scorecardresearch

विश्लेषण : रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यासाठी वापरेलेला फॉस्फरस बॉम्ब किती धोकादायक आहे?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा आरोप केला आहे

What is the phosphorus bomb
प्रातिनिधीक छायाचित्र (Reuters)

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, गुरुवारी सकाळी रशियन सैन्याने फॉस्फरस बॉम्बचा वापर केला, ज्यामध्ये अनेक लोक मरण पावले.

या युद्धात रशियावर फॉस्फरस बॉम्ब वापरल्याचा आरोप दुसऱ्यांदा झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी, युक्रेनच्या मानवाधिकार संस्थेने पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क शहरातील पोपस्ना शहरातही फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा दावा केला होता.

पण हा फॉस्फरस बॉम्ब काय आहे?

फॉस्फरस हे रसायन आहे, पण त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, निवासी भागात या बॉम्बचा वापर करण्यास बंदी आहे. फॉस्फरसला रंग नसतो, पण कधीकधी तो फिकट पिवळा दिसतो. हा एक मेणासारखा पदार्थ आहे ज्याला लसणासारखा वास येतो. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर तो जळतो.

हा बॉम्ब किती धोकादायक आहे?

इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस (आयसीआरसी) च्या मते, पांढरा फॉस्फरस असणारी शस्त्रे जाळून फॉस्फरस पसरवतात. या जळणाऱ्या फॉस्फरसचे तापमान ८०० अंश सेल्सियस पेक्षा जास्त असते. मोकळ्या जागेवर फॉस्फरस बॉम्ब टाकल्यास तो शेकडो किलोमीटरच्या त्रिज्येत पसरू शकतो. आयसीआरसीच्या मते, हा फॉस्फरस जोपर्यंत संपत नाही किंवा तेथून ऑक्सिजन संपत नाही तोपर्यंत तो जळत राहतो. त्याच्या संपर्कात आल्यावर जळजळ होते आणि ही जळजळ इतकी तीव्र असते की ती मृत्यूपर्यंत पोहोचते.

एका अहवालानुसार, पांढरा फॉस्फरस मांसाला चिकटतो, ज्यामुळे त्याची जळजळ अधिक तीव्र होते. इतकंच नाही तर त्वचेच्या संपर्कात आल्यावर ते फॉस्फोरिक पेंटॉक्साइड सारखी रसायनं तयार करू शकतात. हे रसायन त्वचेच्या पाण्याशी विक्रिया करून फॉस्फोरिक ऍसिड तयार करते जे अधिक धोकादायक आहे. यामुळे अंतर्गत ऊतींचे नुकसान करते, ज्याला बरे होण्यास वेळ लागतो. याशिवाय फॉस्फरस व्यक्तीच्या अंतर्गत अवयवांनाही नुकसान पोहोचवते. हे खूप धोकादायक देखील आहे कारण त्यात मृत्यू होण्याचा धोका असतो.

या बॉम्बच्या वापराबाबत कायदा काय म्हणतो?

१९७७ मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे एक अधिवेशन झाले, ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण झाल्याने या पांढर्‍या फॉस्फरसच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. मात्र युद्धामध्ये मध्ये वापरले जाऊ शकते.

१९९७ मध्ये रासायनिक शस्त्रांच्या वापराबाबत एक कायदा करण्यात आला होता, ज्यामध्ये असे ठरवण्यात आले होते की जर ते निवासी भागात वापरले गेले तर पांढरे फॉस्फरस हे रासायनिक शस्त्र मानले जाईल. रशियानेही या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained what is the phosphorus bomb that ukraine has accused of using russia abn