Japan Megaquake जपानमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून जपानच्या विविध भागांत भूकंपाचे अनेक धक्के जाणवत आहेत. त्यातच जपानमध्ये महाप्रलय, त्सुनामी होईल अशी भीती काही भविष्यवेत्त्यांनी वर्तवली आहे. भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय देशांपैकी एक असलेल्या जपानने नानकाई ट्रफचे आपत्तीजनक परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने नवीन आपत्ती धोरण मंजूर केले आहे. येत्या काही दशकांत जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील सबडक्शन झोन असलेल्या नानकाई मेगाथ्रस्टवर एक शक्तिशाली भूकंप आणि त्यानंतर त्सुनामी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी जपान सरकारकडून पूर्व उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सरकारी अंदाजानुसार या घटनेमुळे तब्बल २,९८,००० लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि २.३५ दशलक्षाहून अधिक इमारती उद्ध्वस्त होऊ शकतात. काय आहे नानकाई ट्रफ? त्याचा जपानला धोका किती? जपानी बाबा वेंगाने भूकंपाबाबत काय भाकीत केले? त्याविषयी जाणून घेऊयात.
नानकाई ट्रफ मेगाकंप म्हणजे काय? जपानला त्याचा धोका किती?
‘द इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार, जपानमधील पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन परिषदेने टोकियो येथे नवीन योजनेला मान्यता देण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीत २०१४ च्या आपत्ती मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली. या बैठकीत पुढील दहा वर्षांत ८० टक्के मृत्यू आणि ५० टक्के नुकसान कमी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले.

जपान हा जगातील सर्वांत जास्त भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. नानकाई ट्रफ हा भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय समुद्रतळ आहे. जपान सरकारचा अंदाज आहे की, नानकाई ट्रफवर ८ ते ९ तीव्रतेचा भूकंप होण्याची ८० टक्के शक्यता आहे. नानकाई ट्रफ हा जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यावर सुमारे ८०० किलोमीटर (५०० मैल) पसरलेला एक समुद्राखालील खंदक (ट्रेंच) आहे. जपान हवामान संस्थेच्या मते, फिलिपिन्स सागरी प्लेट या प्रदेशातील युरेशियन प्लेटवर दबाव आणते, ज्यामुळे कधी कधी युरेशियन प्लेट मागे सरकते. याच हालचालीमुळे महाभूकंप आणि त्सुनामीचा धोका उद्भवतो.
१९४६ मध्ये शिकोकू येथे नानकाई ट्रफ भूकंपाची तीव्रता ८.० होती. त्या भूकंपामध्ये १,३०० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले होते. जपानने पुढील ३० वर्षांत या भागात ८ ते ९ रिश्टर स्केलचा भूकंप होण्याची शक्यता ७०-८० टक्के असल्याचे भाकीत केले होते. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस)ने नोंदवले आहे की, आतापर्यंतचा सर्वांत शक्तिशाली भूकंप २२ मे १९६० रोजी चिलीमध्ये झाला होता. त्याची तीव्रता ९.५ रिश्टर स्केल होती. हा भूकंप जवळजवळ १,६०० किलोमीटर (१,००० मैल) लांबीच्या फॉल्टवर झाला होता.
नानकाई ट्रफ ईशान्येकडील शिझुओका प्रांतातील सुरुगा खाडीपासून नैर्ऋत्येकडील ह्युगानाडा समुद्रापर्यंत पसरलेला आहे. याच भागात युरेशियन प्लेट आणि फिलीपीन सी प्लेट्समध्ये हालचाल झाल्यास त्या अडकतात. दरम्यान, त्या प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात. ही ऊर्जा त्या प्लेट्स एकमेकांपासून वेगळ्या झाल्यावर सोडली जाते आणि त्यामुळेच कदाचित मोठे भूकंप होऊ शकतात.
ऐतिहासिकदृष्ट्या नानकाई ट्रफमुळे अंदाजे दर ९० ते २०० वर्षांनी महाभूकंप आले आहेत:
- १७०७ – होई भूकंप
- १८५४ – अँसेई-टोकाई आणि अँसेई-नानकाई भूकंप (एका दिवसाच्या अंतराने आले)
- १९४४ – टोनानकाई भूकंप
- १९४६ – नानकाईडो भूकंप
या पॅटर्नमुळे शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, जपानमध्ये आता अशाच प्रकारचा महाभूकंप होण्याची शक्यता आहे. पॅसिफिक किनाऱ्यालगत असणाऱ्या दाट लोकवस्ती असलेल्या ओसाका, नागोया आणि शिझुओकासारख्या शहरांना याचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
सरकारची नवीन आपत्ती योजना काय आहे?
