संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक नवी आयुधे भारताच्या संरक्षण दलांमध्ये होणार असल्याची माहिती दिली. यात हायपरसॉनिक मिसाइल्सचाही समावेश आहे. भारताची हवाई संरक्षण यंत्रणा त्यामुळे अधिक मजबूत होणार आहे. मात्र, विकसनाच्या टप्प्यावर असलेली ही अद्ययावत आयुधे प्रत्यक्षात संरक्षण दलात दाखल व्हायला २ ते १० वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र
ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या पुढील पिढीवर (ब्राह्मोस एनजी) डीआरडीओ काम करीत आहे. रशियाच्या सहकार्याने आपण ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकसित करीत आहोत. ही क्रूझ क्षेपणास्त्रे सुखोई-३० एमकेआय या विमानातूनही डागता येतात. ही क्षेपणास्त्रे आणखी विविध लष्करी आयुधातून डागता येतील, अशी रीतीने आता बनविली जात आहेत. ही क्षेपणास्त्रे वजनाने हलकी आणि लहान आहेत. त्यामुळे विविध लढाऊ साधनांतून ती डागता येतील, अशी शक्यता आहे. हवाई संरक्षणाची ताकद त्यामुळे आणखी वाढणार आहे. एक ते दोन वर्षांत ते संरक्षण दलात दाखल होण्याची शक्यता आहे.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्र कार्यक्रम
भारत दोन प्रकारची हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे विकसित करीत आहे. १. क्रूझ क्षेपणास्त्र आणि २. ग्लाइड व्हेइकल. ग्लाइड व्हेइकल प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून, येत्या २ ते ३ वर्षांत चाचण्या घेऊन संरक्षण दलात ते दाखल होण्याची शक्यता आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रामध्ये स्क्रॅमजेट प्रॉपल्शन यंत्रणेची चाचणी यापूर्वीच यशस्वीपणे घेण्यात आली आहे. सरकारच्या मान्यतेनंतर हे क्षेपणास्त्र पूर्णपणे विकसित केले जाईल. आवाजाच्या वेगापेक्षा पाच पटींनी अधिक वेगाने जाण्याची (माक-५) या क्षेपणास्त्राची क्षमता असेल. शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणा भेदून शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास सरकारची मान्यता मिळाल्यानंतर पाच ते सात वर्षांचा कालावधी लागेल.
इतर क्षेपणास्त्रे
हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीवर काम सुरू आहे. सध्या एमके-१ ही आवृत्ती संरक्षण दलाच्या सेवेत आहे. एमके-२ आणि एमके-३ ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसनाच्या टप्प्यावर आहेत. दरम्यान, हवेतून जमिनीवर मारा करणारी रुद्रम क्षेपणास्त्रे आणखी अद्ययावत करण्यात येत आहेत. रुद्रम-२, ३ आणि ४ क्षेपणास्त्रे विकसनाच्या टप्प्यावर आहेत. नव्या आवृत्तीची आणि विकसनाच्या टप्प्यावर असलेली ही अद्ययावत क्षेपणास्त्रे संरक्षण दलात दाखल होण्यास आणखी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे.
हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे
रशियाच्या एस-४०० या हवाई संरक्षण यंत्रणेइतकी क्षमता तयार करण्यासाठी भारतही लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करीत आहे. कुश प्रकल्पांतर्गत या क्षेपणास्त्रांचे विकसन सुरू आहे. याखेरीज डीआरडीओ लेझरवर आधारित शस्त्रे आणि ड्रोन आणि इतर हवाई आयुधे निकामी करणाऱ्या सूक्ष्मलहरी यंत्रणेवरही डीआरडीओ काम करीत आहे. हे प्रकल्प पूर्ण होण्यासही आणखी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे.
तोफा आणि हलके रणगाडे
भारताने देशी बनावटीची अत्याधुनिक टोड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीएजीएस) विकसित केली आहे. ती आता विविध ठिकाणी सहजपणे नेता येईल, अशा रीतीने अद्ययावत करण्यात येत आहे. केंद्र सरकारने ट्रकमधून वाहून नेता येतील अशा ८१४ तोफांच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. संरक्षण उत्पादने करणाऱ्या सरकारी कंपन्यांखेरीज एलअँडटी, भारत फोर्ज आणि महिंद्रा डिफेन्स या कंपन्याही या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच, झोरावर या हलके रणगाडे विकसित करण्याच्या प्रकल्पावरही काम सुरू आहे. एल अँड टी कंपनीबरोबर याची निर्मिती करण्यात आली असून, चीन सीमेवर उंच क्षेत्रावर हे रणगाडे तैनात केले जातील. या रणगाड्यांचे वजन २५ टन असून, ३५४ रणगाडे लष्करामध्ये असतील.
नौदल यंत्रणा
भारताच्या नौदलासाठी डीआरडीओ टॉर्पिडो, पाणसुरुंग आणि इतर सागरी शस्त्रे विकसित करीत आहे. यातील अनेक यंत्रणा संरक्षण दलात दाखल होण्याच्या मार्गावर आहेत. नौदलाची शक्ती त्यामुळे अधिक वाढणार आहे.
पाचव्या पिढीचे लढाऊ विमान
केंद्र सरकारने अत्याधुनिक मध्यम लढाऊ विमान (एएमसीए) प्रकल्पाला २०२४ मध्ये मान्यता दिली आहे. येत्या १० वर्षांत हे लढाऊ विमान संरक्षण दलात दाखल होण्याची शक्यता आहे, असे डॉ. कामत यांनी यापूर्वी सांगितले होते. तेजस प्रकल्पाला जितका वेळ गेला, तितका वेळ या प्रकल्पात जाणार नाही, अशी चर्चा आहे.
आत्मनिर्भरतेवर भर
दुसऱ्या देशांच्या सहाय्याशिवाय भविष्यातील शस्त्रेनिर्मितीवर भर राहणार असल्याचे डॉ. कामत यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतून काही धडे शिकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शस्त्रे जीपीएस किंवा संवादयंत्रणेशिवाय काम करू शकतील, अशी हवीत, असे ते म्हणाले. शत्रूने इलेक्ट्रॉनिक यंत्रणा जॅम केली, तरी शस्त्रे काम करतील, अशा रीतीने विकसित करण्यावर भर हवा, असे त्यांनी नमूद केले. बहुउद्देशीय देशी बनावटीची यंत्रणा विकसित करण्यावर भर असून, त्यामुळे परदेशावरील अवलंबित्व कमी होईल, असे डॉ. कामत यांनी सांगितले.