राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयानंतर राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. शरद पवार यांनी अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, पवारांच्या या निर्णयानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत घेतलेल्या बेधडक आणि टोकाच्या निर्णयांची नव्याने चर्चा होत आहे. काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णयही त्यांपैकीच एक होता. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा का दिला होता? त्यानंतर शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कोणते निर्णय घेतले? राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कशी झाली? हे जाणून घेऊ या.

हेही वाचा >>> विश्लेषण : रेबीज लसींचा तुटवडा का जाणवतोय?

पवारांच्या निर्णयामुळे राज्य, केंद्रातील राजकारणात काय बदल होणार?

शरद पवार यांनी मागील २४ वर्षांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे. असे असताना त्यांनी अचानकपणे राजीनाम्याची घोषणा केली. शरद पवार यांना राष्ट्रीय तसेच राज्यातील राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे तीन पक्ष एकसंध राहण्यात शरद पवार हे महत्त्वाचा दुवा आहेत. तसेच ८२ वर्षीय पवार यांचे देशपातळीवर राजकीय वर्तुळात बरेच मित्र आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या संभाव्य ऐक्यासाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. याच कारणामुळे पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आगामी काळात देश तसेच राज्यातील राजकारणात काय बदल होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे पवार पहिले सर्वांत मोठे नेते

शरद पवार यांनी १९९९ साली काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत देशभरात खळबळ उडवून दिली होती. तेव्हा शरद पवार यांचे काँग्रेसमध्ये महत्त्वाचे स्थान होते. असे असताना त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. शरद पवार आणि काँग्रेसचा असा थेट संबंध नसला तरी, मागील साधारण दोन दशकांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींत युती आहे. मात्र काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणारे पवार हे पहिले सर्वांत मोठे नेते होते. तेव्हापासून आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षातून काढता पाय घेतलेला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : राज्यात अनेक भागांत भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीट का सुरू आहे?

शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी का दिली?

सोनिया गांधी यांचा जन्म विदेशात झाल्यामुळे त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व सोपविण्याला शरद पवार यांनी विरोध केला होता. सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदार ठरविण्यासही शरद पवार यांचा विरोध होता. याच कारणामुळे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात अंतर वाढत गेले. परिणामी २० मे १९९९ रोजी पवार यांना पीए संगमा, तारिक अन्वर यांच्यासह पक्षातून निलंबित करण्यात आले होते. पुढे या तिन्ही नेत्यांनी एकत्र येत १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

शरद पवार यांनी सोनिया गांधी, गांधी घराणे तसेच त्यांच्याशी असलेले संबंध याविषयी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मकथेत सविस्तर भाष्य केलेले आहे. या पुस्तकानुसार सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदासाठी स्वतंत्रपणे विचार करणारा नेता नको होता. याच कारणामुळे त्यांनी पीव्ही नरसिंह राव यांच्याकडे १९९१ साली पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली होती.

हेही वाचा >>> ‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील दावे किती खरे? ३२ हजार तरुणींचे धर्मांतर झाल्याचा आकडा कुठून आला?

“पंतप्रधानपदाचा उमेदवार केल्यास गांधी घराण्यासाठी धोकादायक ठरेल”

“दिल्लीमधील १० जनपथ मार्गाशी (सोनिया गांधी यांचे निवासस्थान) प्रामाणिक असलेल्या नेत्यांनी खासगीमध्ये माझ्याविरोधी वातावरण पसरवण्यास सुरुवात केली. शरद पवार सध्या तरुण आहेत. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केल्यास गांधी घराण्यासाठी ते धोकादायक ठरू शकेल, असे म्हटले जाऊ लागले. यामध्ये एमएल फोतेदार, आरके धवन, अर्जुन सिंह, व्ही जॉर्ज अशा नेत्यांचा समावेश होता,” असे शरद पवार यांनी आपल्या राजकीय आत्मचरित्रात म्हटलेले आहे.

“मी पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार होतो”

नरसिंह राव यांचे वय जास्त असल्यामुळे त्यांची पंतप्रधानपदासाठी निवड करण्यात आली, असा दावा शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात केलेला आहे. “अर्जुन सिंह यांना पंतप्रधान होण्याची इच्छा होती. नरसिंह राव यांच्यानंतर मलाच हे पद मिळेल, असे अर्जुन सिंह यांना वाटत होते,” असे पवार यांनी म्हटलेले आहे. दरम्यान, पंतप्रधानपदाची संधी हुकल्यानंतर पीसी अलेक्झांडर यांनी शरद पवार यांना नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्रीपद घेण्यास राजी केले होते. याबाबतही त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेले आहे. “मी पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार होतो. याची मला आणि पीसी अलेक्झांडर यांना कल्पना होती. मात्र सोनिया गांधी यांना स्वतंत्र विचारांचा पंतप्रधान नको होता,” असा दावा पवार यांनी केलेला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : बीटी कापूस वाणावर नवीन संशोधन काय? सामंजस्य कराराचा काय परिणाम होणार?

