Monkeypox Virus : कधीकाळी भारतात आलेल्या देवी अर्थात स्मॉलपॉक्सच्या साधीमुळे शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर जवळपास शंभर वर्षांनी जगभरात आलेल्या करोनाच्या लाटेनं अवघ्या जगाला भयकंपित करून सोडलं. जवळपास दोन वर्षाहून अधिक काळ जगाला मृत्यूच्या छायेखाली ठेवल्यानंतर आता कुठे काहीसं वातावरण सुरळीत होऊ लागल्याचं दिसू लागलं आहे. करोनावरील लसी आणि करोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन या जोरावर हा लढा सुरू असून बऱ्याच अंशी यशस्वी झालेला असताना आता पुन्हा एकदा एका आजारानं जगभरातल्या शास्त्रज्ञांच्या मनात भितीची पाल चुकचुकली आहे. इंग्लंडमध्ये सापडलेल्या एकमेव मंकीपॉक्सच्या रुग्णामुळे जगभरातले शास्त्रज्ञ सतर्क झाले आहेत. पण नेमका हा आजार आहे तरी काय? सविस्तर जाणून घेऊयात!

नायजेरियातून इंग्लंडमध्ये आलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या आजारावर चर्चा सुरू झाली. लंडनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस फाऊंडेशन ट्रस्टमध्ये या रुग्णावर उपचार सुरू आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा मागोवा संशोधक घेत आहेत. कारण अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना या आजाराची लागण होण्याचा धोका जास्त असतो.

प्राणीसंसर्गजन्य आजार!

मंकीपॉक्स हा एक प्रकारचा प्राणीसंसर्गजन्य आजार मानला जातो. यामध्ये प्रामुख्याने प्राण्यांपासून मानवाकडे किंवा मानवाकडून प्राण्यांकडे मंकीपॉक्सच्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. मात्र, माणसांमध्ये तो इतक्या सहज वा वेगाने पसरू शकत नाही. बहुतांश रुग्ण हे मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर आठवड्याभरात बरे देखील होऊ शकतात. मात्र, काहींना गंभीर लक्षणं जाणवू शकतात.

मंकीपॉक्सचा सर्वात पहिला संसर्ग सुमारे ६५ वर्षांपूर्वी अर्थात १९५८ साली माकडांमध्ये आढळून आला. त्यामुळेच या आजाराला मंकीपॉक्स म्हटलं जातं. १९७०मध्ये कांगो देशात मंकीपॉक्सचा पहिला मानवी रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मंकीपॉक्स आफ्रिकेतील इतरही देशांमध्ये हळूहळू आढळून येऊ लागला. जागतिक आरोग्य संघटनेनुसार देवी रोगावर इलाज सापडल्यानंतर मंकीपॉक्स हा अशा प्रकारच्या आजाराच्या श्रेणीतील सर्वात महत्त्वाचा आजार मानला जाऊ लागला. आत्तापर्यंत आफ्रिकेप्रमाणेच अमेरिका, इस्त्रायल, सिंगापूर आणि यूकेमध्ये देखील मंकीपॉक्सचे काही रुग्ण आढळून आले आहेत.

सीडीसी अर्थात सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या माहितीनुसार, मंकीपॉक्सचा विषाणू नेमका कुठून जन्माला आला, त्याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, आफ्रिकेमध्ये प्रामुख्याने माकडांमध्ये या विषाणूचा वावर आढळतो. तिथूनच माणसांमध्ये त्याचा प्रसार होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

मंकीपॉक्सची लक्षणं काय?

माणसांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणं ही देवीच्या आजाराप्रमाणेच जाणवतात. पण त्यांचं स्वरूप सौम्य असतं. या संसर्गाची विभागणी दोन काळात केली जाऊ शकते. पहिला लागण होण्याचा काळ आणि दुसरा अंगावर मोठमोठाले फोड येण्याचा काळ. दुसरा काळ जवळपास पाच दिवसांपर्यंत असू शकतो. या आजाराची सुरुवात ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, पाठदुखी, लसिकेच्या तोंडाशी आलेली सूज, थकवा अशा लक्षणांपासून होते.

