विराट कोहली, ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी या मोक्याच्या खेळाडूंची अनुपस्थिती, पहिल्या कसोटीनंतर केएल राहुलही अनुपलब्ध. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्राधान्याने युवकांवर अवलंबून राहावे लागले. तरीही बॅझबॉलच्या रूपात आक्रमक खेळणाऱ्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ अशी सरशी साधली. हे कसे घडून आले?

अनपेक्षित धक्क्यानंतर सुखद ‘कमबॅक’

हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा संघ पहिल्या डावात १९० धावांनी पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या डावात ऑली पोपची १९६ धावांची अविस्मरणीय खेळी, त्यानंतर नवोदित डावखुरा फिरकीपटू टॉम हार्टलीच्या (७/६२) अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने पहिला कसोटी सामना २८ धावांनी जिंकत भारताला मोठा धक्का दिला. त्यातच या सामन्यादरम्यान केएल राहुल आणि रवींद्र जडेजा जायबंदी झाले. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारताला या दोघांविनाच खेळावे लागले. मात्र, त्यानंतरही भारताने विशाखापट्टणम येथे झालेला हा सामना १०६ धावांनी जिंकला. या विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाने नंतर मागे वळून पाहिले नाही. राजकोट आणि रांची येथे झालेले पुढील दोन सामने भारताने अनुक्रमे ४३४ धावा आणि पाच गडी राखून जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली. अखेरीस नयनरम्य धरमशाला येथे झालेल्या पाचव्या कसोटीत इंग्लंडचा अडीच दिवसांतच एक डाव आणि ६४ धावांनी धुव्वा उडवत भारताने मालिकेत ४-१ असे यश मिळवले.

Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

हेही वाचा – विश्लेषण : लडाखसाठी केंद्र सरकारचा वेगळा विचार, अनुच्छेद ३७१ काय सांगतं?

नवोदितांची लक्षणीय कामगिरी

काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताने या मालिकेत रजत पाटीदार, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल हे फलंदाज, यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल, वेगवान गोलंदाज आकाश दीप अशा पाच युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. पाटीदार वगळता अन्य चौघांनी या संधीचे सोने केले. त्यातही मुंबईकर सर्फराज आणि जुरेल यांचे योगदान भारतासाठी महत्त्वाचे ठरले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करूनही सर्फराजला राष्ट्रीय संघात स्थान मिळवत नव्हते. मात्र, या मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत त्याला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने दोनही डावांत अर्धशतक साकारत आपले नाणे खणखणीत वाजवले. एकूण तीन सामन्यांत त्याने ५०च्या सरासरीने २०० धावा केल्या. तसेच जुरेलविना भारताला मालिकेतील चौथा कसोटी सामना जिंकणे शक्य झाले नसते. रांची येथे झालेल्या या सामन्यात जुरेलने पहिल्या डावात ९० धावांची शानदार खेळी केली. मग दुसऱ्या डावात आव्हानात्मक परिस्थितीत नाबाद ३९ धावा करत भारताला विजय मिळवून दिला, तसेच त्याचे यष्टिरक्षणही सफाईदार होते.

जयस्वाल, शुभमन, रोहित, बुमरा, अश्विन, कुलदीप… 

या मालिकेपूर्वी भारताचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालला कसोटी क्रिकेटचा फारसा अनुभव नव्हता. तसेच स्वत:हून तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या शुभमन गिलला गेल्या काही काळात धावांसाठी झगडावे लागत होते. मात्र, या दोघांनी या मालिकेत आपल्यातील अलौकिक प्रतिभा सिद्ध केली. मुंबईकर यशस्वीने पाच सामन्यांत दोन द्विशतके आणि तीन अर्धशतकांच्या मदतीने तब्बल ७१२ धावा काढल्या. एका कसोटी मालिकेत ७०० हून अधिक धावा करणारा तो सुनील गावस्कर यांच्यानंतर भारताचा केवळ दुसराच फलंदाज ठरला. दडपणाखाली असलेल्या गिलनेही उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ४५२ धावा केल्या. त्याचप्रमाणे कर्णधार रोहित शर्मा (पाच सामन्यांत दोन शतकांसह ४०० धावा), वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा (चार सामन्यांत १९ बळी), फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (पाच सामन्यांत सर्वाधिक २६ बळी) आणि कुलदीप यादव (चार सामन्यांत १९ बळी), अष्टपैलू जडेजा (चार सामन्यांत २३२ धावा आणि १९ बळी) यांचे योगदानही भारतासाठी निर्णायक ठरले.

