scorecardresearch

Premium

विश्लेषण: कापसाचे भाव यंदा वाढतील का?

विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील अनेक भागांत पूर्वहंगामी कापसाची वेचणी सुरू असून बाजारात नवीन कापसाची आवकही सुरू झाली आहे, पण यंदा सुरुवातीलाच कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत.

Loksatta Explained, cotton prices, will cotton prices increase this year , cotton prices,
विश्लेषण: कापसाचे भाव यंदा वाढतील का?

मोहन अटाळकर

विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील अनेक भागांत पूर्वहंगामी कापसाची वेचणी सुरू असून बाजारात नवीन कापसाची आवकही सुरू झाली आहे, पण यंदा सुरुवातीलाच कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. २०२३-२४ या हंगामात मध्यम धाग्याच्या कापसाला ६ हजार ६२० आणि लांब धाग्यासाठी ७ हजार २० रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर झाला आहे. परंतु एवढा दर बाजारात अपवादानेच मिळत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ८ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाले होते. २०२१ मध्ये दहा हजारांच्या वर भाव मिळाला होता. ती स्थिती यंदा येऊ शकेल का, हा प्रश्न चर्चेत आला आहे.

राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा फटका, हवामान खात्याचा इशारा
unseasonal rain Vidarbha
‘या’ राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्याबाबत हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…
loksatta district index development in nagpur city but neglect rural areas
शहरी भागांत विकास, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष; उपराजधानीत पायाभूत सुविधांचा विस्तार; संत्री उत्पादकांना फटका
price of Tur is more than ten thousand
अमरावती : तुरीचे दर दहा हजाराच्‍या पार

यंदा कापूस लागवडीची स्थिती काय?

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात ४२.३४ लाख हेक्टर क्षेत्रात (म्हणजे एकूण लागवड क्षेत्राच्या ३० टक्के) कापूस पिकाची लागवड झाली. राज्यात सोयाबीननंतर सर्वाधिक लागवड कापसाचीच आहे. यंदा १७ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला असला, तरी ऑगस्टमध्ये पावसाने खंड दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम दिसून येत आहे. त्यातच पांढरी माशी, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत आणि कापूस लागवड ते वेचणीपर्यंतच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा >>>गाझामध्ये रुग्णवाहिका, शवागृहे अपुरी, सध्या गाझामध्ये काय परिस्थिती आहे? जाणून घ्या…

देशातील बाजारात कापसाचे दर कसे आहेत?

देशातील बाजारात सध्या कापसाचे दर स्थिर आहेत. बाजार समित्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसामध्ये सध्या ओलावा जास्त आहे. त्यामुळे भावपातळी कमी दिसून येत आहे. नवीन कापसाला तर ५ हजारांपासून भाव मिळत आहे. हे दर हमीभावापेक्षा खूपच कमी आहेत. गेल्या हंगामातही सुरुवातीला कमी दर मिळाले होते, पण शेतकरी चांगल्या भावाच्या अपेक्षेने कापूस लगेच बाजारात आणत नाहीत. मागील हंगामात शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवल्याने हमीभावापेक्षा किंचित जास्त दर मिळाला होता, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

कापूस पिकाचे किती नुकसान झाले आहे?

यंदा कापूस लागवड उशिरा झाली. पावसातही मोठे खंड पडले. ऑगस्ट ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत जवळपास ४५ दिवस पिकाला पोषक असा पाऊस पडला नाही. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक सर्वच भागांत कमी पावसाचा कापूस पिकाला फटका बसला. कापसाची उत्पादकता आणि गुणवत्ताही कमी झाली. त्यामुळे यंदा शेतकरी हमीभावापेक्षा किमान २० टक्के अधिक दराची अपेक्षा ठेवून आहेत. कापसातील ओलावा कमी झाल्यानंतर किमान भावातही सुधारणा झालेली दिसेल, असे बाजार अभ्यासकांचे निरीक्षण असले, तरी बाजारात कापसाची आवक वाढल्यानंतर कापसाचे दर आणखी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा >>>यंदाच्या ‘नोबेल’नंतर इराणमधील महिलांच्या समस्यांकडे लक्ष जाणार का?

जागतिक बाजारात कापसाचे दर काय आहेत?

जागतिक बाजारात कापसाचे दर सध्या ९० ते ९५ सेंट प्रति पाऊंड इतके आहेत. रुपयांमध्ये हा दर ५० ते ६० हजार रुपये प्रति खंडी एवढा होतो. भारतीय बाजारातही कापसाचे दर सध्या स्थिर आहेत. पंजाब व राजस्थानातील नवीन कापसाला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. सरकीचे भाव ३ हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. २०२१-२२ च्या हंगामात रुईचे दर प्रति खंडी १ लाख रु.वर पोहोचले होते. मात्र २०२२-२३ च्या हंगामात ते ४० टक्क्यांनी घटून प्रति खंडी ५७ हजार ते ६० हजार रु.वर स्थिरावले.

यंदा कापूस बाजारात कशी स्थिती राहणार?

सध्या कापसाची आवक अल्प प्रमाणात सुरू झाली आहे, पण डिसेंबरात महाराष्ट्र व गुजरातच्या कापसाची आवक वाढताच कापसाचे दर कमी होण्याची शक्यता आहे, असे मत ज्येष्ठ शेती अभ्यासक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा परिणाम हा कापूस बाजारावर होत असतो. कापूस आयात करण्यासाठी वाहतूक खर्च येतो. स्थानिक बाजारपेठेत स्वस्तात कापूस उपलब्ध झाल्यास आयात कमी होईल. कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने आतापासून भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) कापूस खरेदीसाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरायला हवा. त्याच वेळी केंद्र सरकारने कापसाच्या निर्यातीवर अनुदान द्यायला हवे, अशी मागणी जावंधिया यांनी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta explained will cotton prices increase this year print exp 1023 amy

First published on: 17-10-2023 at 00:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×