scorecardresearch

विश्लेषण : पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांच्या हत्येपर्यंत गेलेली खलिस्तान चळवळ काय होती?

पंजाबमधील पटियाला येथे खलिस्तानविरोधी मोर्चाबाबत शीख आणि हिंदू संघटना आमनेसामने आल्या होत्या

What was the Khalistan movement
(फोटो सौजन्य – reuters)

देशात पुन्हा एकदा खलिस्तानचा मुद्दा चर्चेत आला आहे. शुक्रवारी पंजाबमधील पटियाला येथे खलिस्तानविरोधी मोर्चाबाबत शीख आणि हिंदू संघटना आमनेसामने आल्या. यादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या चकमकीच्या संबंधात प्रमुख आरोपी बरजिंदर सिंग परवाना याच्यासह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या चकमकीत चौघे जखमी झाले होते.

खलिस्तानविरोधी मोर्चाच्या मुद्द्यावरून शुक्रवारी दोन गटांमध्ये संघर्ष होऊन त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली होती, तसेच तलवारी हवेत फिरवल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करणे भाग पडले होते. यानंतर मुख्य आरोपी बरजिंदर सिंग परवाना याला मोहाली येथून अटक करण्यात आल्याचे पतियाळा परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मुखिवदर सिंग छिना यांनी सांगितले. ३८ वर्षांचा परवाना याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजपुरा येथील रहिवासी असलेला परवाना हा शुक्रवारच्या घटनेमागील सूत्रधार आहे. कालिमाता मंदिराकडे जाण्यास त्याने शीख कट्टरवाद्यांना फूस लावली. परवाना ऊर्फ सनी याच्याविरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. पदवीधर असलेला परवाना समाजमाध्यमांवर प्रक्षोभक भाषणे करण्यासाठी ओळखला जातो. २००७-०८ साली तो सिंगापूरला गेला व तेथे १८ महिने राहून परत आला. राजपुरा येथे त्याने ‘दमदमी टकसाल’ ही स्वत:ची शीख धार्मिक शाळा सुरू केली. तीन शेती कायद्यांविरुद्धच्या शेतकरी आंदोलनातही तो सहभागी झाला होता. यामुळे आता खलिस्तानची पुन्हा चर्चा होत आहे.

यापूर्वी पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या निमित्तानं खलिस्तान आणि खलिस्तानी चर्चेत होते. तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर वर्षभर चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यानही सोशल मीडियावर खलिस्तानशी संबंधित हॅशटॅगचा पूर आला होता. सरकारमधील अनेकांनी शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी चळवळ असे संबोधले होते.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार मात्र, खलिस्तान चळवळ आता इतिहासजमा झाली आहे. काही अपवाद वगळता शिखांचा या चळवळीला असलेला पाठिंबा नाहीसा झाला आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग आणि माजी लष्करप्रमुख जनरल एएस वैद्य यांचीही हत्या केली होती.

खलिस्तानी चळवळ काय होती?

खलिस्तान चळवळीची गोष्ट १९२९ पासून सुरू होते. काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात मोतीलाल नेहरूंनी पूर्ण स्वराजचा प्रस्ताव मांडला. यावेळी तीन प्रकारच्या गटांनी या प्रस्तावाला विरोध केला. पहिला गट मुहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीग. दुसऱ्या गटाचे नेतृत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर करत होते. तिसरा गट मास्टर तारा सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दलाचा होता.

तारा सिंग यांनी पहिल्यांदाच शीखांसाठी वेगळ्या राज्याची मागणी मांडली. १९४७ मध्ये या मागणीचे आंदोलनात रूपांतर झाले. त्याला पंजाबी सुबा चळवळ असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्याच्या वेळी पंजाबचे दोन भाग झाले होते. शिरोमणी अकाली दल भारतातच भाषिक आधारावर स्वतंत्र शीख राज्याची मागणी करत होता. भारतात स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला.

संपूर्ण पंजाबमध्ये १९ वर्ष वेगळ्या शीख प्रांतासाठी आंदोलने आणि निदर्शने झाली. या काळात हिंसाचाराच्या घटना वाढू लागल्या. अखेरीस १९६६ मध्ये इंदिरा गांधी सरकारने पंजाबचे तीन तुकडे करण्याचा निर्णय घेतला. शीखबहुल पंजाब, हिंदी भाषिक हरियाणा आणि तिसरा भाग चंदीगड.

