मुंबई शहराला सोमवारी सोसाट्याचा वारा, पाऊस अन् धुळीच्या वादळाचा तडाखा बसला, त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील घाटकोपर भागात जोरदार वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला असून, ५९ जण जखमी झाले आहेत. घाटकोपरमधील पंतनगर येथील पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील पोलीस ग्राऊंड पेट्रोल पंपावर ही घटना घडली.

मुंबई अग्निशमन दलाने काल दुपारी ४.३० वाजता पोलीस ग्राऊंड पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडल्याचीही नोंद केली. बचावकार्यासाठी पोलीस, मुंबई अग्निशमन दल आणि इतर यंत्रणा एकत्रित काम करीत आहेत, असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. “जखमी लोकांना तात्काळ जवळच्याच राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” अधिकारी पुढे म्हणाले. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईत धोक्याचा इशारा जारी केला आहे. ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. “विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे,” असे IMD अधिकाऱ्याने सांगितले.

पण धुळीचे वादळ म्हणजे काय? आणि ते कसे निर्माण होते?

SciJinks.com च्या मते, धुळीचे वादळ म्हणजे धूळ अन् त्याची भिंत उभी राहते. वादळांचे मार्ग वाऱ्याची दिशा आणि वेग यावर अवलंबून असतात. धुळीच्या वादळाने तयार केलेली धुळीची भिंत कित्येक किलोमीटर लांब आणि कित्येक हजार फूट उंच असू शकते. धुळीची वादळे ही वाळवंटी भागातील हवामानाचा भाग आहेत. खरं तर धुळीची वादळे मुख्यत: मार्च ते जून या काळात होतात. या काळात राजस्थान आणि उत्तर भारतात कडक उन्हाळा असतो. तापमान वाढले की हवा हलकी होते आणि हवेच्या दाबामधील फरक वाढतो. त्यामुळे वारे वेगाने वाहू लागतात. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर वाळवंटातील रेती, धूळ वर उचलली जाते आणि वाहू लागते. वाळूचे वस्तुमान अधिक असल्याने ती जास्त दूपर्यंत जात नाही, तुलनेने कमी वस्तुमानाची धूळ मात्र हजारो किलोमीटरचे अंतर पार करू शकते. धुळीचे वादळ जगात कोठेही होऊ शकते, ते बहुतेक पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेत होतात. काही झाडे असलेल्या सपाट प्रदेशात धुळीचे वादळ येण्याची शक्यता जास्त असते.

हेही वाचाः विश्लेषण : नाशिक मतदारसंघाकडे मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याचे कारण काय? ही जागा महायुतीसाठी आव्हानात्मक का ठरतेय?

नॅशनल जिओग्राफिकच्या मते, वारा पृथ्वीवर थेट आदळल्याने मातीवरील धूलिकणाचा थर विस्कळीत होतो. त्यानंतर धूलिकण हवेत उंच भरारी मारतात. मग धूळ आणि वारा एकमेकांमध्ये मिसळून मोठ्या प्रमाणात धुळीचे ढग तयार करतात. मशागतीसारख्या शेती पद्धती, जसे की, जंगल तोडण्यामुळे हवा जमिनीवर थेट आदळण्यास हातभार लागतो आणि वादळं निर्माण होतात.

धुळीच्या वादळांची काही वैशिष्ट्ये

  • ते बऱ्याचदा अचानक सुरू होऊ शकतात आणि लोकांना नुकसान पोहोचवतात
  • ते दृश्यमानता कमी करून कार अपघातास कारणीभूत ठरू शकतात
  • ते विमानांना विलंब आणि यांत्रिक समस्या निर्माण करू शकतात
  • लोकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात

नॅशनल जिओग्राफिकने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दशकात धुळीच्या वादळामुळे अमेरिकेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या चक्रीवादळामुळे जंगले नष्ट होत आहेत. कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या वायुमंडलीय विज्ञानाच्या प्राध्यापक नताली महोवाल्ड यांनी नॅशनल जिओग्राफिकला सांगितले की, धुळीच्या वादळामुळे दम्यासाखा विकार जडू शकतो. फुफ्फुसांना देखील नुकसान पोहोचवू शकतात. धूळ लोकांच्या श्वसन प्रणालीमध्ये प्रवेश करते. हे मनुष्यासाठी चांगले नाही, असंही महोवाल्ड सांगतात. गाडी चालवताना तुम्ही धुळीच्या वादळात अडकले असाल तर थांबणे हा सर्वात सुरक्षित उपाय आहे.

द वीक नुसार, हवामानातील बदलामुळे जमिनीचा ऱ्हास होत असून, दुष्काळामुळे धुळीची वादळे वाढली आहेत. धुळीची वादळं ज्या भागातून येतात, त्या भागात ते पिकांचे नुकसान करू शकतात, पशुधन नष्ट करू शकतात. तसेच दूरच्या भागातून वाहून आलेली धूळ मनुष्याला घातक ठरू शकते. ज्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच वाहतूक, पुरवठा साखळी आणि विजेचा संपर्क विस्कळीत होतो. धुळीच्या वादळांमुळे वातावरणात उष्णता कायम राहून हवामानावरही विपरीत परिणाम होतो. सुमारे ४० टक्के वायुमंडलीय एरोसोल हे वातावरणातील प्रदूषणातून येतात. शास्त्रज्ञांना एरोसोलमुळे धुळीच्या वादळांची चिंता सतावते आहे. या एरोसोलमुळेच ग्लोबल वॉर्मिंगची चिंता आहे. अशा पद्धतीने तापमान जितके जास्त असेल तितकी जास्त वादळे येतील, अशीही माहिती द वीकने दिली आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना IMD च्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी मुंबईतील वादळाबद्दल चिंता व्यक्त केलीय. येत्या काही तासांत अशी वादळे पुन्हा येण्याची भीती नायर यांनी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुळीच्या वादळानं मुंबईतील जनजीवन विस्कळीत

मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास महाकाय लोखंडी जाहिरात फलक वादळी वाऱ्यामुळे कोसळून पेट्रोल पंपावर पडला. १४० बाय १४० चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात आदळल्यामुळे जवळ उभी असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. आरे आणि अंधेरी पूर्व मेट्रो स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती, असे मेट्रो रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवा प्रभावित झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अवकाळी पावसाने कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा दिला असतानाच ठाणे जिल्ह्यातील कळवा आणि अन्य काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. दादर, कुर्ला, माहीम, घाटकोपर, मुलुंड आणि विक्रोळी या उपनगरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, तर दक्षिण मुंबईतील काही भागात रिमझिम पाऊस झाला. ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि उल्हासनगर या उपनगरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई विमानतळावरील कामकाज स्थगित करण्यात आले आहे.