या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर प्रत्यक्षात लक्षणं आणि त्यानंतर आजार बळावण्याचा कालावधी ७ ते १४ दिवसांचा असू शकतो. काही प्रकरणांत तो ५ ते २१ दिवसांचा देखील असण्याची शक्यता आहे. यानंतर पहिल्या तीन दिवसांमध्ये ताप आल्यानंतर रुग्णाच्या शरीरावर फोड यायला सुरुवात होते. हे फोड सामान्यपणे चेहऱ्यावर सर्वप्रथम येतात आणि त्यानंतर शरीराच्या इतर भागांमध्ये येतात. मंकीपॉक्स साधारणपणे दोन ते चार आठवड्यांपर्यंत राहू शकतो. बहुतांश प्रकरणांमध्ये हा आजार बरा होत असला, तरी आफ्रिकेमध्ये आकडेवारीनुसार १० रुग्णांच्या मागे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं दिसून येतं.

मंकीपॉक्सचा विषाणू शरीरात प्रवेश कसा करतो?

जेव्हा एखादी व्यक्ती मंकीपॉक्सची लागण झालेला प्राणी किंवा व्यक्तीच्या संपर्कात येते किंवा विषाणू असलेल्या वस्तूच्या संपर्कात येते, तेव्हा या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. एखादी छोटी किंवा मोठी जखम, श्वसनमार्ग यातून मंकीपॉक्सचा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. शिंकेवाटे किंवा खोकल्याद्वारे देखील माणसाकडून माणसाकडे याचा फैलाव होण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे मंकीपॉक्सचा फैलाव होण्याची सर्वात मोठी साखळी ही ६ व्यक्तींची ठरली आहे.

एखाद्या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी Polymerase Chain Reaction अर्थात PCR ही चाचणी केली जाते. या चाचणीसाठी रुग्णाच्या त्वचेतून किंवा बायोप्सीच्या माध्यमातून नमुने गोळा केले जातात. यासोबत ताप येण्याची तारीख, पुरळ उठण्याची तारीख, नमुने गोळा करण्याची तारीख, चाचणीच्या वेळी फोडांचं प्रमाण आणि रुग्णाचं वय अशी माहिती नमुन्यांचं परीक्षण करण्यासाठी महत्त्वाची ठरते.

Monkeypox: इंग्लंडमध्ये आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; जाणून घ्या दुर्मिळ संसर्गाची भयावह लक्षणं

मंकीपॉक्स विषाणूपासून बचाव कसा कराल?

या विषाणूची लागण झालेल्या प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, अशा प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या गोष्टींपासून लांब राहाणे, विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचं विलगीकरण करणे, संभाव्य लागण झालेल्या व्यक्ती किंवा प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर शारिरीक स्वच्छतेवर लक्ष ठेवणे आणि अशा ठिकाणी जातानी पीपीई किटचा वापर करणे अशा काही प्रतिबंधात्मक गोष्टी करता येऊ शकतात.

या आजारावर उपचार शक्य आहेत का?

सद्यस्थितीला मंकीपॉक्सवर कोणतेही विज्ञानसिद्ध आणि सुरक्षित असे उपचार सापडू शकलेले नाहीत. काही वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यांनुसार मंकीपॉक्सवरील लसीमुळे हा आजार दूर राहण्याचं प्रमाण ८५ टक्के इतकं आहे. विशेषत: लहानपणीच केलेल्या लसीकरणामुळे आजार होण्याचं किंवा झाल्यास त्याच्या तीव्रतेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. देवीच्या आजारावर शोधण्यात आलेली सर्वात पहिली लस आता बाजारातून हद्दपार झाली आहे. पण २०१९मध्ये शोधण्यात आलेली एक लस स्मॉलपॉक्स किंवा मंकीपॉक्सपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं जातं. मात्र, ही लस अद्याप सार्वजनिकरीत्या उपलब्ध झालेली नाही.