चंदीगडला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. चंदीगड दोन्ही नवीन प्रदेशांची राजधानी बनवण्यात आली. याशिवाय पंजाबमधील काही पर्वतीय भाग हिमाचल प्रदेशात विलीन करण्यात आले.

एवढा मोठा निर्णय असूनही या फाळणीमुळे अनेकांना आनंद झाला नाही. काही पंजाबला दिलेल्या प्रदेशांवर नाखूष होते, तर काही समान राजधानीच्या कल्पनेवर नाखूष होते.

शीखांसाठी वेगळा ‘खलिस्तान’

पंजाबमध्ये १९६९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार जगजीत चौहान हेही तांडा विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत उभे राहिले, पण त्यांचा पराभव झाला. निवडणूक हरल्यानंतर जगजीत सिंह चौहान ब्रिटनमध्ये गेले आणि त्यांनी तेथे खलिस्तान चळवळ सुरू केली. खलिस्तान म्हणजे खालशांचा देश.

१९७१ मध्ये जगजीत सिंग यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये खलिस्तान चळवळीसाठी निधी देण्याची मागणी करणारी जाहिरातही दिली होती. जगजीत सिंग १९७७ मध्ये भारतात परतले आणि १९७९ मध्ये पुन्हा ब्रिटनला गेले. येथे जाऊन त्यांनी ‘खलिस्तान नॅशनल कौन्सिल’ची स्थापना केली.

आनंदपूर साहिब ठराव

अकाली दलाला पंजाबी चळवळीचा बराच राजकीय फायदा झाला. यानंतर प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने १९६७ आणि १९६९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कडवी झुंज दिली. मात्र, १९७२ ची निवडणूक अकालींच्या वाढत्या राजकीय आलेखासाठी वाईट ठरली. यावेळी काँग्रेस सत्तेवर आली. यामुळे शिरोमणी अकाली दलाला विचार करायला भाग पाडले.

१९७३ मध्ये, अकाली दलाने आपल्या राज्यासाठी अधिक अधिकारांची मागणी केली. या स्वायत्ततेची मागणी आनंदपूर साहिब ठरावाद्वारे करण्यात आली होती. आनंदपूर साहिब ठरावात शिखांनी अधिक स्वायत्त पंजाबसाठी वेगळ्या राज्यघटनेची मागणी केली. १९८० पर्यंत, आनंदपूर साहिब ठरावाच्या बाजूने शीखांचा पाठिंबा वाढला.

कोण होते जर्नेलसिंग भिंद्रनवाले?

१३ एप्रिल १९७८ रोजी अकाली कार्यकर्ते आणि निरंकारी यांच्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात १३ अकाली कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रोष दिवस साजरा करण्यात आला, ज्यामध्ये जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांनी भाग घेतला. पंजाब आणि शीखांच्या मागणीवर भिंद्रनवाले यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी ठिकठिकाणी प्रक्षोभक भाषणे देण्यास सुरुवात केली.

जर्नेलसिंग भिंद्रनवाले हे आनंद साहिब ठरावाचे कट्टर समर्थक होते. रागी म्हणून प्रवास सुरू करणारा भिंद्रनवाले पुढे दहशतवादी बनले. प्रसिद्ध शीख पत्रकार खुशवंत सिंग म्हणाले की, भिंद्रनवाले प्रत्येक शीखला ३२ हिंदूंना मारण्यासाठी भडकवायचे. यामुळे शिखांचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे ते म्हणायले.

१९८२ मध्ये भिंद्रनवाले यांनी शिरोमणी अकाली दलाशी हातमिळवणी करून असहकार चळवळ सुरू केली. या असहकार आंदोलनाचे पुढे सशस्त्र बंडात रूपांतर झाले. यादरम्यान भिंद्रनवाले यांना विरोध करणारे त्यांच्या हिटलिस्टमध्ये आले. त्यामुळे खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंजाब केसरीचे संस्थापक आणि संपादक लाला जगत नारायण यांची हत्या केली. दहशतवाद्यांनी वृत्तपत्राच्या फेरीवाल्यालाही सोडले नाही.

यानंतर भिंद्रनवाले सुरक्षा दलांपासून वाचण्यासाठी सुवर्ण मंदिरात घुसले. काही महिन्यांनंतर, भिंद्रनवाले यांनी शिख धर्माची सर्वोच्च संस्था अकाल तख्त येथून आपले विचार मांडण्यास सुरुवात केली. दोन वर्षे सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही.

भारतीय लष्कराला का बोलावावे लागले?

