scorecardresearch

विश्लेषण : आरे कारशेडचा वाद नव्याने कशासाठी?

‘ते पुन्हा आले आहेत तर आम्हीही पुन्हा येऊ’ असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे

aarey metro car shed
(फोटो सौजन्य – PTI)

मंगल हनवते

मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील कारशेडवरून भाजप आणि शिवसेनेत ‘आरे-कारे’ सुरू होते. आता राज्यातील सत्तांतरानंतर लगेच शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा आरेवरून वाद सुरू झाला आहे. त्यात आता हा वाद शिवसेना, म्हणजे उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुरताच न राहता तो उद्धव ठाकरे, फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा असणार आहे. हा वाद येत्या काळात चिघळण्याचीही शक्यता आहे. कारण आरेतील करशेडला विरोध करण्यासाठी आता पर्यावरणप्रेमीही आक्रमक झाले आहेत. ‘ते पुन्हा आले आहेत तर आम्हीही पुन्हा येऊ’ असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे. त्यामुळे आरेवरून सुरू असलेले राजकारण अधिक रंगणार आहे. आरेचा नेमका वाद काय आहे? शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा का सुरू आहे? पर्यावरणप्रेमींचे काय म्हणणे आहे? याचा घेतलेला हा आढावा…

मेट्रो ३ मार्गिकेविषयी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अत्याधुनिक पर्याय म्हणजे मेट्रो. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ३३७ किमीच्या मेट्रो मार्गिकेचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील एक महत्त्वाची मेट्रो मार्गिका म्हणजे मेट्रो ३ मार्गिका. कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा हा ३३.५ किमीचा संपूर्ण भुयारी मार्ग असून यासाठी ३३ हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा मूळ प्रकल्प एमएमआरडीएचा असला तरी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमआरसीएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीच्या माध्यमातून आज मेट्रो ३ चे बांधकाम सुरू आहे. आतापर्यंत ९८ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. मात्र मेट्रो प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे कारशेड रखडली आहे. त्यामुळे बांधकाम वेगात पूर्ण झाले तरी जोपर्यंत कारशेड पूर्ण होत नाही तोपर्यंत मेट्रो ३ सुरू होणार नाही.

“कोणत्याही परिस्थितीत ‘आरे’मध्ये कारशेड होऊ देणार नाही”

कारशेड म्हणजे काय?

मेट्रो प्रकल्पातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे कारशेड. कारशेडशिवाय कोणतीच मेट्रो मार्गिका पूर्ण होऊ शकत नाही. कारशेड म्हणजे मेट्रो गाड्या ठेवण्याचे ठिकाण. मात्र कारशेडचा अर्थ इतकाच मर्यादित नसून मेट्रो प्रकल्पात तो खूपच व्यापक आहे. कारशेडमध्ये  मेट्रो गाड्या ठेवण्याबरोबरच गाड्यांची देखभाल, दुरुस्ती केली जाते. एका मोठ्या यंत्रणेच्या माध्यमातून कारशेडचे काम चालते.

आणखी दोन हजार झाडांवर कुऱ्हाड?; आरे कारशेडसाठी पर्यावरणवाद्यांची भीती

मेट्रो ३च्या कारशेडचा नेमका वाद काय?

मूळ प्रस्तावानुसार मेट्रो ३ ची कारशेड गोरेगाव येथील जंगलातील ३३ एकर जागेवर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आरेतील जागा ताब्यात घेण्यात आली. आरे कारशेडविरोधातील याचिकाकार्त्यांच्या आणि पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार एमएमआरसीएलने ३३ एकरऐवजी ६५ एकर जागा कारशेडसाठी ताब्यात घेतली आहे. या जागेवर काम सुरू करण्यासाठी एमएमआरसीएलला २००० हून अधिक झाडे कापावी लागणार होती. त्यानुसार नोव्हेंबर २०१४ मध्ये आरेतील झाडांवर ती कापण्यासंबंधीच्या नोटिसा लावण्यात आल्या. आरेत येणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी या नोटिसा पाहिल्यावर आरे कारशेडला विरोध करण्यास सुरुवात केली आणि

आरे वादाची पहिली ठिणगी पडली. नागरिकांनी मोठ्या संख्येने याविरोधात पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सूचना-हरकती दाखल केल्या. डिसेंबरमध्ये २०१४ मध्ये आरे कारशेडविरोधात पहिली याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यानंतर आरेविरुद्ध सरकार असा लढा सुरू झाला. हा लढा केवळ न्यायालयापुरता मर्यादित न रहाता आंदोलनात परिवर्तित झाला. ‘सेव्ह आरे’ म्हणत पर्यावरणप्रेमींनी २०१५मध्ये मरीन ड्राइव्ह येथे मानवी साखळी तयार करून मोठे आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनाची मालिका सुरू झाली आणि दुसरीकडे न्यायालयीन लढाही सुरू राहिला. दरम्यानच्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्पाचे काम कधी सुरू राहिले तर कधी बंद राहिले. एकूणच आरे वाद कायम होता. मात्र एका घटनेमुळे हा वाद २०१९ चिघळला.

