3000-year-old settlement Maharashtra: नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात सुमारे ३,००० वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडल्याचा दावा केला आहे. या शोधामुळे मध्य भारतातील प्राचीन मानवी वस्तीविषयीच्या ज्ञानात महत्त्वपूर्ण भर पडणार असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात लोहयुगातील वस्ती
बाभळगाव तालुक्यातील पाचखेड गावात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले होते. या भव्य प्रकल्पाचं नेतृत्त्व नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाष साहू यांनी केलं. या शोधातून लोहयुगातील एका वस्तीचा शोध लागला असून या वस्तीची नोंद आजवर कुठेच करण्यात आलेली नव्हती. ही वस्ती या भागातील सर्वात प्राचीन वसाहतींपैकी एक असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्राच्या मध्यभागी प्राचीन वस्तींचा शोध
या प्राचीन वस्तीच्या शोधार्थ केलेल्या उत्खननासाठी पाचखेड गावालगत असलेल्या एका टेकाडाची नोंद करण्यात आलेली होती. पुरातत्त्वशास्त्रात, अशा ठिकाणांना पांढरीचे टेकाड म्हणतात (mounds) आणि त्यांना दीर्घकालीन मानवी वसाहतीचं प्रतीक मानलं जातं. या टेकाडांवर शतकानुशतके अथवा हजारो वर्षांच्या कालावधीत माती आणि सांस्कृतिक अवशेष थरांच्या स्वरूपात साचत राहतात. सध्या उत्खनन करण्यात आलेल्या या टेकाडात सुमारे ८.७३ मीटर जाडीचा सांस्कृतिक थर आढळून आला आहे. हा थर गेल्या अनेक कालखंडात झालेल्या मानवी वास्तव्याचं द्योतक आहे. उत्खननासाठी स्तरांनुसार निरीक्षण पद्धती वापरण्यात आली.
महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचे थर उलगडताना…
उत्खननादरम्यान संशोधकांनी या टेकाडामध्ये एकूण चार वेगवेगळ्या सांस्कृतिक कालखंडांचा मागोवा घेतला. यातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचा थर लोहयुगाशी संबंधित आहे. तो या वस्तीचा पाया मानला जातो. या कालखंडाची ओळख लोहयुगीन समाजांमध्ये आढळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या लोखंडी साधनं आणि मृत्तिकाभांड्यांच्या वर्गीकरणावरून करण्यात आली. अभ्यासकांनी या लोहयुगीन टप्प्याला आणखी उप-टप्प्यांमध्ये विभागून, त्या-त्या काळातील सांस्कृतिक अवशेषांचा मागोवा घेतला.
लोहयुगानंतरचा कालखंड सातवाहन काल मानला जातो. इ.स.पू. २ ऱ्या शतकापासून इ.स. ३ ऱ्या शतकापर्यंत दख्खन पठारावर राज्य करणाऱ्या सातवाहन राजवटीच्या वस्तीचे पुरावे या स्थळी आढळतात. या कालखंडातली भांडी, मृत्तिकापात्रांचे विशिष्ट आकार व इतर अवशेष यामध्ये या ऐतिहासिक संक्रमण काळाच्या खुणा स्पष्टपणे दिसतात.
मध्ययुगीन पुरावे
तिसरा सांस्कृतिक टप्पा मध्ययुगीन कालखंडाशी संबंधित आहे. या काळात पुन्हा वस्ती झाल्याचे संकेत मिळतात. याकाळात तुलनेत कमी पुरावे मिळाले, तरीही त्यांचे अस्तित्व हे संपूर्ण उत्खननाचा कालक्रम ठरवण्यास पुरेसे आहे. या ठिकाणी आढळलेला सर्वात वरचा थर निजामकालीन असल्याचं आढळलं आहे. यावरून १८ व्या ते २० व्या शतकाच्या दरम्यान या टेकाडाचा वापर निजामांच्या कारकिर्दीत टेहळणी बुरुज (watchtower) म्हणून केला जात असावा, असे संकेत मिळतात.