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवालेला पकडण्यासाठी गुप्त ‘स्नॅच अँड ग्रॅब’ ऑपरेशनला जवळपास मान्यता दिली होती. या ऑपरेशनसाठी २०० कमांडोनाही प्रशिक्षण देण्यात आले. या काळात सर्वसामान्यांचे किती नुकसान होऊ शकते, असे इंदिरा गांधींना विचारले असता, त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही.

यानंतर सरकारने लष्कर पाठवण्याचा निर्णय घेतला. ५ जून रोजी काँग्रेसच्या सर्व खासदार आणि आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आणि गावोगावी हिंदूंच्या सामूहिक हत्या सुरू करण्याची योजना उघड झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. खालिस्तानच्या समर्थकांनी लालरु येथे बस थांबवून ७४ हिंदूना वेगळे केले आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार केला.

ऑपरेशन ब्लूस्टार काय होते?

भिंद्रनवाले आणि सशस्त्र समर्थकांना सुवर्णमंदिरातून हटवण्यासाठी इंदिरा गांधींच्या सरकारने सुरू केलेल्या लष्करी कारवाईला ऑपरेशन ब्लू स्टार असे नाव देण्यात आले. १ ते ३ जून १९८४ दरम्यान पंजाबमध्ये रेल्वे, रस्ते आणि हवाई सेवा बंद करण्यात आली होती. सुवर्ण मंदिराचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अमृतसरमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली होती.

सीआरपीएफ रस्त्यावर गस्त घालत होती. सुवर्ण मंदिरात जाण्यासाठी आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग देखील पूर्णपणे बंद करण्यात आले होते. या ऑपरेशनचा पहिला टप्पा ५ जून १९८४ रोजी रात्री १०:३० वाजता सुरू करण्यात आला. सुवर्ण मंदिर परिसराच्या आतील इमारतींवर समोरून हल्ला करण्यात आला. यादरम्यान खलिस्तानी दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबारही केला.

यावेळी सैन्याला पुढे जाता आले नाही. दुसरीकडे, पंजाबच्या उर्वरित भागातही लष्कराने गावे आणि गुरुद्वारांमधून संशयितांना पकडण्यासाठी एकाच वेळी कारवाई सुरू केली होती. एका दिवसानंतर जनरल के एस ब्रार यांनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी रणगाडे मागवले. ६ जून रोजी परिक्रमा मार्गावरील पायऱ्यावरुन रणगाडे उतरवण्यात आले. या गोळीबारात अकाल तख्त इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही तासांनंतर भिंद्रनवाले आणि त्यांच्या कमांडर्सचे मृतदेह सापडले.

७ जूनपर्यंत भारतीय लष्कराने परिसराचा ताबा घेतला. ऑपरेशन ब्लूस्टार १० जून १९८४ रोजी दुपारी संपले. या संपूर्ण कारवाईत लष्कराचे ८३ जवान शहीद झाले तर २४९ जखमी झाले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात ४९३ दहशतवादी आणि नागरिक मारले गेले. अनेक शीख संघटनांचा दावा आहे की या कारवाईदरम्यान किमान ३,००० लोक मारले गेले.

ऑपरेशन ब्लूस्टारमध्ये निष्पापांनी जीव गमावल्याच्या निषेधार्थ कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक शीख नेत्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला. खुशवंत सिंग यांच्यासह मान्यवर लेखकांनी त्यांचे सरकारी पुरस्कार परत केले. चार महिन्यांनंतर, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत ८,००० हून अधिक शीख मारले गेले. सर्वाधिक दंगली दिल्लीत झाल्या. एका वर्षानंतर, २३ जून १९८५ रोजी कॅनडात राहणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवले. यादरम्यान ३२९ जणांचा मृत्यू झाला. बब्बर खालसाच्या दहशतवाद्यांनी याला भिंद्रनवालेच्या मृत्यूचा बदला म्हटले होते.

१० ऑगस्ट १९८६ रोजी, ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख जनरल एएस वैद्य यांची पुण्यात दुचाकीवरून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी हत्या केली. खलिस्तान कमांडो फोर्सने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. तर ३१ ऑगस्ट १९९५ रोजी पंजाबचे मुख्यमंत्री बिअंत सिंग यांच्या कारजवळ एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवले. यामध्ये बेअंत सिंग मारले गेले. सिंग यांना पंजाबमधील दहशतवाद संपवण्याचे श्रेय दिले जात होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained what was the khalistan movement abn