हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच विश्वविजेतेपद मिळवले. या कामगिरीनंतर तिचे सर्वच स्तरावर कौतुक होताना दिसत आहे. मात्र, त्याआधी तिच्या कामगिरीवर अनेकांनी टीका केली. विश्वचषकामध्ये तिच्या नेतृत्वगुणाने किती फरक पडला, आगामी काळात हरमनप्रीतची भूमिका संघासाठी किती महत्त्वाची असेल, याचा हा आढावा.
शफालीला गोलंदाजी देणे
प्रतिका रावल जायबंदी झाल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाकडून शफाली वर्माला संघात स्थान देण्यात आले. अंतिम सामन्यात सुरुवातीला शफालीने चांगली फलंदाजी केली. मग, भारतीय संघ क्षेत्ररक्षणाला उतरला. दक्षिण आफ्रिकेसाठी लॉरा वोल्वार्ड आणि सुने लस चांगली फलंदाजी करत होत्या. त्यामुळे भारतावर गडी बाद करण्यासाठी दबाव होता. अखेर हरमनप्रीतने शफालीच्या हातात चेंडू देण्याचा अनपेक्षित निर्णय घेतला. यानंतर शफालीने लस आणि नंतर मारिझान काप यांना माघारी पाठवीत संघाच्या अडचणी दूर केल्या. शफाली बऱ्याच काळपासून एकदिवसीय क्रिकेट संघात नव्हती. ट्वेन्टी-२० आणि कसोटी संघातून ती सहभाग नोंदवते. त्यामुळे तिला चेंडू दिल्यानंतर अनेकांनी हरमनप्रीतच्या या निर्णायवर भुवया उंचावल्या. मात्र, अखेर तिचा हाच निर्णय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरला.
नॉकआऊट फेऱ्यांमध्ये विक्रमवीर
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांमध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने बाद फेरीतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला. हरमनप्रीतने चार बाद फेरीतील सामन्यांत एकूण ३३१ धावा केल्या आहेत. तिने ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कचा सात सामन्यांतील ३३० धावांचा विक्रम मोडीत काढला. अंतिम सामन्यात हरमनप्रीतने २० धावा केल्या, तरी हा अपवाद वगळता मोक्याच्या सामन्यांमध्ये तिचा खेळ बहरतो हे वारंवार दिसून येते. २०१७ एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ धावांची नाबाद खेळी केली होती. हरमनप्रीत, बेलिंडानंतर ऑस्ट्रेलियाचा एलिसा हिली (३०९), इंग्लंडची नॅट स्किव्हर-ब्रंट (२८१) आणि न्यूझीलंडच्या डेबी हॉकलेचा (२४०) क्रमांक येतो.
नेत्रदीपक नेतृत्वझळाळी
आतापर्यंत हरमनप्रीतने ४८ एकदिवसीय, १२६ ट्वेन्टी-२० आणि तीन कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व केले. यामध्ये एकदिवसीय प्रारूपात ३०, ट्वेन्टी-२० मध्ये ७४ विजय नोंदवले गेले. कसोटीत तिच्या नेतृत्वाखाली भारताने निर्भेळ यश संपादन केले. ट्वेन्टी-२० प्रारूपात भारताने हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली चुणूक दाखवली. भारताने तीन ट्वेन्टी-२० विश्वचषकांमध्ये बाद फेरी गाठली. २०२०च्या विश्वचषकात भारताने अंतिम फेरीत धडक मारीत सर्वांचे लक्ष वेधले. २०१६ आणि २०२२ मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेवरही तिच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद मिळवले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये ट्वेन्टी-२० प्रारूपात यामध्येही संघाने रौप्य कामगिरी केली. २०१७च्या एकदिवसीय विश्वचषक संघात ती सहभागी होती. मिताली राजने निवृत्ती घेतल्यानंतर एकदिवसीय कर्णधारपदाची जबाबदारीही तिच्यावर आली.
माजी खेळाडूंचे मत
एकदिवसीय विश्वचषक उंचावल्यानंतर भारताच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांच्यानुसार हरमनप्रीतने संघाच्या भविष्याकरिता कर्णधारपदावरून पायउतार व्हावे असे म्हटले आहे. हरमनप्रीतसाठी कर्णधारपद सोडणे फायद्याचे ठरेल, कारण त्यानंतर ती फलंदाजी व क्षेत्ररक्षणावर अधिक लक्ष देऊ शकते, असे रंगास्वामी यांना वाटते. भारताची पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ही २०२९ तर, ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी होईल. हरमनप्रीत ही चांगली फलंदाज व क्षेत्ररक्षक आहे. कर्णधारपदाची जबाबदारी नसेल तर हरमनप्रीतची कामगिरी आणखी उंचावू शकेल. सध्याच्या स्थितीत हे बोलणे चुकीचे असले, तरीही संघाचे हित पाहता तिचे फलंदाजीतील योगदान संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. आणखी तीन ते चार वर्षे तिच्याकडे आहेत. हरमनप्रीतची जबाबदारी स्मृतीने घ्यावी. भविष्यातील विश्वचषकाचाही विचार करणे संघाच्या दृष्टीने गरजेचे आहे, असे रंगास्वामी म्हणाल्या. पुरुषांच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स करंडक उंचावला होता. मात्र, त्यानंतर निवड समितीने त्याच्यावरील कर्णधारपदाची जबाबदारी गिलवर सोपवली, हे उदाहरण रंगास्वामी यांनी दिले.
हरमनप्रीतनंतर कर्णधार कोण?
हरमनप्रीतनंतर कर्णधारपदाची सर्वांत प्रबळ दावेदार ही स्मृती मनधाना आहे. स्मृतीने आतापर्यंत भारतासाठी सात कसोटी, ११४ एकदिवसीय आणि १५३ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला. सध्या ती भारतीय संघाची उपकर्णधार आहे. भारताची ती महत्त्वाची फलंदाज असून सर्वच प्रारूपात तिने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मनधानापेक्षा तुलनेने कमी अनुभव असणारी जेमिमा रॉड्रिग्जही कर्णधारपदाच्या शर्यतीत असेल. तिने आतापर्यंत तीन कसोटी, ५९ एकदिवसीय आणि ११२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. फलंदाजीसह क्षेत्ररक्षणात तिने नेहमीच संघासाठी कामगिरी उंचावली आहे. यासह भारतीय सर्वांत अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्माच्या नावाची चर्चा होऊ शकते. दीप्तीने आतापर्यंत भारतासाठी दोन कसोटी, ८० एकदिवसीय व ८९ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. तिने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवले.