मालिकेला कलाटणी देणारे क्षण कोणते?

या मालिकेतील पहिल्या चारही सामन्यांत इंग्लंड संघाला भक्कम स्थितीत येण्याची संधी होती. मात्र, पहिला सामना वगळता त्यांनी ही संधी गमावली. भारताने ही चूक केली नाही. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वीचे (२०९ धावा) द्विशतक आणि सपाट खेळपट्टीवर बुमराने (६/४५) जुन्या चेंडूने ‘रिव्हर्स स्विंग’चा वापर करत केलेला भेदक मारा याने सामन्याला कलाटणी दिली. तर दुसऱ्या डावात गिलने १०४ धावांची अप्रतिम खेळी साकारली. राजकोट येथील तिसऱ्या कसोटीत भारताची सुरुवातीला ३ बाद ३३ अशी स्थिती होती. त्यावेळी रोहित (१३१) आणि जडेजा (११२) यांनी द्विशतकी भागीदारी रचली. तर दुसऱ्या डावात यशस्वीने (२१४) पुन्हा द्विशतक साकारले. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाला मोठ्या फरकाने पिछाडीवर राहण्याचा धोका होता. अशा वेळी जुरेलने ९० धावांची अप्रतिम खेळी केली. दुसऱ्या डावात अश्विन (५/५१) आणि कुलदीप (४/२२) यांनी इंग्लंडला झटपट गुंडाळले, तर गिल (नाबाद ५२) व जुरेल (नाबाद ३९) यांनी संयमाने फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. पाचव्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर इंग्लंडने चांगली सुरुवात केली. परंतु कुलदीपने (५/७२) आघाडीच्या सहापैकी पाच फलंदाजांना माघारी धाडल्याने इंग्लंडला मोठी धावसंख्या करता आली नाही.

हेही वाचा – ही चालकविरहीत मेट्रो चालते तरी कशी?

कर्णधार रोहित…

कसोटी संघाचा कर्णधार म्हणून माझ्यासाठी ही सर्वांत समाधान देणारी मालिका ठरली आहे, असे रोहित पाचव्या कसोटीच्या पूर्वसंध्येला म्हणाला होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहितने भारताचे यशस्वीपणे नेतृत्व केले आहे. परंतु कसोटीत त्याला अविस्मरणीय म्हणता येईल असा मालिकाविजय मिळवता आला नव्हता. या मालिकेत मात्र रोहितचे कुशल नेतृत्व भारतासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले. इंग्लंडचा संघ आक्रमक शैलीत खेळत असतानाही रोहितने दडपण न घेता गोलंदाजांवर विश्वास राखला. त्याने युवकांना आत्मविश्वास दिला. नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक दिली. स्वत: फलंदाज म्हणून निर्णायक योगदान दिले. याचा सकारात्मक परिणाम त्याच्या नेतृत्वावरही झाला. त्याची क्षेत्ररक्षकांची रचनाही अचूक ठरली.

मायदेशातील अपराजित वर्चस्व…

मायदेशात भारताचा हा सलग १७वा कसोटी मालिकाविजय ठरला आहे. २०१२ सालापासून विविध संघांनी भारताचा दौरा केला, पण एकाही संघाला मालिका जिंकण्यात यश आले नाही. 

विक्रमवीर फलंदाज भारताकडे नेहमीच असतात. पण प्रतिस्पर्ध्याच्या २० विकेट्स घेऊ शकतील असे गोलंदाज भारताला वेळोवेळी मिळत गेले. फिरकी हे आजही भारताचे मुख्य शस्त्र आहे, हे गेल्या काही काळात अश्विन, जडेजा, अक्षर आणि आता कुलदीप यांसारख्या फिरकीपटूंनी दाखवून दिले आहे. अन्य संघांकडे या दर्जाचे फिरकीपटू नाहीत. भारताचे तळाचे फलंदाजही मोलाचे योगदान देतात. तर बुमरा आणि शमी यांसारख्या वेगवान गोलंदाजांचा जुना चेंडू ‘रिव्हर्स स्विंग’ करण्यात हातखंडा आहे. त्यामुळे अन्य संघांना भारताला भारतात हरवणे अवघड जाते.