सौदी अरेबियाच्या जेद्दा येथे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) झालेल्या लिलावात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक २७ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला आपल्या संघात सहभागी करून घेतले. तर, कोलकाता नाइट रायडर्सला गेल्या हंगामात जेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरवर २६.७५ कोटी रुपयांची दुसरी सर्वाधिक बोली लागली. अष्टपैलू वेंकटेश अय्यरला अनपेक्षित २३.७५ कोटी रुपयांना कोलकाता नाइट रायडर्स संघाने आपल्या ताफ्यात घेतले. तर, लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वांचे लक्ष वेधले. पंत व श्रेयसला इतक्या कोटी रुपयांची बोली लागण्याचे कारण काय, वेगवान गोलंदाजांसाठी संघांमध्ये चुरस का पहायला मिळाली, याचा घेतलेला हा आढावा…

पंतला सर्वाधिक बोली…

ऋषभ पंतवर आजवरच्या ‘आयपीएल’मधील सर्वाधिक बोली लागली. त्याच्यावर ही बोली लागणे अपेक्षित होते. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला लिलावापूर्वी करारमुक्त केल्याने पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरेल अशी चर्चा होती आणि झालेही तसेच. पंतसाठी सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. मात्र, अखेरीस लखनऊने त्याला २७ कोटी रुपयांना घेतले. दिल्लीने पंतची बोली २०.७५ कोटीवर असताना राईट टू मॅच कार्डचा (आरटीएम) वापर केला. मात्र, लखनऊने २७ कोटी देण्याची तयारी दर्शवल्याने अखेर त्यांनी माघार घेतली. केएल राहुलला लखनऊने करारमुक्त केल्यानंतर पंतला आपल्या संघात सहभागी करण्यासाठी लखनऊचा संघ उत्सुक दिसला. गेल्या हंगामात पंतने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. त्यामुळे पंतला लखनऊच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. पंत हा आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. अपघातानंतर पंतने गेल्या ‘आयपीएल’ हंगामात पुनरागमन केले. त्यानंतर भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेतेपद मिळवणाऱ्या संघातही त्याने आपले योगदान दिले. भारताच्या तिन्ही प्रारुपांतील तो एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. ‘आयपीएल’च्या आजवरच्या कारकीर्दीत पंतने १११ सामन्यांत ३२८४ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक व १८ अर्धशतकांचा समावेश आहे. पंत सध्या चांगल्या लयीत आहे आणि लखनऊ संघाला त्याचा फायदा होऊ शकतो.

हेही वाचा >>>विश्लेषण: ऐतिहासिक गोरखा रेजिमेंटला नेपाळी गोरखाच का मिळेनात?

श्रेयस अय्यरसाठी चढाओढ का?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) केंद्रीय करारातून श्रेयस अय्यरला वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यात अडचण निर्माण होत असली. तर, स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना श्रेयस चांगल्या लयीत दिसत आहे. रणजी करंडकाच्या पहिल्या टप्प्यात त्याने दोन शतके झळकावली. तर, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावत आपली लय कायम राखली. त्यातच गेल्या ‘आयपीएल’ हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून देण्यातही कर्णधार श्रेयसने आपले योगदान दिले. त्यामुळे अर्थातच श्रेयस अनेक संघांची पसंती होती. पंजाब संघाने केवळ दोनच अनकॅप्ड (भारताकडून न खेळलेले) खेळाडूंना लिलावापूर्वी संघात कायम ठेवल्याने कर्णधार म्हणून ते खेळाडूच्या शोधात होते. श्रेयसला २६.७५ कोटी रुपयांना घेत त्यांनी कदाचित आपला हा प्रश्न मार्गी लावला आहे.  त्याआधी श्रेयससाठी दिल्ली कॅपिटल्स व पंजाब यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र, अखेर पंजाबला कायम राखण्यात यश मिळाले. कोलकाता संघात येण्यापूर्वी श्रेयसने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते व त्याच्या नेतृत्वात संघाने चमकही दाखवली होती. पंजाबसाठीही आगामी काळात तो अशी कामगिरी करेल का, याकडे सर्वांचे लक्ष राहील.

वेंकटेश अय्यरसाठी इतके कोटी का?

अष्टपैलू वेंकटेश अय्यरला कोलकाता नाइट रायडर्स संघाने करारमुक्त केले होते. मात्र, लिलावात त्यालाच २३.७५ कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले. तो या लिलावातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. गेल्या हंगामात वेंकटेशने कोलकाताकडून खेळताना चार अर्धशतकांसह ३७० धावा केल्या होत्या. तो गेले चार हंगाम कोलकाता संघाकडूनच खेळला आहे. भारताकडून त्याने अखेरचा सामना हा २०२२मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळालेले नाही. त्याने आतापर्यंत भारतासाठी दोन एकदिवसीय व नऊ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. मध्यक्रमात वेंकटेश हा जलदगतीने धावा करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, कोलकाताने त्याच्यासाठी खर्ची केलेल्या रकमेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा >>>विश्लेषण : भाजपचे ‘मिशन मुंबई’ आता पूर्ण होणार? महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी जोरात?

वेगवान गोलंदाजांसाठी चुरस

‘आयपीएल’ लिलावाच्या दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी सर्वांचे लक्ष वेधले. यामध्ये सर्वाधिक भारतीय गोलंदाजांचा समावेश होता. दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमारने आपल्या अनुभवाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने १० कोटी ७५ लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. दुखापतींचा सामना करत असलेल्या दीपक चहरलाही मुंबई इंडियन्सने नऊ कोटी २५ लाख रुपयांना आपल्या संघात घेतले. तर, कसोटी संघातील राखीव वेगवान गोलंदाज असलेल्या मुकेश कुमारसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने आठ कोटी रुपये खर्ची घातले. भुवनेश्वरने आतापर्यंत २८७ ट्वेन्टी-२० सामन्यांत ३०० बळी मिळवले. त्याने भारताकडून अखेरचा सामना नोव्हेंबर २०२२मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. प्रत्येक संघाला कमीत कमी तीन भारतीय वेगवान गोलंदाज हवे होते. त्यातच त्यांची लिलावातील संख्या पाहता भुवनेश्वर, चहर, मुकेश यांचा फायदा झाला. आकाश दीपला लखनऊ सुपर जायंट्सने आठ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. चहर आणि भुवनेश्वर दोन्ही गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडू स्विंग करण्यात सक्षम आहेत. तर, मुकेश हाणामारीच्या षटकांमध्ये यॉर्कर टाकण्यात सक्षम आहे. तुषार देशपांडेला राजस्थान राॅयल्सने तब्बल ६ कोटी ५० लाख रुपयांना संघात सहभागी करून घेतले. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सनला पंजाब किंग्जने सात कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. गेल्यावेळी १८ कोटी रुपये इतकी किंमत मिळालेल्या इंग्लंडच्या सॅम करनला चेन्नई सुपर किंग्जने दोन कोटी ४० लाख रुपयांना खरेदी केले. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला गुजरात टायटन्सने ३ कोटी २० लाखांना सहभागी करुन घेतले. हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्याला बंगळूरुने पाच कोटी ७५ लाखांना आपल्या संघात स्थान दिले.

१३ वर्षीय वैभव सूर्यवंशीला मागणी का?

बिहारचा १३ वर्षीय वैभव सुर्यवंशी ‘आयपीएल’ लिलावातील सर्वात युवा खेळाडू होता. राजस्थान रॉयल्सने त्याला एक कोटी दहा लाखाला आपल्या संघात घेतले. त्याची मूळ किंमत ही ३० लाख रुपये होती. सूर्यवंशीने नुकतेच चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना शतक झळकावले होते. सूर्यवंशीने या सामन्यात ६२ चेंडूंत १०४ धावांची खेळी केली होती. सूर्यवंशीच्या वयाला घेऊन रणजी करंडकापूर्वी वाद झाला होता. त्याने एका मुलाखतीत सप्टेंबर २०२३ मध्ये आपण १४ वर्षांचे होऊ असे म्हटले होते. अधिकृत नोंदीप्रमाणे सूर्यवंशीची जन्मतारीख २७ मार्च २०११ आहे. त्याच्यावर लिलावात दिल्ली कॅपिटल्सने बोली लावली. मग, राजस्थानने दिल्लीला मागे टाकत त्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतले.

आणखी कोणते भारतीय लक्षवेधी?

भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि रविचंद्रन अश्विन यांच्यावरही कोटींच्या बोली लागल्या. जवळपास वर्षभर दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या शमीवर यंदा बोली लागणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, याच्या उलट त्याला १० कोटी रुपयांना सनरायजर्स हैदराबाद संघाने आपल्या संघात घेतले. ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेता गोलंदाज अर्शदीप सिंगला १८ कोटी रुपये खर्ची घालत पंजाबने पुन्हा एकदा आपल्या ताफ्यात घेतले. गेले काही काळ संघाबाहेर असलेल्या युजवेंद्र चहलने लिलावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्वांचे लक्ष वेधले. त्याला तब्बल १८ कोटी रुपयांना पंजाबने घेतले. चहलसाठी लखनऊ, पंजाब व चेन्नईच्या संघांकडे चढाओढ पाहायला मिळाली. मात्र, अखेर पंजाबने त्याला आपल्या संघात सहभागी करून घेतले. मोहम्मद सिराजही आता गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसेल. त्याला त्यांनी १२.२५ कोटी रुपयांना घेतले. यानंतर रविचंद्रन अश्विनला ९.७५ कोटी रुपयांना चेन्नईमध्ये स्थान मिळाले. हर्षल पटेलही ८ कोटी रुपयांना हैदराबाद संघात गेला. केएल राहुलला या हंगामापूर्वी लखनऊने करारमुक्त केले होते. मग, लिलावात दिल्लीने त्याच्यावर १४ कोटी रुपयांची बोली लावली. पंत गेल्यानंतर राहुलकडे दिल्लीचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या इशान किशनवरही सर्वांचे लक्ष होते. त्याला ११.२५ कोटी रुपये खर्ची करून हैदराबाद संघाने घेतले. तर, यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माला बंगळूरुने ११ कोटी रुपयांना संघात सहभागी करून घेतले. यासह प्रसिध कृष्णा (९.२५ कोटी, गुजरात) व आवेश खान (९.७५ कोटी, लखनऊ) यांनीही लिलावात लक्ष वेधले. भारताच्या टी.नटराजनवरही १०.७५ कोटी रुपयांना दिल्ली कॅपिटल्स संघाने घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परदेशी खेळाडूंमध्ये कोण आघाडीवर?

गेल्या लिलावात २४.७५ कोटींची बोली लागलेल्या मिचेल स्टार्कला यंदाच्या हंगामात ११.७५ कोटी रुपयांना दिल्लीच्या संघाने घेतले. यंदा विदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक बोली ही आक्रमक सलामीवीर जोस बटलरवर लागली. त्याला १५.७५ कोटी रुपयांना गुजरात संघाने आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतले. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला १२.५० कोटी रुपयांना बंगळूरु संघाने घेतले. तर, आक्रमक फलंदाज फिल सॉल्टवर ११.५० कोटी रुपयांनी बोली बंगळूरु संघाने लावली. मार्कस स्टोइनिसला पंजाब संघाने ११ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतले. तर, कगिसो रबाडावर गुजरातने १०.७५ कोटी रुपयांची बोली लावली. आपल्या दुखापतीमुळे चर्चेत असलेल्या जोफ्रा आर्चरला १२.५० कोटी रुपयांना राजस्थानने आपल्या संघात स्थान दिले. न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर मुंबईने १२.५० कोटी रुपयांची बोली लावली. काही हंगामापूर्वी बोल्ट हा मुंबई संघात होता. तर, अफगाणिस्तानचा चायनामन नूर अहमदला चेन्नईने तब्बल १० कोटी रुपयांना संघात स्थान दिले.