हृषिकेश देशपांडे

चार राज्यांत पुन्हा सत्ता मिळवल्याचा जल्लोष भाजपकडून सुरू असतानाच बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडली आहे. या आघाडीचा घटक पक्ष असलेल्या विकासशील इन्सान पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहानी यांची बिहारच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. तशी शिफारस मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपालांकडे केली. अर्थात ही घडामोड अपेक्षितच होती. कारण सहानी यांच्या पक्षाने उत्तर प्रदेशात पन्नास ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. भाजपविरोधात त्यांनी जोरदार आघाडी उघडली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशात निकाल लागल्यावर सहानींना हटवले जाईल अशी अटकळ होती. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या पुढाकाराने असलेली आघाडी यात गेल्या विधानसभा निवडणुकीत मते आणि जागांमध्ये फार अंतर नाही. त्यामुळे प्रत्येक छोट्या पक्षाचे महत्त्व आहे. त्यामुळे ही घडामोड महत्त्वाची आहे. अर्थात सहानी यांच्या हकालपट्टीने बिहारच्या राजकारणावर लगेच काही परिणाम संभवत नाही. मात्र भविष्यात जातीच्या मुद्द्यावर सहानी भाजपची कोंडी करू शकतात. सहानी हे मल्हा समाजातील प्रभावी नेते मानले जातात. जातीचा मुद्दा प्रभावी असल्याचे हिंदी भाषक पट्ट्यातील राजकारणातून दिसून येते. त्या अर्थाने सहानी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणे हे इतर छोट्या पक्षांसाठी इशारा मानला जात आहे. त्याचा परिणाम आघाडीतील इतर पक्षांच्या संबंधांवरही होऊ शकतो. बिहारमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तर नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल आता दुय्यम भूमिकेत आहे.

Nagpur Lok Sabha, Nitin Gadkari,
गडकरी हॅटट्रिक साधणार ?
liability determination order
सांगली जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहारातील ५० कोटींची जबाबदार निश्चितेचे आदेश
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

मुकेश यांचा रंजक प्र‌वास

चाळीस वर्षीय मुकेश सहानी यांची वाटचाल रंजक आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टेज डिझायनर अशी ओळख असलेले सहानी वयाच्या १९ व्या वर्षी बिहारमधून रोजगारासाठी मुंबईत आले. सार्वजनिक कार्याची आवड निर्माण झाल्यावर बारा वर्षापूर्वी बिहारमध्ये त्यांनी सहानी समाज कल्याण संस्थेची स्थापना करून सामाजिक कार्याला त्यांनी सुरुवात केली. त्यातून राजकीय क्षेत्राबाबत आकर्षण निर्माण झाले. २०१५ मध्ये त्यांनी निशाद विकास संघाची स्थापना केली. त्याच दरम्यान २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार केला. मात्र समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याचे आश्वासन पाळले नाही असा आरोप करत भाजपपासून ते बाजूला झाले. यातून २०१८ मध्ये विकसनशील इन्सान पक्षाची त्यांनी स्थापना केली, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल तसेच काँग्रेसच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या महाआघाडीतून २०१९ ची लोकसभा निवडणूक ते लढले मात्र त्यांना अपयश आले. मात्र नंतर पुढच्याच वर्षी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढवलेल्या ११ जागांपैकी त्यांनी चार जागा जिंकल्या. मात्र मुकेश सहानी या निवडणुकीत पराभूत झाले. पुढे भाजपच्या मदतीने ते विधान परिषदेत गेले व राज्यातील नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात मत्स्य व पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी आली.

भाजपशी संघर्ष

मुकेश सहानी यांचा भाजपशी घरोबा फार काळ टिकला नाही. भाजपच्या केंद्रीय नेत्यांवर टीका केल्याने वाद वाढत गेला. भाजपनेही सहानी यांच्या पक्षाचे तीन आमदार फोडत त्यांना पक्षात घेतले. त्यामुळे सहानी संतापले. आता हा संघर्ष वाढत जाणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने सहानी यांच्या पक्षाला आघाडीतून जागा सोडल्या नाहीत हे एक वादाचे कारण ठरले. त्यातच सहानी यांच्या पक्षाच्या आमदाराच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपनेही उमेदवार दिला आहे. यातून झालेल्या टीकाटीप्पणीतून सहानी हे भाजपपासून दुरावले. अर्थात यापूर्वीही ते राजदच्या महाआघाडीत होते. मात्र आता त्यांचा मार्ग तितकासा सोपा नाही. एकतर त्यांच्याकडे सत्ता नाही त्यातच पक्षाचे आमदारही सोडून गेले. अशा वेळी त्यांना नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. राज्यात प्रमुख विरोधी असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वात संघर्ष सुरू केला आहे. त्यामुळे सहानी यांना विरोधात ठाम राजकारण करायचे असेल तर राजदशी जुळवून घ्यावे लागेल. आताही विधानसभा पोटनिवडणुकीत राजदने पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच राहणार आहेत.