पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बुधवारी (७ मे) सकाळी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू – काश्मीर (पीओजेके) मधील नऊ ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर भारतीय लष्कराकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. जागतिक माध्यमांनी पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यांबद्दल आणि त्यानंतर झालेल्या गोळीबाराबद्दल वृत्त दिले. काही वृत्तांत हा हल्ला २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यावर केंद्रित होता असे सांगण्यात आले, तर काहींनी दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील तणाव वाढत असल्याचे म्हटले. जगाच्या विविध कोपऱ्यातून या ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल काय प्रतिक्रिया उमटल्या, जाणून घेऊयात.
१. अमेरिका
अमेरिकेतील दोन सर्वात मोठ्या मीडिया संस्था द वॉल स्ट्रीट जर्नल आणि द न्यूयॉर्क टाईम्स यांनी पहलगाम हल्ल्यांचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटले, “हा हल्ला काश्मीरमधील पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याचा बदला होता, ज्यामुळे अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष वाढला आहे.” ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे, “भारतीय सैन्याने त्यांच्या लष्करी ऑपरेशनला सिंदूर नाव दिले आहे. सिंदूर हिंदू महिला लग्नानंतर त्यांच्या भांगेमध्ये भारतात, तिथून हे नाव आले आहे. यातून दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ दिसून येतो. यात पत्नींसमोर त्यांच्या पतींना मारण्यात आले होते.”

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने असेही म्हटले की, भारताने भूतकाळातही पीओजेकेवर हल्ले केले आहेत, मात्र बुधवारचा पाकिस्तानी हद्दीत करण्यात आलेला पंजाबवरील हल्ला हा दोन अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष वाढवणारा होता.” त्यांनी त्यांच्या वृत्तामध्ये या हल्ल्यांवर पाकिस्तानने दिलेली प्रतिक्रिया आणि भारतीय विमाने पाडल्याच्या दाव्यांविषयीचेदेखील वर्णन केले आहे.
२. ब्रिटन
ब्रिटनची प्रसिद्ध वृत्त वाहिनी ‘बीबीसी’ने म्हटले, “भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, हे हल्ले २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर होते. त्या हल्ल्यामध्ये २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता. पहलगाम हल्ला गेल्या दोन दशकांमधील या प्रदेशातील नागरिकांवर झालेला सर्वात वाईट हल्ला होता आणि त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला होता,” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या वृत्तात असेही म्हटले आहे, “पहलगाममधील हल्ला केल्याचा संशय असलेल्या कोणत्याही गटाचे नाव भारताने घेतलेले नाही आणि तो कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, भारतीय सैन्याने दोन हल्लेखोर पाकिस्तानी नागरिक असल्याचा आरोप केला आहे, तर केंद्र सरकारने पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केला आहे. हे आरोप पाकिस्तानने नाकारले आहेत. त्यानंतरच्या दोन आठवड्यांत दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात पावले उचलली.” काश्मीर हा दोन्ही देशांमधील महत्त्वाचा मुद्दा का राहिला आहे, याचे विश्लेषणदेखील त्यांच्या वृत्तात करण्यात आले. पुलवामा हल्ल्यासारख्या संघर्षांच्या धोक्याबद्दल जग सतर्क आहे, असेही त्यात म्हटले आहे.
३. फ्रान्स
फ्रान्समधील सर्वात मोठ्या वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या ‘ले मोंडेने’ या हल्ल्यांवरील पाकिस्तानच्या प्रतिसादावर, भारतातील राजकीय विरोधी पक्षाने सरकारबरोबर उभे राहण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल लिहिले. “त्यांनी म्हटले, २०१६ मध्ये उरी येथे झालेल्या हल्ल्यांच्या आणि २०१९ च्या पुलवामा हल्ल्यांच्या तुलनेत तणाव खूप वाढला आहे आणि प्रत्युत्तरात्मक हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याच्या विधानाचाही त्यांनी आपल्या वृत्तात उल्लेख केला. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटले, पाकिस्तानच्या आझाद काश्मीर प्रदेशातील नीलम-झेलम जलविद्युत धरणाचे नुकसान केल्याचा आरोपही भारतावर केला. वृत्तात म्हटले, सत्ता लष्करी जनरल असीम मुनीर यांच्या हातात आहे. मुनीर यांनी अलीकडच्या काळात लष्करी सराव आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या दोन चाचण्यांद्वारे आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.