आरे कारशेडचे काम वर्षभरात ; खोटय़ा पर्यावरणवाद्यांचे आंदोलन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

४ ऑक्टोबरच्या रात्री काय घडले?

विरोध डावलून २०१७ मध्ये आरेत कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आंदोलकांनी रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई तीव्र केली. ४ ऑक्टोबर २०१९ मध्ये एमएमआरसीएलला न्यायालयाकडून झाडे तोडण्यास परवानगी मिळाली. ही परवानगी मिळून काही तास होत नाहीत तोच रात्री आठ वाजता एमएमआरसीएलने झाडे कापण्यास सुरुवात केली. रात्रीच्या अंधारात झाडे कापली जात असल्याचे समजताच आरेवासीयांनी आणि पर्यावरणप्रेमींनी आरेत धाव घेत वृक्षतोड रोखण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस बळाचा वापर करून वृक्षतोड सुरूच ठेवण्यात आली. अंधारात झाडे कापली जात असल्याचे वृत्त जसजसे पसरत गेले तसे पर्यावरणप्रेमीच नाही तर सर्वसामान्य मुंबईकरांनी मोठ्या संख्येने आरेत धाव घेण्यास सुरुवात केली. रात्री मोठे आंदोलन सुरू झाले. पोलिसांनी अनेकांना अटक केली आणि अटक केलेल्या २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान हा वाद चिघळल्यानंतर वृक्षतोड थांबविण्यात आली. मात्र तोपर्यंत २०० हून अधिक झाडे कापली गेली होती. सरकार, एमएमआरसीएलविरोधात नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला. यानंतर अनेक दिवस आरेत आंदोलने सुरू होती. ४ ऑक्टोबरच्या रात्रीनंतर पर्यावरणप्रेमींनी तात्काळ न्यायालयात धाव घेऊन वृक्षतोडीस स्थगिती मिळवली. त्यानंतर अनेक दिवस आरेत सलग आंदोलने सुरू होती. दोन दिवसांनंतर २९ जणांची सुटका झाली. पण खटले सुरूच राहिले. काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जणांविरोधातील गुन्हे मागे घेतले.

मेट्रो ३, समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदर ; भाजपाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेग घेणार

आरेतून कारशेड कंजूरमार्गला?

अंधारात झाडे कापण्याच्या प्रकाराचा शिवसेनेकडूनही निषेध करण्यात आला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आरेतील कारशेड रद्द केली. तसेच पुढे कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलविले. मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर ते कांजूरमार्ग) च्या कारशेडच्या जागेवर मेट्रो  ३ ची कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र याला फडणवीस यांनी विरोध केला. त्यानंतर कांजूरवरूनही वाद सुरू झाला आणि या वादात केंद्र सरकारने उडी घेतली. कांजूरची जागा आपल्या मालकीची असल्याचे सांगून न्यायालयात धाव घेतली आणि कामाला स्थगिती मिळवली. परिणामी कारशेड पुन्हा रखडली. आजही हा न्यायालयीन वाद सुरू आहे.

विश्लेषण : कांजूरमार्ग कारशेडवरून वाद का?

पुन्हा आमने-सामने?

कांजूरच्या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून कारशेडचा प्रश्न सोडविण्यासाठी बीकेसी, पहाडी गोरेगावसारखे पर्याय पुढे आले. त्याची चाचपणी सुरू असताना आता सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम मेट्रो ३ ची कारशेड पुन्हा आरेत हलविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार न्यायालयात भूमिका मांडण्याचे आदेश महाधिवक्त्यांना दिले आहेत. आरेत कारशेड करण्याच्या नव्या सरकारच्या भूमिकेवरून पुन्हा आरे वाद चिघळला. आरेत कारशेड करण्याच्या नव्या सरकारच्या निर्णयाला आता जोरदार विरोध होत आहे. आरे वाचवा आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. फडणवीस आरेतच कारशेड करण्यावर ठाम असल्याने आता हा वाद आणखी चिघळणार आहे. यामुळे मेट्रो ३ प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained why a new aarey metro car shed argument print exp abn

ताज्या बातम्या