बॉलिवूडचा प्रतिष्ठित मानला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे फिल्मफेअर, याच फिल्मफेअरच्या विरोधात अभिनेत्री कंगना रणौत कोर्टात जाणार आहे. हा सोहळा भ्रष्ट आणि अन्यायकारक आहे असे आरोप तिने केली आहेत. फिल्मफेअरने ‘थलायवी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तिचे नाव यादीत सामाविष्ट केले होते मात्र कंगनाने आरोप केल्यामुळे त्यांनी तिचे नाव यादीतून काढले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिल्मफेअर हा पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी कलाकार भरपूर मेहनत घेत असतात. या सोहळ्याची तुलना थेट ऑस्करसारख्या पुरस्कार सोहळ्याशी केली जाते. गेली ६७ वर्ष हा पुरस्कार संपन्न होत असतो. नेमकं या पुरस्कार सोहळ्याला इतकं का महत्व आहे ते जाणून घेऊयात…

फिल्मफेअर सोहळ्याची सुरवात :

स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच भारतात चित्रपट बनायला सुरवात झाली. मात्र केलेल्या कामाचे कौतुक करणारे पुरस्कार सोहळे स्वातंत्र्यानंतर सुरु झाले. पहिला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २१ मार्च १९५४ रोजी आयोजित करण्यात आला होता. जगातील सर्वात लोकप्रिय कलाकार ग्रेगरी पेक यांना सन्माननीय पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र ते वेळेवर पोहचू शकले नाहीत. मुंबईतील मेट्रो थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव द क्लेअर्स होते. टाइम्स ऑफ इंडियाचे समीक्षक क्लेअर मेंडोन्का यांच्या नावावरून ते देण्यात आले होते. १९५४ मध्ये फक्त ५ पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला) आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक अशा श्रेणी होत्या. ‘दो बिघा जमीन’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारा पहिला चित्रपट होता. फिल्मफेअर पुरस्कारांना जनता आणि तज्ञांच्या समितीद्वारे मतदान केले जाते. खाजगी संस्था या सोहळ्याचे प्रायोजक असतात. नव्वदच्या दशकांनंतर हा सोहळा टीव्हीवर दाखवण्यात आला.

धाकड गर्ल ‘कंगना’ आता फिल्मफेअर सोहळ्याच्या विरोधात? कोर्टात करणार केस

१९८५ सालचा पुरस्कार १९८७ साली दिला?

१९८५ च्या विजेत्यांची घोषणा १९८६ मध्ये करण्यात आली. परंतु १९८६ मध्ये चित्रपट उद्योग संपावर गेला यामागचं कारण सांगितलं जातं की, महाराष्ट्र राज्यातील सरकारमुळे हा संप करण्यात आला होता. त्यामुळे त्यावर्षीचा पुरस्कार सोहळा १९८७ पर्यंत पुढे ढकलण्यात आला. अखेरीस २८ जानेवारी १९८७ रोजी विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.

विजेत्यांची निवड प्रक्रिया असते?

फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये एक प्रक्रिया राबवली जाते. ज्यात वर्षातील १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान जे चित्रपट प्रदर्शित होतात, सामान्य जनतेकडून निवडलेल्या चित्रपटांची यादी केली जाते. फिल्मफेअर आपल्या संकेतस्थळावर सोशल मीडिया अकाउंट्सवर एक फॉर्म पोस्ट करतात ज्यात सामान्य जनतेने आपल्या श्रेणीतील चित्रपटाला मतदान करायचे असते. मतदान झाल्यानंतर लोकप्रिय श्रेणीतील नामांकनांची यादी ज्युरी सदस्यांना पाठवली जाते. ज्यूरी सदस्य सर्व १० लोकप्रिय श्रेणींमध्ये नामांकित व्यक्तींना रँक देतात.

ज्युरी व्यतिरिक्त, दुसरी आणि अतिशय महत्त्वाची ज्युरी म्हणजे तांत्रिक आणि समीक्षकांची ज्युरी. लोकप्रिय सदस्यांपेक्षा वेगळ्या सदस्यांना यात घेतले जाते. समीक्षकांच्या ज्युरीमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ आणि कलाकारांचा समावेश असतो. विद्या बालन आणि सारख्या कलाकार ज्युरीचे सदस्य होते.

ब्लॅक लेडी :

या पुरस्कार सोहळ्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यातील ब्लॅक लेडी. विजेत्याला दिली जाणारी ट्रॉफी म्हणजे ब्लॅक लेडी. प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते आपल्याकडे ब्लॅक लेडी हवी. ही ब्लॅक लेडी ब्राँझपासून बनवलेली असते. ट्रॉफीला ३-डी लुक देण्यासाठी आणखी काही बदल करण्यात आले आहेत. फिल्मफेअर सोहळ्याच्या २५ व्या वर्षी ट्रॉफी चांदीची होती. तर ५० व्या वर्षी ट्रॉफी सोन्याने बनविली गेली होती.

सर्वात जास्त पुरस्कार पटकवणारे मानकरी :

दिलवाले दुलहनिया ले जायेंगे, ब्लॅक, देवदास या चित्रपटांनी १० च्या वर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम केला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत दिलीप कुमार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीत नूतन आणि जया बच्चन आहेत. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक या श्रेणीत ए. आर रहमान तर सर्वोत्कृष्ट पुरूष पार्श्वगायक किशोर कुमार हे मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक यात अनुक्रमे आशा भोसले आणि अलका याज्ञीक आहेत. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून गुलज़ार यांना सर्वोधिक पुरस्कार मिळाले आहेत.

“…तर मग मोदींचाच बायोपिक अधिक हिट ठरला असता” ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडबाबत अनुपम खेर यांचं मोठं विधान

वाद :

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा जितका मानाचा आहे तितकाच तो वादात देखील अडकला आहे. दोन वर्षांपूर्वी गल्ली बॉय चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले होते यावरून अनेकांनी टीका केली होती. फिल्मफेअरच्या निवड प्रक्रियेबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला होता. १९९६ मध्ये, आमिर आणि शाहरुख दोघांनाही एकाच श्रेणीसाठी, म्हणजेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते. आणि शाहरुखला त्याच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेमधील अभिनयासाठी हा पुरस्कार मिळाला. पण आमिरला असा विश्वास होता की तो त्या पुरस्काराला पात्र आहे आणि त्यानंतर अवॉर्ड शोमध्ये जाणे बंद केले. अभिनेत्रींच्या बाबतीत देखील घडले आहे. काजोलला कभी ख़ुशी कभी गमसाठी पुरस्कार मिळाला मात्र त्याचवेळी तब्बूला चांदनी बार चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

फिल्मफेअर पुरस्कार हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला आणि सर्वात मान्यताप्राप्त पुरस्कार आहे. चित्रपट उद्योगातील कलाकार आणि तंत्रज्ञ या दोघांच्या मेहनतीच कौतुक या सोहळ्यात केले जाते. हा पुरस्कार सोहळा हिंदी व्यतिरिक्त इतर चित्रपटसृष्टीत देखील संपन्न होतो. नुकतीच ६७ व्या फिल्मफेअरपुरस्कार सोहळ्याची नामांकनाची यादी जाहीर झाली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained information about filmfare awards in bollywood spg
First published on: 22-08-2022 at 15:35 IST