प्राचीन वस्त्यांची वास्तुकला
या उत्खननातील एक अत्यंत आकर्षक बाब म्हणजे प्राचीन वास्तूंच्या रचनेवर प्रकाश टाकणारे पुरावे. उत्खननात गोलाकार घरांचे अवशेष सापडले असून, ही रचना प्रारंभीच्या कृषिप्रधान व आदिवासी समाजांमध्ये आढळणारी एक नेहमीची रचना आहे. या घरांमध्ये चुन्याच्या फरश्या आढळल्या असून, यावरून बांधकामामध्ये काही प्रमाणात नियोजन आणि स्थैर्य होते, असे स्पष्ट होते. घराच्या परिघाभोवती लाकडी खांब रोवलेले होते, जे गवताच्या छपरासाठी (thatch) किंवा लाकडाच्या छतासाठी आधार म्हणून वापरले गेले असावेत. या घरांमध्ये गृहजीवनाशी संबंधित काही अत्यंत सुंदररीत्या जतन झालेल्या घटकांचे पुरावे मिळाले. त्यापैकी एक महत्त्वाचा शोध म्हणजे चुलीसह (मातीची शेगडी) पूर्ण घराचा आराखडा सूचित करतो की, घरात अन्न शिजवण्यासाठी एक स्वतंत्र स्वयंपाकघराचा भाग होता. या उत्खननामुळे प्राचीन वस्तीतील लोक कसे राहत होते, स्वयंपाक कसे करत होते आणि कसे एकत्र जमत येत असावेत, याची स्पष्ट भौतिक कल्पना करता येते.
प्राचीन जीवनाची साक्ष देणारे अवशेष
या स्थळी उत्खननातून सापडलेले अवशेष माहितीपूर्ण आणि विविध स्वरूपाचे होते. या उत्खननात उघड झालेल्या सांस्कृतिक थरांमध्ये मृत्तिकाभांड्यांचे वेगवेगळे प्रकार व पोत आढळले आहेत. उत्खननात सापडलेल्या लोखंडी वस्तू या समुदायाला धातू वापरण्याचा अनुभव होता आणि त्यांनी लोहयुगाशी सुसंगत असा तांत्रिक बदल स्वीकारला होता, हे स्पष्ट होते. त्याशिवाय मौल्यवान खड्यांपासून तयार केलेले मणी आणि टेराकोटा मणीही सापडले आहेत. हे मणी अलंकारासाठी किंवा त्यांचा व्यापार होत असावा.
हस्तकला, व्यापार आणि धर्म
याशिवाय उत्खननातील अवशेषांमध्ये प्राण्यांच्या हाडांचाही समावेश आहे. हे सर्व अवशेष एकत्रितपणे असे दर्शवतात की, ही समाजरचना केवळ तांत्रिकदृष्ट्या प्रगत नव्हती, तर ती हस्तकला, व्यापार आणि कदाचित धार्मिक प्रथा यामध्येही प्रवीण होती.
वैज्ञानिक विश्लेषण या स्थळाचे ३,००० वर्षांपूर्वीचे वय निश्चित करणार
या स्थळावर सापडलेले अवशेष आणि त्या परिसराचे स्वरूप या स्थळाच्या पहिल्या थराचे वय सुमारे ३,००० वर्षे असल्याचे सूचित करत असले, तरीही त्याचे प्रयोगशाळेत शिक्कामोर्तब करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. अचूक कालरेषा निश्चित करण्यासाठी संशोधन पथकाने सेंद्रिय नमुने नवी दिल्लीतील इंटर युनिव्हर्सिटी अॅक्सेलरेटर सेंटर (IUAC) येथे पाठवले आहेत. IUAC येथे अॅक्सेलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री (AMS) नामक एक अचूक वैज्ञानिक तंत्र वापरून ही डेटिंग प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये कार्बन आयसोटोप्सचा ऱ्हास मोजून प्राचीन वस्तूंचं वय ठरवले जाते. हे विश्लेषण २०२५ च्या मे किंवा जून महिन्यात प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे.
वस्तूच्या वयासंदर्भातील ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण ती या टेकाडाच्या खालच्या स्तरांमध्ये लोहयुगाच्या प्रारंभकालीन वस्ती होती का, हे निश्चित करेल. डॉ. साहू यांनी सांगितले की, एकदा वैज्ञानिक विश्लेषणातून मिळालेली माहिती समोर आली की, तो ३,००० वर्षांपूर्वीचा कालखंड ठामपणे सांगता येईल.
तर मध्य भारताच्या प्राचीनतेवर प्रकाशझोत
या सुरुवातीच्या थराच्या वयावर शिक्कामोर्तब झाले, तर हे उत्खनन विदर्भातील सर्वात प्राचीन लोहयुगीन वसाहतींपैकी एक ठरू शकते. विशेषतः गंगेच्या खोऱ्यात किंवा सिंधू संस्कृतीप्रमाणे पुरेशा संशोधनात न आलेल्या मध्य भारतातील प्रदेशांच्या पुरातत्त्वीय इतिहासात ही एक मोठी भर ठरेल.