scorecardresearch

विश्लेषण : निम्म्या भारतीयांना निद्रानाश? का उग्र बनतेय ही समस्या?

रोजच्या रोज झोपेची वाट पाहत तळमळणाऱ्या लोकांची संख्या भारतात सुमारे ५० टक्के किंवा त्याहून अधिक आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

Indians suffering from insomnia
गेल्या काही वर्षांत झोपेचे गणित विस्कळित झालेले अनेक जण आपण आपल्या आजूबाजूला पाहतो आहोत. (प्रतिनिधिक फोटो)

– भक्ती बिसुरे

शरीराचे तंत्र उत्तम राखण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप लागणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. झोप चांगली असेल तर प्रकृती चांगली आणि चांगल्या प्रकृतीच्या व्यक्तींना चांगली झोप असा या दोन्हींचा परस्पर संबंध आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत झोपेचे गणित विस्कळित झालेले अनेक जण आपण आपल्या आजूबाजूला पाहतो आहोत. रोजच्या रोज झोपेची वाट पाहत तळमळणाऱ्या लोकांची संख्या भारतात सुमारे ५० टक्के किंवा त्याहून अधिक आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

निद्रानाश म्हणजे काय?

झोपेचे चक्र सुस्थितीत नसण्याला निद्रानाश असे म्हणतात. शांत आणि सलग झोप न लागणे, झोपल्यानंतर लगेच किंवा सारखी जाग येणे, सकाळी उठल्यानंतर आणि दिवसभर झोप पूर्ण झाल्यानंतर वाटते तसे ताजेतवाने न वाटणे या सगळ्या गोष्टी म्हणजे निद्रानाशाची लक्षणे आहेत. मागील काही वर्षांत बदललेली जीवनशैली, कामाच्या वेळांचे स्वरूप, ताणतणाव, स्पर्धा, मोबाइल आणि गॅजेट्सचा वाढलेला वापर, आहारातील जंक फूड आणि चहा, कॉफी किंवा उत्तेजक पेयांचा समावेश अशा अनेक कारणांनी माणसाच्या झोपेचे घड्याळ बिघडले आहे. त्यातूनच रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे किंवा कामाच्या निमित्ताने रात्रभर जागणे आणि दिवसभर झोपणे असे बदल झोपेच्या वेळापत्रकात झाले आहेत. त्यातूनच निद्रानाश हा विकार बळावत असल्याचे दिसून येत आहे. झोप ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याने झोपेचे बिघडलेले ताळतंत्र अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे निद्रानाश हा गांभीर्याने घेण्याचा आजार आहे, एवढे निश्चित.

भारतात निद्रानाश गंभीर?

झोप या विषयावरील संशोधनाकडे गेल्या काही वर्षांत अनेकांनी गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्यातूनच झोपेचे बदलते स्वरूप, त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत ठोस निष्कर्षही हाती येत आहेत. रेसमेड या औषध आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थेने केलेल्या ताज्या संशोधनानुसार निम्मे भारतीय निद्रानाशाचे रुग्ण आहेत. या संशोधनातून समोर आलेली एक गोष्ट म्हणजे बहुतांश, म्हणजे तब्बल ८१ टक्के भारतीयांना चांगल्या झोपेचे महत्त्व माहिती आहे, मात्र त्यापैकी बहुतेक जण चांगल्या झोपेपासून वंचितही आहेत. रोजच्या जगण्यातील वाढते ताणतणाव, कामाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा, मोबाइल आणि इतर उपकरणांचा वापर यामुळे झोपेवर परिणाम झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बहुतेक नागरिकांना पाठ टेकल्यानंतर झोप येण्यास सरासरी ९० मिनिटांचा वेळ लागतो. तब्बल ५९ टक्के नागरिकांना घोरण्याचा त्रास आहे. ७२ टक्के नागरिकांची झोप कमी आहे. त्यामुळे त्यांना विविध मानसिक विकारांचा सामनाही करावा लागत असल्याचे, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या नागरिकांनी सांगितले. यामध्ये ‘स्लीप ॲप्निया’ आणि मधुमेह यांचे प्रमाण लक्षणीय आहे. मानसिक विकार आणि झोप यांचाही अत्यंत नजीकचा संबंध असल्याने मानसिक आरोग्याच्या तक्रारींमध्येही मोठी वाढ गेल्या काही वर्षांत झाली आहे. याचा थेट संबंध निद्रानाशाशी आहे. झोपेच्या तक्रारी आणि त्यामुळे उद्भवणारा मधुमेह, ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निआ यांचा त्रास ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील नागरिकांमध्ये अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. करोना महासाथीच्या काळात नोकरी-व्यवसायातील अनिश्चितता हेही निद्रानाशाचे एक प्रमुख कारण ठरल्याचे दिसून आले. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका संशोधनानुसार अमेरिकेत झोपेच्या तक्रारी नसलेल्या प्रौढांच्या तुलनेत, त्या असलेल्या रुग्णांमध्ये मनोविकार अधिक आहेत. अस्वस्थता, नैराश्य, वर्तन समस्या या सगळ्याच्या मुळाशी विस्कटलेली झोपेची घडी आहे.