२०२४ मधील योजनेचाच आधार घेऊन २०२५ साठी नवीन आपत्ती योजना तयार करण्यात आली आहे. त्याची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
- ८० टक्क्यांनी मृत्यू कमी करणे
- संरचनेचे नुकसान ५० टक्क्यांनी कमी करणे
- पूर्व सूचना आणि निर्वासन प्रक्रिया वाढवणे
- उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या पायाभूत सुविधा बळकट करणे.
२,९८,००० नागरिकांचा मृत्यू?
महाभूकंपाचे वेगवेगळे परिणाम आणि भूकंपाच्या पद्धतींवर आधारित उदभवणारी अनेकविध प्रकारची परिस्थिती यांविषयीची माहिती देण्यात आली आहे. नानकाई ट्रफवर ९ रिश्टर स्केलचा भूकंप आल्यास काय होऊ शकते हेही त्यात सांगण्यात आले आहे. त्यात समाविष्ट असलेल्या बाबी खालीलप्रमाणे :
- अंदाजे २,९८,००० नागरिकांचा मृत्यू (त्यात त्सुनामीमुळे झालेल्या मृत्यूंचाही समावेश आहे)
- २.३५ दशलक्ष इमारती उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यातील बहुतांश नुकसान दक्षिण होन्शु आणि शिकोकूमध्ये होऊ शकते.
- २२० ट्रिलियन येन (अंदाजे १.४ ट्रिलियन डॉलर्स) पेक्षा जास्तचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
- काही भागांत ३० मीटरपेक्षा जास्त उंच त्सुनामीच्या लाटा येऊ शकतात.
हा अंदाज भूतकाळातील घटना आणि सध्याची लोकसंख्या, तसेच २०११ च्या ग्रेट ईस्ट जपानमध्ये आलेल्या भूकंपाच्या परिणामांचा अभ्यास करून वर्तवण्यात आला आहे. या भूकंपात तब्बल २०,००० लोकांचा मृत्यू झाला होता.
जपानच्या बाबा वेंगाने महाप्रलयाविषयी काय भाकीत केले?
वैज्ञानिकांच्या चिंतेप्रमाणे ‘नवीन बाबा वेंगा’ म्हणून लोकप्रिय झालेल्या जपानी मंगा कलाकार र्यो तात्सुकीच्या भाकितांनीही लोकांचे लक्ष वेधले आहे. तात्सुकी यांनी जपान आणि फिलीपिन्सदरम्यान समुद्रतळात एक महाकाय भेग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती आणि त्यामुळे २०११ च्या आपत्तीपेक्षा तिप्पट मोठी त्सुनामी येईल, असे त्यांचे सांगणे आहे. भूतकाळातही त्यांनी असे अनेक अचूक अंदाज वर्तविले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाकीताने नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे. तात्सुकी यांनी दिलेल्या इशाऱ्यांना वैज्ञानिक पुराव्यांचा आधार नाही. मात्र, तरीदेखील त्यांच्या भाकीतांची चर्चा जगभरात होत आहे.
अशा परिस्थितीसाठी सरकारकडून काय पूर्वतयारी केली जात आहे?
- किनारी भागातील उच्च-जोखीम असलेल्या घरांचे २०३० पर्यंत नूतनीकरण केले जाईल.
- त्सुनामी आश्रयस्थानांचा विस्तार केला जाईल.
- रुग्णालये, शाळा आणि सार्वजनिक वाहतूक केंद्रांना भूकंपाच्या परिस्थितीसाठी अधिक मजबूत केले जाईल.
- भूकंपानंतरच्या समन्वयासाठी आपत्कालीन संप्रेषण नेटवर्क विकसित केले जातील.
- आणीबाणीच्या काळात वृद्ध आणि अपंगांना मदत करण्यासाठी सामुदायिक वॉच प्रोग्रामना निधी दिला जाईल.
- नैसर्गिक आपत्तीचा इशारा देण्यासाठी मोबाइल अलर्ट सिस्टम अपडेट केल्या जातील.