“सोनिया गांधी माझ्याविरोधात निर्णय घेत”

लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी असताना १९९६-९७ मध्ये सोनिया गांधी यांनी कसे खच्चीकरण केले, याबाबतही शरद पवार यांनी आपल्या राजकीय आत्मचरित्रात लिहिलेले आहे. “जेव्हा सोनिया गांधी आणि मी काही ठरवत असू तेव्हा त्या अगदी विरुद्ध निर्णय घेत. मी पक्षातर्फे पीसी चाको यांची बोलण्यासाठी निवड केलेली असता सोनिया गांधी यांनी चाको यांच्याऐवजी अन्य नेत्याची निवड केली. त्या अगदी माझ्या विरुद्ध निर्णय घेत,” असे शरद पवार यांनी पुस्तकात लिहिलेले आहे.

“राजीव गांधी यांनी माझे नावही घेतले नाही”

शरद पवार यांनी गांधी घराण्यावर भाष्य करताना राजीव गांधी यांचादेखील उल्लेख केलेला आहे. १९८६ साली काँग्रेस (एस) आणि काँग्रेस (आय) या दोन पक्षांच्या विलगीकरणादरम्यान राजीव गांधी यांनी शरद पवार यांचा उल्लेखही केला नव्हता. याविषयी बोलताना, “मी याचे श्रेय गांधी घराण्याच्या स्वभावाला देतो. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी किंवा गांधी घराण्यातील सर्व सदस्य काँग्रेस पक्षाला स्वत:च्या मालकीचा पक्ष समजतात,” असे शरद पवार यांनी नमूद केलेले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : इलेक्ट्रिक वाहन उद्योगासमोर ‘अंशदान’ संकट

राजीव गांधी यांचा शरद पवारांवर अविश्वास?

सोनिया गांधी यांच्यासह राजीव गांधी यांनीदेखील शरद पवार यांच्यावर अविश्वास दाखवलेला आहे. तशी नोंद शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेली आहे. चंद्रशेखर आणि शरद पवार यांच्यात कौटुंबिक संबंध होते. ते दोघेही चांगले मित्र होते. त्यामुळे चंद्रशेखर शरद पवार यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. तेव्हापासून राजीव गांधी आणि शरद पवार यांच्यात दरी निर्माण झाली. राजीव गांधी यांच्या अविश्वासाबद्दल काँग्रेसचे नेते केव्ही थॉमस यांनी आपल्या ‘सोनिया- द बिलव्हेड ऑफ द मासेस’ या आपल्या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. “शरद पवार यांच्यात क्षमता आहे. मात्र ते विश्वासार्ह नाहीत, असे राजीव गांधी यांना वाटायचे. याच कारणामुळे सोनिया गांधी यांनी शरद पवार यांच्यापासून अंतर ठेवले होते,” असे थॉमस यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

पवारांच्या भूमिकेनंतर सोनिया गांधींना बंडाची चाहूल

याच पुस्तकात थॉमस यांनी शरद पवार यांच्या बंडखोरीबाबत भाष्य केलेले आहे. “शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या कामाची स्तुती केली होती. सोनिया गांधी यांनी पक्षाला एकसंध ठेवण्याचे काम केले. मात्र विरोधकांकडून सोनिया गांधी या विदेशी असल्याचे म्हटले जात आहे. विरोधकांच्या या मुद्द्याचा आपण प्रतिकार करू शकणार नाही. आपण यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या भूमिकेनंतर सोनिया गांधी यांना पवारांच्या बंडाची चाहूल लागली होती,” असे थॉमस यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.

हेही वाचा >>> न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांच्या निर्णयामुळे निवृत्त न्यायमूर्ती कर्णन यांची चर्चा; थेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच दिले होते आव्हान!

सोनिया गांधी यांना अनपेक्षित धक्का

“या बैठकीनंतर सोनिया गांधी शांतपणे बैठक सोडून निघून गेल्या. त्यानंतर मात्र पीए संगमा, तारिक अन्वर आणि शरद पवार यांनी प्रणव मुखर्जी यांना उद्देशून, ही आमची काँग्रेस कार्यकारिणीतील शेवटची बैठक आहे, असे सांगितले. त्यानंतर या नेत्यांनी प्रणव मुखर्जी आणि माधवराव सिंधिया यांना एक पत्र लिहिले. या पत्रात अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. सोनिया गांधी यांनी ते पत्र वाचले नाही. या पत्राला अर्जुन सिंह यांनी उत्तर दिले. सोनिया गांधी यांच्यासाठी हा अपेक्षेपेक्षा मोठा धक्का होता,” असेही थॉमस यांनी आपल्या पुस्तकात म्हटलेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर शरद पवार यांनी तारिक अन्वर, पीए संगमा यांना सोबत घेत १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून शरद पवार हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता मात्र त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विरोध करत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर शरद पवार हे अध्यक्षपदावर कायम राहणार का? हे स्पष्ट होईल