Who is General Dan Caine Architect of US Airstrike इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष चिघळत असताना अमेरिकेने या युद्धात उडी घेतली. रविवारी अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांज व इस्फहानमधील अणुकेंद्रांवर हल्ला केला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर सुरू असलेला हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. रशिया, चीन, कतारसह सौदी अरेबियासारख्या देशांनी अमेरिकेच्या हल्ल्याला विरोध दर्शविला आहे. इराणमधील अणुकेंद्रावर हल्ला केल्याच्या १३ तासांनंतर अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल डॅन केन यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते या ऑपरेशन मिडनाइट हॅमरचे मास्टरमाइंड होते.
जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन म्हणाले की, अमेरिकेने बंकर-बस्टर बॉम्ब आणि दोन डझनहून अधिक टोमहॉक क्षेपणास्त्रांसह ७५ अचूक-मार्गदर्शित शस्त्रे वापरून तीन इराणी अणुकेंद्रांना लक्ष्य करण्यात आले. डॅन केन आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी पेंटागॉन येथे पत्रकारांना या हल्ल्याबाबतची माहिती दिली. त्यांनी या मोहिमेचे वर्णन डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाल सर्वांत गंभीर लष्करी मोहीम, असे केले. कोण आहेत डॅन केन? त्यांनी या मोहिमेत कोणती भूमिका बजावली? त्याविषयी जाणून घेऊयात.

कोण आहेत डॅन केन?
- डॅन केन हे अमेरिकेच्या ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’चे मास्टरमाइंड होते.
- ही माहिती अनेक अमेरिकन अधिकारी आणि या मोहिमेशी संबंधित लोकांनी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिली.
- अमेरिकेने इराणवर हल्ले करण्यासाठी ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ राबवले होते.
- डॅन केन हे देशाचे सर्वोच्च दर्जाचे लष्करी अधिकारी असून, ते राष्ट्राध्यक्ष, संरक्षण सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे मुख्य लष्करी सल्लागार आहेत. ११ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी ही भूमिका स्वीकारली.
यापूर्वी त्यांनी सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीमध्ये लष्करी व्यवहारांचे सहयोगी संचालक म्हणून काम केले. गेल्या काही वर्षांत, डॅन केन यांनी ऑपरेशन्स, स्टाफ ड्युटी व जॉइंट कमांडमध्ये अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. त्यांनी एफ-१६ फायटर वैमानिक, शस्त्र अधिकारी, व्हाईट हाऊस स्टाफ मेंबर व विशेष ऑपरेशन्स ऑफिसर म्हणूनदेखील काम केले आहे.
त्यांनी हार्वर्ड केनेडी स्कूल आणि सिराक्युज विद्यापीठाच्या मॅक्सवेल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी अभ्यासासह विद्यापीठातील विविध सुरक्षा कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. केन यांनी कमांड पायलट म्हणून एफ-१६ २,८०० तासांहून अधिक उड्डाण केले आहे. त्यांनी या विमानाचे वैमानिक म्हणून युद्धातही भाग घेतला आहे. २००९ ते २०१६ दरम्यान, त्यांनी उद्योजक आणि गुंतवणूकदार म्हणून काम करत असताना नॅशनल गार्डमध्येही सेवा दिली आहे.
११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर वॉशिंग्टनच्या रक्षणासाठी काही विमाने तैनात करण्यात आली होती. त्यापैकी एक विमान केन यांचेदेखील होते. त्यावेळी अमेरिकेच्या राजधानीचे रक्षण करण्यासाठी पहिल्यांदाच लढाऊ विमाने पाठविण्यात आली होती. त्यांनी मे २०१८ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत इराक आणि सीरियामध्ये आयसीसविरोधात सुरू असलेल्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लढाईत उपकमांडर म्हणूनदेखील काम केले.
अमेरिकेने इराणवर कसा हल्ला केला? डॅन केन काय म्हणाले?
इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले कसे केले गेले याची तपशीलवार माहिती केन यांनी दिली. त्यांनी संयम राखण्यास सांगितले आणि या हल्ल्यात नक्की काय नुकसान झाले याचे मूल्यांकन प्रलंबित असल्याची माहिती दिली. ज्या ठिकाणी हल्ले करण्यात आले, त्या ठिकाणी काय असू शकते, हे मी तुम्हाला आताच सांगू शकत नाही, असे ते म्हणाले. हे ऑपरेशन अत्यंत गुंतगुंतीचे आणि उच्च जोखमीचे होते, असे केन यांनी सांगितले. त्यांनी अशीदेखील माहिती दिली की, या ऑपरेशनची माहिती मोजक्याच लोकांना होती आणि त्यात गुप्तता राखण्यात आली होती.
लक्ष विचलित करण्यासाठी बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सनी शनिवारी पॅसिफिकवरून ग्वामच्या दिशेने उड्डाण केले. त्यामुळे इराणला वाटले की, हल्ला तेथून होणार आहे. हादेखील या मोहिमेसाठी वापरलेल्या क्लृप्तीचा एक भाग होता, असे ते म्हणाले. मोहिमेत वापरलेल्या प्रत्यक्ष बी-२ बॉम्बर्सने आधीच उड्डाण केले होते. शनिवारी रात्री लक्ष्य गाठण्यासाठी बी-२ बॉम्बर्सने १८ तास अंधारात उड्डाण केले. त्यांनी माहिती दिली की, बी-२ ने न थांबता उड्डाण केले आणि त्यांना हवेतच अनेक वेळा इंधन भरावे लागले. २००१ नंतरची ही सर्वांत मोठी हवाई मोहीम असल्याचेही त्यांनी सांगितले.
केन यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण १४ बंकर-बॉम्ब टाकण्यात आले. त्यातील पहिले दोन इराणच्या वेळेनुसार पहाटे २ वाजता टाकण्यात आले. या मोहिमेत एका अमेरिकन पाणबुडीचाही समावेश होता. या पाणबुडीवरून प्रमुख लक्ष्यांवर दोन डझनहून अधिक टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. केन यांनी असेही सांगितले की, हल्ल्यादरम्यान इराणने लढाऊ विमाने किंवा जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे डागली नाहीत.
या हल्ल्यानंतर इराण कसे प्रत्युत्तर देईल हे अनिश्चित आहे. इराण पश्चिम आशियातील अमेरिकन सैन्यावर हल्ले करू शकतो, महत्त्वाचा तेल मार्ग रोखण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा त्यांचा अणुकार्यक्रम वेगवान करण्याचा प्रयत्न करू शकतो. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी इशारा दिला की, इराणने या प्रदेशातील अमेरिकन तळांवर हल्ला करणे मूर्खपणाचे ठरेल.