बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवून मुंबई शहराचं ‘थ्री डायमेन्शनल डिजिटल मॉडेल’ तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. वरळी परिसरातील प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे, आता संपूर्ण शहराचा थ्रीडी नकाशा तयार करण्याचा बीएमसीचा मानस आहे. चला तर मग जाणून घेऊया थ्रीडी मॅपिंग म्हणजे काय? आणि बीएमसीनं हा प्रकल्प हाती का घेतला आहे?

थ्रीडी मॅपिंग म्हणजे काय?
थ्रीडी मॅपिंगच्या प्रक्रियेमुळे मुंबईतील इमारती, रस्ते, पूल, अंडरपास, जलकुंभ, वाहतुकीच्या पद्धती, बेटे याशिवाय मोकळ्या जागा, नागरी सुविधा आणि झोपडपट्ट्यांचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल. या नकाशामध्ये ३६० अंश कोनात पॅनोरॅमिक स्ट्रीट व्ह्यू दिसणार आहे. पूर्ण मुंबईत पहिल्यांदाच हा प्रकल्प राबवला जात आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये बीएमसीने वरळी क्षेत्राचं थ्रीडी मॅपिंग पूर्ण केलं आहे.

मुंबईतील किती क्षेत्रफळाचं थ्रीडी मॅपिंग केलं जाणार
मुंबई शहराचं एकूण क्षेत्रफळ ४८० चौरस किलोमीटर इतकं आहे. पण आता मॅपिंग साधने वापरताना आवश्यक असलेली ‘बफर स्पेस’ लक्षात घेता अंदाजे ५०० चौरस किमी क्षेत्रासाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने हा प्रकल्पाची पूर्ण करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून किंवा कंत्राटदारांकडून प्रस्ताव मागवले आहेत. तसेच या प्रकल्पाबाबत काही सूचना किंवा नवीन कल्पना असल्यास तज्ज्ञांकजून माहिती मागवण्यात येत आहे. या प्रक्रियेनंतर १८ महिन्यांच्या कालमर्यादेसह हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी थर्ड पार्टीची कंत्राटदार म्हणून नियुक्ती केली जाईल. तसेच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांत शहरात झालेल्या बदलांचा थ्रीडी नकाशादेखील तयार करण्यात येणार आहे.

थ्रीडी नकाशा कशासाठी?
संबंधित प्रकल्पाच्या उपयोगितेबाबत माहिती देताना बीएमसीनं आपल्या प्रस्तावात म्हटलं की, “आपण ज्या जगात राहतो ते जग त्रिमितीय स्वरूपाचे (थ्री डायमेन्शनल) आहे. असं असूनही शहरी प्रशासनाकडून विविध विकास उपक्रम, शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अजूनही 2D नकाशाचा वापर केला जातो. २१ व्या शतकात वाढत्या शहरांची गरज लक्षात घेऊन शहराचं ३६० अंशात व्हिज्युअलाइझ करणं आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणांचं तपशीलवार विश्लेषण करणं सोपं जाईल. 2D नकाशावर असं विश्लेषण करणं शक्य नाही.”

थ्रीडी नकाशाचे फायदे काय असतील?
या प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेला थ्रीडी नकाशा महानगरपालिका प्रशासनाकडून खाजगी क्लाउडवर अपलोड केला जाईल. त्यानंतर प्रशासनाकडून संबंधित नकाशाचा वापर पायाभूत सुविधा, विकास नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण विश्लेषणासाठी केला जाऊ शकतो. याद्वारे शहराच्या आराखड्यात झालेले अनधिकृत बदलदेखील शोधले जाऊ शकतात. तसेच मुंबई अग्निशमन दलाचे कार्य, सध्याचे रस्ते आणि पुलांचे नियोजन, मालमत्ता कराचा अंदाज आणि संकलन यासारख्या कामांसाठी देखील या थ्रीडी नकाशाचा वापर केला जाऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकल्पासाठी कोणती साधनं वापरली जातील?
हा थ्रीडी नकाशा तयार करणासाठी एरियल फोटोग्रामेट्रीचा वापर केला जाईल, ज्यामुळे वस्तूंमधील अंतर आणि मोजमापांचे मॅपिंग शक्य होते. लाइट डिटेक्शन आणि रेंजिंग (LiDAR) सर्वेक्षण, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS), रिमोट सेन्सिंग (RS) आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) आदी तंत्रज्ञानाच्या मदतीने हे थ्रीडी मॅपिंग केलं जाणार आहे.