चंद्रशेखर बोबडे

राज्याची उपराजधानी नागपूर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या नव्या द्रुतगती महामार्गाची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी एका ट्वीटद्वारे केली. यामुळे नागपूर-पुणे प्रवास ८ तासांत पूर्ण होणार असा दावा त्यांनी केला. कसा असेल हा महामार्ग, त्याचा फायदा किती, अशा अनेक मुद्द्यांवर आता चर्चा सुरू झाली आहे.

कसा असणार आहे नागपूर-पुणे महामार्ग?

नागपूर-पुणे हा प्रस्तावित ‘ग्रीन एक्स्प्रेस वे’ २६८ किलोमीटरचा असणार आहे. तो थेट नागपूर-पुणे असा असणार नाही तर तो पुणे-औरंगाबाद असा असेल. त्याची सुरुवात पुण्यातील प्रस्तावित वळणमार्गावरील पुणे-बंगळुरू इंटरस्टेक्शनपासून होईल आणि पुढे तो अहमदनगर, बीड या जिल्ह्यांतून जात औरंगाबाद येथे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. तो सहा पदरी असेल व पुढच्या काळात त्याला आठ पदरी करण्याचे नियोजन आहे. त्यावरून ताशी सरासरी १२० कि.मी. या गतीने वाहने धावू शकतील.

नागपूर-पुणे अंतर ८ तासांत कसे पार करता येईल?

नवीन महामार्गामुळे नागपूर-पुणे अंतर ८ तासात पूर्ण करता येईल असा दावा गडकरी यांनी केला आहे. नागपूर ते औरंगाबाद हे अंतर ४१० किमी आहे आणि तेथून २६८ किमी औरंगाबाद-पुणे एक्स्प्रेस वे बांधण्यात येणार आहे. नागपूर ते औरंगाबाद हे अंतर समृद्धी महामार्गावरून साडेपाच तासांत पूर्ण करता येते आणि पुढे औरंगाबाद ते पुणे अडीच तासात जाता येईल. अशा प्रकारे नागपूर ते पुणे अशी एकूण ६७८ किलोमीटरची लांबी ८ तासांत पार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा – विश्लेषण: वीगन चळवळीची लोकप्रियता वाढतेय का? वीगनिझममध्ये काय खाता येते व काय नाही?

नागपूर-पुणे द्रुतगती मार्गाची गरज का?

सध्या नागपूर ते पुणे प्रवास अतिशय वेळखाऊ आहे. पुण्यासाठी नागपुरातून रेल्वे, एस.टी. आणि खासगी बसेसची सुविधा आहे. पण सध्या या प्रवासाला साधारणपणे १२ ते १५ तास लागतात. रस्ते मार्गाने जायचे असेल तर नागपूर-अमरावती-कारंजा लाड-जालना-औरंगाबाद-अहमदनगरमार्गे पुण्याला जावे लागते. रस्त्याची अवस्था वाईट असल्याने इंधन अधिक लागते व वेळही अधिक जातो. रेल्वे गाड्या मर्यादित असल्याने आरक्षण मिळत नाही. त्यामुळे खासगी प्रवासी बसेसचा व्यवसाय फोफावला आहे. दिवाळी, उन्हाळ्यांच्या सुट्यांमध्ये या बसेसच्या भाड्यात होणारी अनेक पटींनी वाढ प्रवाशांची लूट करणारी ठरते.त्यामुळे नव्या द्रुतगती महामार्गाची गरज होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर-पुणे नाते काय?

नागपूर ही राज्याची उपराजधानी तर सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. औद्योगिकदृष्ट्या विदर्भ मागासलेला असल्याने मागील दहा वर्षांत येथील लाखो सुशिक्षित तरुण रोजगारासाठी पुण्यात गेले आहेत. या शिवाय उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील मुले मोठ्या संख्येने तेथे राहातात. त्यांना नियमितपणे नागपूर-पुणे प्रवास करावा लागतो. यानिमित्ताने नागपूरसह विदर्भाचे पुण्याशी एक वेगळे नाते तयार झाले. या बाबींचा विचार केला तर प्रस्तावित पुणे-नागपूर महामार्ग प्रवासाच्या वेळेची, इंधनाची बचत करणारा आहे.