Katrina Kaif Pregnant at 42: बाळाच्या जन्माने इवल्याश्या पावलांनी येणारा आनंद हा होऊ घालेल्या आई-बाबांसाठी काही औरच असतो. मग तो राजा असो वा रंक …आयुष्यात येणाऱ्या त्या पाहुण्याची हवीहवीशी वाटणारी चाहूल कोणाला नको असते. मग यापासून सेलिब्रिटी तरी अपवाद कसे असू शकतात. बॉलिवूडमधील आघाडीचे कलावंत असलेल्या कतरिना कैफ आणि विक्की कौशल या जोडप्याच्या आयुष्यात याच आनंदाच्या बातमीने चाहूल दिली आहे. प्रत्यक्षात या दोघांनीही या बातमीची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, कतरिनाने स्वतःला जाणीवपूर्वक लोकांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाळाच्या आगमनानंतर ती दीर्घकाळासाठी रजेवर जाणार आहे. त्यामुळे कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी जाहीर केले नसले तरी, बाळाच्या आगमनाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
कतरिना कैफ ही वयाच्या ४२ व्या वर्षी आई होणार आहे. शिवाय, मुलाच्या जन्मानंतर ती दीर्घ काळासाठी सुट्टीवरही जाणार आहे. तिच्या या निर्णयामुळे शहरातल्या स्त्रियांमध्ये चाळीशीनंतर मातृत्त्व स्वीकारण्याचा ट्रेंड का वाढतो आहे, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आजच्या काळात स्त्रिया आधी शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वातंत्र्याला प्राधान्य देतात, नंतर त्या आई होण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे उशिरा होणारी गर्भधारणा आता एक नवीन वास्तव ठरलं आहे. दीपिका पदुकोण हिचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. तिने ८ सप्टेंबर २०२४ रोजी, वयाच्या ३८ व्या वर्षी, आपल्या मुलीला जन्म दिला. अशा प्रकारे तिनेही उशिरा मातृत्व स्वीकारलेल्या व्यक्तींच्या यादीत आपलं नाव कोरलं. त्याच पार्श्वभूमीवर या संबंधित तज्ज्ञ काय सांगतात याचाच घेतलेला हा आढावा.
उशिरा होणाऱ्या गर्भधारणेशी संबंधित धोके
सामाजिक स्वीकृती आणि वैद्यकीय प्रगतीमुळे हा बदलता ट्रेंड शक्य झाला आहे. तरीही जसं वय वाढत जातं तसे आरोग्यासाठीचे धोकेही वाढत जातात, असं मत डॉक्टर व्यक्त करतात. वयानुसार प्रजननक्षमता नैसर्गिकरीत्या कमी होत जाते, त्यामुळे गर्भधारणा कठीण होते आणि ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता असते. “आजच्या स्त्रिया कुटुंब नियोजनाविषयी अधिक जागरूक आणि स्वावलंबी झाल्या आहेत. वयाच्या तिशीत किंवा चाळिशीत बाळाला जन्म देणं आता अचंबित करणारं राहिलेलं नाही,” असं एशियन हॉस्पिटलच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमृता रझदान कौल यांनी NDTV ला सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, “आपण या प्रक्रियेचे वैद्यकीय परिणाम मान्य केलं पाहिजेत आणि महिलांना योग्य मार्गदर्शन व पाठबळ मिळालं पाहिजे.”
आरोग्य नियोजन आणि वैद्यकीय मार्गदर्शन
डॉक्टरांचा ठाम सल्ला आहे की, आयुष्यात उशिरा मातृत्व स्वीकारायचं ठरवलं, तर आरोग्याशी संबंधित सर्व बाबींमध्ये आधीच काळजी घेणं आणि नियोजन करणं आवश्यक आहे. म्हणजेच, आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा, त्याआधीच योग्य तपासण्या, जीवनशैलीत बदल आणि वैद्यकीय सल्ला घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं. नियमित तपासण्या, गर्भधारणा होण्याआधीचं समुपदेशन (preconception counselling) आणि जीवनशैलीत आवश्यक बदल या सगळ्याचं पालन करणं हे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

चाळिशीतही निरोगी गर्भधारणा शक्य
“योग्य वैद्यकीय काळजी घेतल्यास अनेक महिला उशिरा अगदी तिशीत किंवा चाळिशीतही निरोगी गर्भधारणा आणि बाळाचा सुखकर जन्म अनुभवू शकतात,” असं नर्चर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. अर्चना धवन बजाज यांनी NDTV ला सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, “महत्त्वाचं म्हणजे योग्य नियोजन, संभाव्य आव्हानांची जाणीव आणि डॉक्टरांचं सहकार्य, आयव्हीएफ किंवा अंडी गोठवण्यासारख्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानामुळे महिलांना आता कुटुंब नियोजनात अधिक लवचिकता मिळाली आहे.”
उशिरा मातृत्वाचे सकारात्मक पैलू
डॉक्टरांचं मत आहे की, धोके असूनही उशिरा मातृत्वाचे सकारात्मक पैलूही आहेत. उशिरा आई होणाऱ्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या अधिक स्थिर, भावनिकदृष्ट्या परिपक्व आणि मुलाच्या संगोपनासाठी तयार असतात. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय नेहमीच वैयक्तिक तयारी आणि वैद्यकीय सल्ला यांचा समतोल साधून घेणं आवश्यक असतं. कतरिना कैफ आता आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज होत असताना, तिचा प्रवास एका मोठ्या सांस्कृतिक बदलाचं प्रतीक ठरतो आहे. जिथे उशिरा मातृत्व फक्त मान्यच केलं जात नाही, तर त्याचा सन्मानही केला जातो. योग्य वैद्यकीय सहाय्य आणि जीवनशैलीतील काळजी घेतल्यास, उशिरा मातृत्व आज सुरक्षित आणि समाधानकारक ठरू शकतं, हे अनेक स्त्रिया दाखवून देत आहेत.
वय नाही, तयारी महत्त्वाची
आई होणं हा फक्त जैविक प्रवास नसून, तो स्त्रीच्या संपूर्ण आयुष्याचा एक नवा अध्याय असतो. वय कितीही असो, बाळाच्या जन्माने जीवनात उमलणारा आनंद सारखाच असतो. मात्र, प्रत्येक स्त्रीची वाटचाल वेगळी असते आणि तिच्या निर्णयाचा सन्मान करणं हे समाजाचं कर्तव्य आहे. आज कतरिना कैफ, दीपिकासारख्या सेलिब्रिटी असोत किंवा इतर कोणीही, त्या आपल्याला शिकवतात की, मातृत्वाचं सौंदर्य वयावर नाही, तर तयारीवर अवलंबून असतं. योग्य वैद्यकीय मदत, आरोग्यदायी जीवनशैली आणि मानसिक तयारी या आधारांवर उशिरा मातृत्वही सुरक्षित, सुखकर आणि अभिमानास्पद ठरू शकतं.