देवेश गोंडाणे

शतकोत्तर वर्षात वाटचाल करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला एक गौरवशाली परंपरा आहे. राज्य आणि देशातील अनेक विद्यापीठांना याच विद्यापीठाने कुलगुरू दिले आहेत. मात्र अलीकडच्या काळात घडलेल्या घटना विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरेला तडे देणाऱ्या ठरल्या आहेत. परीक्षांमधील गोंधळ, कुलगुरूंना न्यायालयात मागावी लागलेली माफी, निकालाला होणारा विलंब, संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनींचा आर्थिक छळ आणि डॉ. धर्मेश धवनकर यांचे ताजे प्रकरण आदी बाबी यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.

विद्यापीठाचा नावलौकिक काय?

नागपूर विद्यापीठाची स्थापना ब्रिटिश काळात १९२३ मध्ये झाली. विदर्भातील हे पहिले विद्यापीठ होय. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्यासह अनेक दिग्गजांनी येथून शिक्षण घेतले. येथील अनेक माजी विद्यार्थी काही विद्यापीठांचे कुलगुरू आहेत, तर काहींनी जागतिक पातळीवर उद्योगक्षेत्रात नाव कमावले आहे.याशिवाय निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे हेसुद्धा नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी होते. लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था (एलआयटी) ही अभियांत्रिकी रसायनशास्त्राचे शिक्षण देणारी देशातील नामवंत संस्थाही विद्यापीठाच्या अखत्यारित आहे. एकूणच या विद्यापीठाचा नावलौकिक देशभर आहे.

विश्लेषण: डोंगर आणि तलावाखालून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती बोगदा कसा आहे? त्याचा फायदा काय होईल?

विद्यापीठ कशामुळे आहे चर्चेत?

मात्र सध्या घोटाळे, गैरप्रकार यामुळे सध्या हे विद्यापीठ चर्चेत आहे. यापैकी प्रमुख म्हणजे परीक्षा घोटाळा. विद्यापीठाने परीक्षेसाठी एमकेसीएल कंपनीला काम दिले. कंपनीने सहा महिने उलटूनही प्रथम सत्राच्या परीक्षांचा निकाल जाहीर न केल्याने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा झाली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कंपनीचे कंत्राट रद्द केले. याशिवाय विनानिविदा लाखो रुपयांच्या विकास कामांचे कंत्राट देण्याच्या कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निर्णयाची शासनाने चौकशी सुरू केली. त्याचप्रमाणे हिंदी विभागाचे प्रमख डॉ. मनोज पांडे यांच्यावर पीएच.डी. करणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी केलेला आर्थिक व मानसिक छळाचा आरोपसुद्धा विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला तडे देणारा ठरला. त्यातील एका प्रकरणात खुद्द कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना न्यायालयासमोर माफी मागावी लागली. आता विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांच्यावरील खंडणीचे प्रकरण गाजत आहे.

वादग्रस्त धवनकर प्रकरण काय आहे?

सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या धवनकर प्रकरणाने विद्यापीठाची उरलेली प्रतिष्ठाही धुळीस मिळाली आहे. धवनकर यांच्या फसवणुकीच्या अनेक तऱ्हा आहेत. त्यांच्याकडे विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी पदाचा प्रभार होता. याचा फायदा ते प्राध्यापकांच्या फसवणुकीसाठी करीत होते. “मी कुलगुरूंच्या निकटवर्तीयांपैकी आहे. तुमच्या विरुद्ध लैंगिक छळाच्या तक्रारी आहेत” असे ते प्राध्यापकांना सांगून भीती दाखवायचे व त्यांच्याकडून पैसे उकळायचे. अशा आशयाची तक्रार विद्यापीठाच्या सात विभागप्रमुखांनी कुलगुरू व राज्यपालांकडे केली. यातच या प्रकरणाचे गांभीर्य किती आहे हे लक्षात येते. प्रथम धवनकर यांनी तक्रारकर्त्यांपैकी एका प्राध्यापकाला गाठून त्यांच्याविरोधातील तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन झाल्याचे व त्यात आपण स्वत: असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर चौकशीचा ससेमिरा टाळायचा असेल तर पाच लाख रुपये समितीतील वकिलांना द्यावे लागतील. मी मध्यस्थी करून प्रकरण मिटवून देतो, असे सांगितले. लैंगिक छळाची कुठलीही तक्रार नसतानाही तक्रारकर्त्यांनी धवनकर यांनी रचलेल्या खोट्या कथानकावर विश्वास ठेवून त्यांना लाखो रुपये दिले. सध्या हे प्रकरण राज्यभर गाजत आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची चौकशी करावी,असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत आहे का?

विद्यापीठाचे शतकोत्तर वर्ष, नागपूरमध्ये होणाऱ्या १०८ व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे विद्यापीठाकडे असलेले यजमानपद, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती असे विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासात भर घालणाऱ्या कार्यक्रमांचे प्रयोजन असतानाच दुसरीकडे धवनकर प्रकरण, परीक्षेतील गोंधळ, पीएच.डी.च्या विद्यार्थिनींनी केलेली छळाची तक्रार आदी घटनांमुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत आहे.

विश्लेषण : धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे; प्रदीर्घकाळ प्रलंबित राहण्यामागचं नेमकं कारण काय?

यासाठी जबाबदार कोण?

विद्यापीठामध्ये वारंवार अशा घटना घडत असतानाही प्रशासनाकडून केवळ चौकशी समिती स्थापन करून प्रकरण मिटवण्यावरच भर दिला जातो, असा आजवरचा इतिहास आहे. डॉ. धवनकर यांच्या प्रकरणातही विद्यापीठाकडे तक्रार होऊनही आठ दिवस कुठलीही कार्यवाही झाली नाही. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उघड केल्यावर धवनकरांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर अद्यापही त्यांनी स्पष्टीकरणही सादर केले नाही. यावरून विद्यापीठावरचा कुलगुरूंचा वचक संपला हेच दिसून येते. काहीही केले तरी आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही, असा संदेश या सर्व प्रकरणातून जात असल्याने विद्यापीठासाठी ही नामुष्कीची बाब ठरते.