स्लीप ॲप्निया आणि मधुमेह?

स्लीप ॲप्नियाचे साधे लक्षण म्हणजे झोपेत मोठ्याने घोरणे हे होय. झोपल्यानंतर या रुग्णांची श्वासनलिका अरुंद किंवा बंद होते. त्यामुळे झोपेत प्राणवायूची कमतरता भासते. त्यातून घोरण्याचे प्रमाण वाढते. या रुग्णांना झोप न येणे किंवा सतत जाग येणे आणि झोपेतून उठल्यानंतर डोके दुखणे, मन एकाग्र न होणे, अस्वस्थपणा, चिडचिड या गोष्टी जाणवतात. झोपेत श्वास घेण्यास अडथळा येणे हे वरवर वाटते तेवढे किरकोळ लक्षण नाही. त्यामुळे यावर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. झोप आणि मधुमेह यांचाही थेट आणि जवळचा संबंध आहे. झोप न लागल्याने शरीर कार्यरत राहते. त्यातून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यातून मधुमेहाची सुरुवात होते. लठ्ठपणा या आणखी एका गोष्टीचा या दोन्हींशी संबंध आहे. लठ्ठपणातून टाईप टू प्रकारचा मधुमेह होतो. त्यातून स्लीप ॲप्नियाची सुरुवातही होते.

करोना काळात निद्रानाशात वाढ?

२०२०मध्ये आलेल्या करोनाने जगण्याची व्याख्या बदलली. ताणतणाव, साथरोगाची भीती, नैराश्य, घरात बसून राहण्याची सक्ती, नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रातील अनिश्चितता अशा अनेक गोष्टींनी माणसाला घेरले. तशातच घरीच राहायचे असल्याने टीव्ही पहाणे, मोबाइलचा वापर या गोष्टींचे प्रमाणही वाढले. नोकरी व्यवसायातील अनिश्चितता, आर्थिक स्थैर्याची काळजी, कुटुंबाच्या आरोग्याची काळजी अशा अनेक कारणांनी निद्रानाशात वाढ झाली. व्यायाम, आहाराचा बिघडलेला समतोल हेही यामागचे एक प्रमुख कारण आहे.

शांत झोपेसाठी काय करावे?

तज्ज्ञ डॉक्टर सांगतात, की शांत झोपेसाठी झोपेचे एक निश्चित वेळापत्रक पाळणे आवश्यक आहे. कामाच्या निमित्ताने ज्यांना रात्री जागे राहावे लागते त्यांनी दिवसा मात्र निश्चित वेळी झोपले पाहिजे. शरीराला किमान सहा ते सात तास शांत झोप लागणे महत्त्वाचे आहे. धूम्रपान, मद्यपान, जंक फूड, उत्तेजक पेय यांपासून लांब राहाणे चांगल्या झोपेसाठी उपयुक्त ठरते. चालणे, धावणे, योगासने किंवा जिम असा आपल्या आवडीचा व्यायाम नियमित केल्याने त्याचा उपयोगही चांगल्या झोपेसाठी होतो. झोपण्यापूर्वी किमान एक तासभर मोबाइल, टीव्ही, गॅजेट्स यांचा वापर कमी करावा. त्याचा उपयोग लवकर झोप लागण्यास होतो, असेही काही संशोधनांतून समोर आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indians suffering from insomnia symptoms causes what to do about it print exp scsg

ताज्या बातम्या