Sir Creek अर्थात सर खाडी भागात सैन्याची जमवाजमव करून पाकिस्तानने युद्धखोरी केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी नुकताच दिला. यानिमित्ताने भारत-पाकिस्तान संघर्षाचा नवीन केंद्रबिंदू सर खाडी आणि कराची बंदराकडे सरकू लागल्याचे दिसून येते. काश्मीर आणि पंजाब सीमेपासून दूर गुजरातच्या किनाऱ्यावरील या संघर्षबिंदूमुळे भारतीय नौदलावरील जबाबदारी वाढणार आहे.

Sir Creek अर्थात सर खाडी कुठे आहे?

कच्छच्या दलदल परिसरात ९६ किलोमीटर लांबीच्या नदीमुख परिसरास सर खाडी असे संबोधले जाते. ही अरुंद खाडी भारत आणि पाकिस्तानदरम्यान सागरी सीमेलगत आहे. भारताचे गुजरात राज्य आणि पाकिस्तानचा सिंध प्रांत यांच्या मधोमध ही खाडी आहे. सागरी सीमेची व्याख्या पुरेशी स्पष्ट नाही, रेखांकनही वादग्रस्त आहे. त्यामुळे भारतीय प्रदेश नेमका कुठे संपतो नि पाकिस्तानचा कुठे सुरू होतो हा ७८ वर्षे जुना वाद आहे. या खाडीवर नियंत्रण हे या भागातील मासेमारी, नैसर्गिक संसाधने (उदा. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू), तसेच सामरिक दृष्टीने अत्यंत कळीचे ठरते.

वाद काय?

सागरी सीमेचे नेमके रेखांकन कसे असावे यावरून दोन्ही देशांमधील वाद १९४७पासूनचा आहे. स्वातंत्र्यापूर्वी या भागावर अर्थातच ब्रिटिशांचे नियंत्रण होते. स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीनंतर सिंध पाकिस्तानकडे आणि गुजरात भारताकडे आले. या दोन राज्यांपैकी विशेषतः गुजरातच्या कच्छ भागाच्या किनारा भागात खाजण दलदली मोठ्या प्रमाणात आहेत. येथे जवळपास ९६ किमी लांबीच्या खाडीतून नद्यांचे पाणी सागराला मिळते. १९६८मध्ये एका आंतरराष्ट्रीय लवादाने कच्छच्या रणातील भूसीमेचा वाद सोडवला. पण सर खाडीतील सागर सीमावाद अनिर्णितच राहिला. भारताचा आग्रह सागरी सीमा रेखांकनाचा आहे, तर या संपूर्ण टापूवर स्वामित्व कोणाचे असावे हा मुद्दा पाकिस्तानला अधिक महत्त्वाचा वाटतो. संपूर्ण सर खाडीवर पाकिस्तान हक्क सांगतो. यासाठी त्या देशातर्फे १९१४मधील एका ठरावाचा दाखला दिला जातो. या ठरावात सर खाडीच्या पूर्व किनाऱ्यावर सिंध प्रांताची सीमा निश्चित केली गेली, असा पाकिस्तानचा दावा आहे. पण भारताने याच जाहीरनाम्यात खाडीच्या मध्यावर सीमा निश्चित केल्याचा दावा केला. यासाठी १९२५मधील नकाशे, तसेच खाडीच्या प्रवाहाच्या मधोमध असलेल्या खांबांचा दाखला भारताच्या वतीने दिला जातो. पाकिस्तानच्या मते, अशा प्रकारे प्रवाहाची विभागणी नद्यांच्या बाबतीत केली जाते, खाडीच्या बाबतीत तसे करता येत नाही. हा सगळा प्रदेश दलदलीचा असल्यामुळे खाडीचा प्रवाह मार्ग निश्चित नसतो, तर बदलत राहतो. त्यातून वाद आणखी चिघळला आहे.

आर्थिक महत्त्व

सर खाडीचे तूर्तास सामरिक महत्त्व फारसे नाही, पण आर्थिक दृष्ट्या हा अत्यंत मोक्याचा टापू ठरतो. विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करून मक्तेदारी प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने येथे अनुकूल परिस्थिती आहे. या भागात तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे मुबलक प्रमाणात असल्याचा अंदाज आहे. याशिवाय या भागात दोन्ही देशांचे मच्छीमार मासेमारी करतात. सीमेचा अंदाज न आल्यामुळे परस्परांच्या भागात जातात आणि ताब्यात घेतले जातात. या खाडीत पाकिस्तानकडून औद्योगिक रसायने आणि दूषित पाणी सोडले जाते, हा सिंदू जलवाटप कराराचा भंग असल्याचे भारताचे म्हणणे आहे.

राजनाथसिंहांचा इशारा कशासाठी?

ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय नौदलाने कराचीवर मारा करण्याची तयारी ठेवली होती. भारतीय नौदल आजही या भागात सुसज्ज असल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद केले आहे. या भागामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून जमवाजमव सुरू आहे. भारतात दहशतवादी धाडण्याचा नवीन मार्ग पाकिस्तान शोधत असल्याचा भारताला संशय आहे. यामुळे भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दल सावध आहेत. तसेच गुजरात, महाराष्ट्र सागर सीमेवर तटरक्षक दलही सतर्क आहे. कराची बंदरातून कच्छमार्गे भारतात यापूर्वी २६/११ च्या हल्ल्यासाठी दहशतवादी आले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या कुरापती या भागात पुन्हा सुरू होऊ शकतात. याची चाहूल लागल्यामुळेच राजनाथ सिंह यांनी त्या देशास इशारा दिला.