अन्वय सावंत
कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या श्रेयस अय्यरला अखेर भारतीय कसोटी संघातील स्थान गमवावे लागले आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठीच्या भारतीय संघातून श्रेयसला वगळण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत श्रेयसकडे भावी कर्णधार, दिग्गज मुंबईकर फलंदाजांचा वारसा पुढे चालवणारा खेळाडू म्हणून पाहिजे जात होते. मात्र, आता त्याची कसोटी कारकीर्दच धोक्यात आली आहे. तसेच त्याची तंदुरुस्ती, मानसिक कणखरता आणि फलंदाजीचे तंत्र याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या काही महिन्यांत असा काय बदल झाला आणि कसोटी संघात पुन्हा स्थान मिळवणे श्रेयससाठी किती अवघड असेल याचा आढावा.
श्रेयस जायबंदी की संघातून बाहेर?
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांतील निराशाजनक कामगिरीनंतर श्रेयसच्या कसोटी संघातील स्थानाबाबत चर्चा सुरू झाली होती. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीनंतर श्रेयसने पाठदुखीची तक्रारही केली होती. त्यामुळे त्याला तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी विश्रांती दिली जाऊ शकेल असेही म्हटले जात होते. मात्र, प्रत्यक्षात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर करताना श्रेयस जायबंदी असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही. त्याच वेळी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांना १७ सदस्यीय संघात स्थान मिळाले, पण त्यांची निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असेल असे स्पष्ट केले. श्रेयसबाबत अशी कोणतीही माहिती न देण्यात आल्याने त्याला कसोटी संघातून वगळण्यात आल्याचेच संकेत मिळत आहेत. त्यातच ‘बीसीसीआय’मधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, श्रेयसचा इतक्यातच पुन्हा कसोटी संघासाठी विचार केला जाणार नाही. त्यामुळे श्रेयसची कसोटी कारकीर्द सध्या तरी धोक्यात दिसत आहे. तसेच त्याच्या तंदुरुस्तीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या काही काळापासून पाठदुखीने त्याला सतावले आहे. पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागल्याने श्रेयसला २०२३चे संपूर्ण ‘आयपीएल’ आणि जागतिक अजिंक्यपद कसोटीच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीला मुकावे लागले होते.
हेही वाचा >>> विश्लेषण: सीबीएसईच्या शैक्षणिक आराखडयातील बदल काय?
श्रेयसने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत कशी कामगिरी केली आहे?
कसोटी क्रिकेटमध्ये लक्षवेधी पदार्पणानंतर श्रेयसला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्याने २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कानपूर येथे कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच डावात १०५ धावांची खेळी केली. त्यानंतरच्या २३ डावांत मात्र त्याला एकदाही शतक साकारता आले नाही. तसेच पहिल्या ११ कसोटी डावांत त्याने एका शतकासह पाच अर्धशतकेही केली होती. तर त्यानंतरच्या १३ डावांत त्याला एकदाही ४० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. एकूण १४ कसोटी सामन्यांच्या २४ डावांत त्याने ३६.८६ च्या सरासरीने ८११ धावा केल्या आहेत. कसोटी पदार्पण आणि २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेली मीरपूर कसोटी (भारतीय संघ अडचणीत असताना पहिल्या डावात ८६ धावा) वगळता श्रेयसला कधीही छाप पाडता आली नाही.
श्रेयसच्या मानसिकतेबाबत प्रश्न का उपस्थित केले जातात?