४. जर्मनी
जर्मन वृत्तसंस्था ‘डीडब्ल्यू’च्या वृत्तात हल्ल्याची चर्चा करण्यात आली आणि काश्मीर संघर्षाचे विश्लेषण देण्यात आले. त्यामध्ये म्हटले की, “या मतभेदामुळे अनेक युद्धे, बंडखोरी आणि दशकांपासून सुरू असलेले राजनैतिक शत्रुत्व वाढू शकते.” याच वृत्तातील दुसऱ्या एका भागात म्हटले की, येत्या काही दिवसांत भारत आणि पाकिस्तान राजनैतिक आणि लष्करी परिणामांचे व्यवस्थापन कसे करतात यावर सर्वकाहीअवलंबून असेल. आतापर्यंत, भारताने आपले हल्ले गैर-लष्करी लक्ष्यांपुरते मर्यादित ठेवले आहेत आणि हवाई हद्दीचे उल्लंघन टाळले आहे, तर पाकिस्तानने तोफखान्याने गोळीबार केला आहे आणि भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला आहे, परंतु अद्याप आक्रमक हल्ले सुरू केलेले नाहीत.”
५. तुर्की
तुर्कीची सरकारी वृत्तसंस्था ‘अनादोलू’ने म्हटले आहे की, बुधवारी भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांत अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. भारतीय लष्कराच्या विधानांबरोबरच, त्यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी आणि पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्याही विधानांचा उल्लेख केला. अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने भारताविरुद्ध प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले आहेत. वृत्तांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या टिप्पण्यांचाही समावेश आहे
६. संयुक्त अरब अमिराती (यूएई)
यूएईचे सरकारी मालकीचे दैनिक ‘द नॅशनल’ने हल्ल्यांबद्दल वृत्त दिले आहे. त्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद यांनी भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे, तणाव कमी करण्याचे आणि प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय शांततेला धोका निर्माण होईल, अशा कृती टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे पूंछ शहरात भीतीचे वातावरण आहे आणि घरे जाळली जात आहेत, ज्यामुळे शेकडो लोकांना पळून जावे लागले आहे किंवा भूमिगत बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. भारताच्या हल्ल्यांचा बदला म्हणून हा गोळीबार करण्यात आला आहे, असेही त्यात म्हटले आहे.
७. इराण
सरकारी इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सीने म्हटले आहे की, “भारतीय हवाई हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारतीय हवाई हल्ल्यात किमान २६ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला, तर ४६ जण जखमी झाले. पहलगाममधील दहशतवादी हल्ला या तणावासाठी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने या घटनेची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची तयारी दर्शविली आहे.” इराणच्या वृत्तात भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीचा उल्लेख करत म्हटले की, बहावलपूर आणि मुरीदके य दहशतवादी गटाच्या मुख्यालयावर हल्ला करण्यासाठी भारताने ड्रोनसह अचूक स्ट्राइक शस्त्र प्रणाली वापरली.
८. चीन
चीनची सरकारी मीडिया एजन्सी शिन्हुआने म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानमधील सहा नागरी वस्त्यांवर केलेल्या हल्ल्यात किमान २६ लोक ठार झाले आणि ४६ जण जखमी झाले. त्यात पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक अहमद शरीफ चौधरी यांचा हवाला देण्यात आला. सरकारी मीडिया एजन्सीने आपल्या वृत्तात असे नमूद केले की, भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी-प्रशिक्षण शिबिरांवर केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी भारताने केलेल्या रात्रीच्या हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून आम्ही पाच भारतीय लढाऊ विमाने पाडली.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी बुधवारी म्हटले की, चीन आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर काम करण्यास आणि सध्याचा तणाव कमी करण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावण्यास तयार आहे. ते म्हणाले, “आज सकाळी भारताने केलेली लष्करी कारवाई आम्हाला खेदजनक वाटते आणि त्यामुळे बदलणाऱ्या परिस्थितीबद्दल आम्हाला चिंता आहे.” ते पुढे म्हणाले, “भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहेत आणि नेहमीच राहतील. ते दोघेही चीनचे शेजारी देश आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. आम्ही दोन्ही बाजूंनी शांतता आणि स्थिरतेचे, शांत राहण्याचे, संयम बाळगण्याचे आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची ठरेल अशा कृती करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करतो,” असे ते म्हणाले.
९. रशिया
रशियाच्या सरकारी ‘TASS’ वृत्तसंस्थेने भारतीय संरक्षण मंत्रालयाची काही विधाने प्रसिद्ध केली. या विधानांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, हे हल्ले म्हणजे सीमापार दहशतवादी मुळांना लक्ष्य करणे होते. त्यात असेही सांगण्यात आले आहे की, एकाही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य केले गेले नाही. रशियाच्या वृत्तात असे म्हटले आहे की, २२ एप्रिल रोजी झालेले दहशतवादी हल्ले हे या वाढत्या समस्येचे कारण आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, “भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी संघर्षाबद्दल रशियाला खूप चिंता आहे. या क्षेत्रातील परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून एजन्सीने दोन्ही राष्ट्रांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.”