ज्ञानेश भुरे

आंतरराष्ट्रीय हॉकीवर सुरुवातीच्या काळात भारतानंतर जर कुणी वर्चस्व राखले, तर ते पाकिस्तानने. मात्र, आज हाच पाकिस्तान संघ हॉकीच्या वैश्विक पातळीवर कुठेच दिसत नाही. सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेपासून वंचित राहण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. पाकिस्तान हॉकी संघाची इतकी दुर्दशा का झाली, याचा आढावा.

पाकिस्तानची आजपर्यंतची ऑलिम्पिकमधील कामगिरी कशी होती?

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानंतर एक काळ पाकिस्तानने निश्चितपणे आपले वर्चस्व राखले होते. त्यांचा दरारा होता. तीन वेळा ऑलिम्पिक विजेतेपद मिळवणारा पाकिस्तान संघ अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही आपली मक्तेदारी राखून होता. या संघाने आजवर सर्वाधिक चार वेळा विश्वविजेतेपद पटकावलेले आहे. मात्र, आता पाकिस्तान संघावर सलग तीन वेळा ऑलिम्पिकपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीत त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नियमानुसार पात्रता फेरीतील पहिले तीन संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतात.

पाकिस्तान हॉकी संघावर अशी वेळ का यावी?

भारतावरही यापूर्वी ऑलिम्पिकमधून बाहेर पडण्याची वेळ आली होती. मात्र, त्या एका वर्षानंतर भारतीय हॉकीने जी मानसिकता दाखवली त्याचे फळ आता मिळू लागले आहे. सुवर्णकाळ गमावलेल्या भारताने गेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकापर्यंत मजल मारली. परंतु, भारताने जी मानसिकता राखली ती पाकिस्तान दाखवू शकले नाही. हॉकीतील अपयशाची कारणे शोधण्यापेक्षा त्यांनी दुसऱ्यांकडे कायम बोट दाखवले. त्यांना आत्मपरीक्षण करण्याची कधीच गरज वाटली नाही.

हेही वाचा >>>जरांगे पाटलांचा ‘सगेसोयरे’ शब्दावर भर का? मराठा आरक्षणाच्या लढ्यात यामुळे काय बदल होणार? वाचा…

पाकिस्तानात सध्या हॉकी संघटनेची स्थिती काय आहे?

याचे मूळ पाकिस्तानच्या हुकूमशाही सत्तेत दडले आहे. आज क्रिकेट आणि हॉकी या दोन्ही खेळांच्या महासंघांवर पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचेच नाव आहे. दोन्ही महासंघ तेच चालवत आहेत. क्रिकेटने तग धरला, पण हॉकी महासंघ पार रसातळाला गेला. गेल्या वर्षी तर पाकिस्तान हॉकी महासंघाची निवडणूक रद्द करून पाकिस्तान हॉकी महासंघाला निलंबित केले. महासंघातील अशा सरकारी हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघही पाकिस्तानवर बंदी घालायचा विचार करत होते. पण, त्यांनी तसे न करता पाकिस्तानातील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद काढून घेतले. भारताचा सहभाग नसतानाही पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीचे पाकिस्तानचे यजमानपद आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने काढून घेतले. एकूणच संघटनेला कोणाचाच आधार राहिलेला नाही.

पाकिस्तानातील हॉकी आता कशा स्थितीत?

पाकिस्तान हॉकी महासंघच मुळात कर्जबाजारी झाला आहे. त्यांना आपल्या खेळाडूंनाही देण्यासाठी पैसे नाहीत. पाकिस्तानचा संघ बाहेर खेळायला पाठवायचा झाला तरी त्यांना हात पसरावे लागत आहेत. आज पाकिस्तानमध्ये जी काही हॉकी सुरू आहे, त्यासाठी सर्वाधिक पैसा सरकारकडून येत आहे. मात्र, आता सरकारने हॉकी महासंघावर कारवाई केल्यामुळे त्यांनीही हात आखडता घेतला आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे पाकिस्तान देशच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा वेळी कर्ज काढून परदेशी प्रशिक्षक आणणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली जुनी परंपरा सोडणे यासाठी खेळाडूच तयार नाहीत. त्यांना अजून जुन्याच पद्धतीने खेळायचे आहे. परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करूनही त्यांना पगार द्यायलाही त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे आता परदेशी प्रशिक्षकही पाठ फिरवू लागले आहे. चेंडूच्या उपलब्धतेपासून अन्य तांत्रिक सुविधांचाही पाकिस्तानात वानवा आहे. बदल आवश्यक असल्याचे मान्य करणारे खेळाडू आहेत, पण ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. त्यांनी युरोपचा रस्ता धरला आहे. तेथील व्यावसायिक हॉकी खेळून ते आपला खर्च भागवतात.

हेही वाचा >>>उत्तराखंडमध्ये फेब्रुवारी महिन्यात समान नागरी कायदा लागू होणार? जाणून घ्या तरतुदी काय…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तान हॉकीत पुनरागमन करू शकेल का?

पाकिस्तानला हॉकीमध्ये पुन्हा मोठ्या स्तरावर परतायचे असेल, तर त्यासाठी सर्वांत आधी मोठी राजकीय इच्छाशक्ती लागेल. राजकीय नेत्यांपासून हॉकीला दूर करावे लागेल. तळागाळातून हॉकी खेळाडूंचा शोध घ्यावा लागेल. माजी खेळाडूंचे मत विचारात घ्यावे लागेल. राष्ट्रीय सराव शिबिरांचे आयोजन करावे लागेल. देशांतर्गत स्पर्धा सुरू कराव्या लागतील. असे घडले तरच पाकिस्तानातील हॉकीची गाडी रुळावर येईल.