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रेयसला रणजी करंडकात खेळण्याची भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सूचना करण्यात आली होती. त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व करताना आंध्रविरुद्ध ४८ चेंडूंत ४८ धावांची खेळी केली. ‘तुला आणखी चेंडू खेळायला आवडले असते का,’ असे सामन्यानंतर त्याला विचारण्यात आले. त्यावर ‘बचावात्मक फलंदाजी करून, चेंडू सोडत राहून मला कंटाळा येईल हे ठाऊक होते. त्यामुळे मी फटके मारण्याचा प्रयत्न केला,’ असे उत्तर श्रेयसने दिले. त्याचे हे उत्तर त्याच्या मानसिकतेबाबत खूप काही सांगून जाते. श्रेयसच नाही, तर अलीकडच्या काळात बहुतेक फलंदाज हे सामन्यात अवघड परिस्थिती असेल, तर खेळपट्टीवर उभे राहून गोलंदाजांचा नेटाने सामना करण्यापेक्षा, जितक्या कमी वेळात जितक्या अधिक धावा करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करतात. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटीत श्रेयसने चांगली सुरुवात केली. मात्र एखाद्या ‘खडूस’ मुंबईकर फलंदाजाप्रमाणे त्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्याऐवजी तो बेजबाबदार फटका मारून बाद झाला. फिरकीपटूंविरुद्ध क्रीजबाहेर येत मोठा फटका मारण्याचा मोह श्रेयसला आवरता येत नाही हे वारंवार दिसून आले आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : ‘भारतरत्न’च्या मागे फायद्याचं राजकारण? या पुरस्काराचा इतिहास नेमका कसा राहिला आहे? जाणून घ्या…
फलंदाजीच्या तंत्राचे काय?
श्रेयसचे फलंदाजीचे तंत्रही प्रश्नांकित आहे. वेगवान गोलंदाजांच्या उसळी घेणाऱ्या चेंडूंविरुद्ध तो वारंवार अडचणीत सापडताना दिसला आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, ही बाब त्याला फारशी आवडली नव्हती. ‘उसळी घेणारे चेंडू मला अडचणीत टाकतात यात तथ्य नसून हे चित्र माध्यमांनी तयार केले आहे,’ असे श्रेयस त्यावेळी म्हणाला होता. परंतु श्रेयसच्या बोलण्यामध्ये आणि त्याच्या मैदानावरील कामगिरीत बरीच तफावत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी सामने खेळला. या दोनही सामन्यांत वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्यांवर श्रेयसच्या फलंदाजी तंत्रातील मर्यादा स्पष्ट झाल्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीच्या खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना फारशी मदत नव्हती. त्यामुळे इंग्लंडने मार्क वूडच्या रूपात केवळ एकच वेगवान गोलंदाज खेळवला. मात्र, वूडने श्रेयसची कसोटी पाहिली. वूड उसळी घेणारे चेंडू टाकणार असे श्रेयसला वाटत असल्याने त्याने शरीराचा भार मागील बाजूस (बॅकफूट) ठेवला. तसेच त्याने डावीकडे जात यष्टी सोडून खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु वूडने उसळी घेणारे चेंडू टाकण्याऐवजी उजव्या यष्टीबाहेर चेंडू टाकण्यास प्राधान्य दिले. त्याला कसे खेळावे याबाबत श्रेयस संभ्रमात पडला. त्यामुळे त्याच्या तंत्राबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले गेले.
श्रेयसला पुनरागमन करणे कितपत अवघड जाऊ शकेल?
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ पुढील काही महिने ट्वेन्टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेल. भारतीय खेळाडू मार्च ते मे या कालावधीत ‘आयपीएल’ आणि त्यानंतर जूनमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळतील. भारतीय संघाची पुढील कसोटी मालिका थेट ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध असेल. न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत तीन कसोटी सामने खेळणे अपेक्षित आहे. त्यानंतर वर्षाअखेरीस भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवरही वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त उसळी मिळते. त्यामुळे या मालिकेसाठी श्रेयसचा विचार होण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच मधल्या फळीसाठी भारताकडे विराट कोहली, केएल राहुल या अनुभवी फलंदाजांसह रजत पाटीदार आणि सर्फराज खान यांचे पर्याय आहेत. चेतेश्वर पुजारा रणजी करंडकात अजूनही धावांचा डोंगर उभारत आहे. तसेच देवदत्त पडिक्कल अलीकडच्या काळात मधल्या फळीत खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. भविष्यात तिलक वर्मा आणि प्रदोष रंजन पॉल यांचाही विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे श्रेयसचे कसोटी संघातील पुनरागमन सध्या तरी अवघड दिसत आहे.