काही क्लब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा चर्चा शहरात सुरू आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयास लागूनच असलेल्या नवी मुंबई पोलीस दलातील सावळागोंधळाच्या अनेक सुरस कथा सातत्याने चर्चेत असतात. मध्यंतरीचा काही काल असा होता की ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सर्वच डान्सबार बंद ठेवण्यात आले होते. तेव्हा नवी मुंबईत रात्री उशिरापर्यंत हा व्यवसाय चालायचा अशा तक्रारी होत्या. आता नवी मुंबईच्या पावलावर पाऊल ठेवत ठाण्यातही अगदी पहाटेपर्यत रात्र जागविण्याची ‘सोय’ असते. त्यासंदर्भाच्या अनेक तक्रारीही नागरिकांकडून ट्विटरद्वारे केल्या जात आहेत. परंतु त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी नौपाडा आणि वर्तकनगर येथे रात्री उशिरापर्यंत डान्स बार सुरू असल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यानंंतर भाजपने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले होते. परंतु सत्ताबदल झाल्यानंतरही शहरातील हा विळखा सुटलेला नाही.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवासी असुरक्षित?

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दिवसाला लाखो प्रवासी ये-जा करत असतात. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी स्थानकाच्या पश्चिमेस एक पोलीस चौकी उभारली आहे. पंरतु ढिसाळ नियोजन आणि लोहमार्ग पोलीस, स्थानिक पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या हद्दीच्या वादामुळे फेरीवाले आणि रिक्षा चालकांकडून या भागात नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अनेकदा प्रवासी विरुद्ध फेरीवाले आणि रिक्षाचालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवताना दिसत आहेत. काही मुजोर रिक्षा चालकांकडून गैरवर्तणुकीचे प्रकार वारंवार घडत असतात. प्रवाशांकडून पोलिसांना याची माहिती दिली जाते. परंतु हद्दीचे कारण सांगून पोलीस कारवाई करत नाहीत, असा अनुभव प्रवासी सांगत आहेत. पोलीस चौकीत असलेले काही कर्मचारी हे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील असल्याने त्यांच्याकडूनही रिक्षा चालकांवर वचक राहताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच एका रिक्षा चालकाने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. पोलीस सुरक्षित नसल्याने आमची सुरक्षा कोण पाहणार असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.  

बदल्या, नियुक्त्यांचा सावळागोंधळ कुणामुळे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहरातून मुख्य मार्ग, महामार्ग जातात. भिवंडी, गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक शहरातून होते. तसेच शहरातील हलक्या वाहनांचा भारही रस्त्यावर असतो. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलीस दलात वाहतूक नियंत्रण कक्षासाठी उपायुक्त असणे आवश्यक आहे. जून महिन्यामध्ये बाळासाहेब पाटील यांची बदली पालघर अधीक्षकपदी झाल्यानंतर ठाणे वाहतूक पोलीस दलातील ही जागा अद्यापही रिक्त आहे. या अतिशय महत्त्वाच्या पदावर गेल्या चार महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जात आहे. शहरात पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे.