केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांसाठी ३००० रुपयांचा वार्षिक पास उपलब्ध करून देणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. हा वार्षिक पास १५ ऑगस्ट २०२५ पासून उपलब्ध असणार आहे. खाजगी कार मालकांसाठी टोल नाक्यावरील पेमेंट सुविधा अधिक सोपी करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने हा फास्टॅग पास देण्याची योजना आणली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक्सवरून ही घोषणा करताना महामार्ग प्रवासाच्या दिशेने एक परिवर्तनकारी पाऊल असल्याचे म्हटले आहे. तेव्हा या वार्षिक पासबाबत सर्वसाधारणपणे पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या विश्लेषणातून जाणून घेऊ…
हा वार्षिक पास कोणासाठी असेल?
फास्टॅग वार्षिक पास हा केवळ कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगर-व्यावसायिक वाहनांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. राष्ट्रीय महामार्गावरील एकूण २०० फेऱ्यांचा यात समावेश असेल, पासची वैधता एक वर्षासाठी असेल.
वार्षिक पास कुठून मिळेल?
नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, राजमार्ग यात्रा अॅपवर, एलएचएआय आणि एमओआरचीएचच्या वेबसाइटवर हा पास उपलब्ध असेल. तसंच पासचे नूतनीकरणही याच वेबसाईटवर उपलब्ध असेल. फास्टॅगचा वार्षिक पास घेतल्यामुळे टोल नाक्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, वेळ वाचेल आणि टोल प्लाझावरील वाद कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ६० किलोमीटर परिसरात असलेल्या टोल नाक्यांवरील दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी पास हा उत्तम पर्याय ठरेल.
पासच्या ट्रिप कशा मोजल्या जातील?
संबंधित विभागातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, “प्रत्येक वेळी कोणतेही वाहन टोल नाका ओलांडते तेव्हा एक ट्रिप मोजली जाते. म्हणजेच जर कोणी यमुना एक्स्प्रेस वे वरून दिल्लीहून आग्रा प्रवास करत असेल, तर त्या प्रवासात तीन टोल प्लाझा जेवर, मथुरा आणि आग्रा अशा तीन वेगवेगळ्या ट्रिप म्हणून मोजल्या जातील. तसंच बंद टोलिंग सिस्टिममध्ये जिथे फक्त बाहेर पडताना टोल आकारला जातो, तिथे संपूर्ण प्रवास एकच ट्रिप म्हणून मोजला जातो. प्रवाशांसाठी हा अत्यंत फायदेशीर पर्याय असेल असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वापरकर्त्यांना नवीन फास्टॅगची आवश्यकता असेल का?
वार्षिक पास काढताना नवीन फास्टॅगची आवश्यकता नाही. वार्षिक पास काढतेवेळी आधीच्याच फास्टॅग कार्डशी तो जोडता येईल. एकदा पासची मुदत संपली की एक वर्षानंतर किंवा २०० ट्रिपनंतर तो सहज रिचार्जही करता येईल.
वार्षिक पासचा फायदा कोणाला होईल?
संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “या पासमुळे शहरातच वारंवार प्रवास करणाऱ्या आणि नियमितपणे गावी जाणाऱ्यांना याचा फायदा होईल. “तुम्हाला आता दर आठवड्याला किंवा दर महिन्याला फास्टॅग टॉप अप करण्याची गरज भासणार नाही.”
फास्टॅगमुळे टोल व्यवस्थेत कसा बदल झाला आहे?
९८ टक्के वापरासह आणि आठ कोटींहून अधिक वापरकर्त्यांसह फास्टॅगने याआधीच संपूर्ण भारतात टोल वसुली व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला आहे. गेल्या वर्षीच्या आणखी एका महत्त्वाच्या सुधारणांनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्या सुधारणांनुसार, अंतर्गत विंडशील्डवर फास्ट टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल आकारला जातो, टोल नाक्यावरील कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

हजारो रुपयांची बचत
फास्टॅगच्या या नवीन पासमुळे प्रवाशांचा दरवर्षी हजारो रुपयांचा टोल वाचू शकतो. दिल्ली आणि लखनऊदरम्यान चार टोल नाके आहेत. त्यांचा एकूण टोलवरील खर्च सुमारे १,२०० रुपये इतका आहे. एका फेरीसाठी २,४०० रुपये टोल आकारला जातो. वर्षातून २५ वेळा प्रवास केल्यास ६० हजार रुपये एकूण टोलचा खर्च येतो. या पासमुळे तुम्हाला फक्त ३००० रुपयांमध्ये वर्षातून २५ फेऱ्या प्रवास करता येईल अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना या पाससह प्रवास करताना प्रत्येक टोलसाठी फक्त १५ रुपये आकारले जातील.
वार्षिक पास सक्रिय कसा करायचा?
वापरकर्त्याला राजमार्ग यात्रा मोबाइल अॅप्लिकेशन किंवा NHAI या वेबसाईटद्वारे ३००० रुपये द्यावे लागतील. पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वार्षिक पास नोंदणीकृत फास्टॅगवर सक्रिय केला जाईल. ही प्रक्रिया करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, वाहनाची तपासणी आणि संबंधित फास्टॅग पडताळल्यानंतरच वार्षिक पास सक्रिय केला जाईल. नोंदणीकृत वाहनाच्या विंडशील्डवर फास्टॅग योग्यरित्या चिकटवलेला असेल तरच पास सक्रिय करण्याची परवानगी मिळू शकते.
पासची मुदत संपल्यावर काय?
वार्षिक पासची मुदत संपल्यावर फास्टॅग आपोआप नियमित फास्ट टॅगच्या स्वरूपात काम करेल. २०० ट्रिप पूर्ण झाल्यानंतर वापरकर्ते एक वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वीच वार्षिक पास पुन्हा खरेदी करू शकतात, यामुळे पास संपल्यानंतर ऐनवेळेला घोटाळा होणार नाही.
हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावरील टोलवर वैध असेल, जिथे NHAI चे नियंत्रण असेल. त्या त्या राज्य सरकार किंवा स्थानिक संस्थांद्वारे व्यवस्थापित केलेल्या इतर टोल नाक्यावर फास्टॅग हा नियमित फास्टॅग म्हणून काम करेल आणि तेव्हा वापरकर्त्याला त्या दराप्रमाणे शुल्क आकारले जाईल.
अहस्तांतरणीय आणि फक्त खाजगी कारसाठी
व्यावसायिक वाहनांवर पास वापरणे किंवा तो दुसऱ्या वाहनासाठी हस्तांतरित करणे या सुविधा पाससाठी उपलब्ध नसतील. तसंच पास वापरताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे वार्षिक पास हा अनिवार्य नाही. विद्यमान फास्टॅग इकोसिस्टिम जशीच्या तशी कार्य करेल. जे वापरकर्ते वार्षिक पास घेणार नाहीत, त्यांना टोल नाक्यावर लागू असलेल्या शुल्कानुसार नियमित व्यवहारांसाठी त्यांचा फास्टॅग वापरावा लागेल, म्हणजे वार्षिक फास्टॅग घेणं अनिवार्य नाही