युवा खेळाडूंचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करताना पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असे यश संपादन केले. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाच्या या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. कोणत्या खेळाडूंना या मालिकेत छाप पाडली, आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात यातील कोणते चेहरे भारतीय संघात दिसतील, याचा घेतलेला हा आढावा.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताची कामगिरी…

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिकेत खेळण्यास उतरला. संघाचे नेतृत्व ट्वेन्टी-२० प्रारुपांतील दिग्गज फलंदाज सूर्यकुमार यादवकडे सोपविण्यात आली. ऑस्ट्रेलियन संघातही फारसे अनुभवी खेळाडू नसले, तरीही अनेकांना ट्वेन्टी-२० सामने खेळण्याचा दांडगा अनुभव होता. तरीही भारताच्या संघाने त्यांच्यासमोर आव्हान उभे करताना पहिल्या दोन सामन्यांत विजय नोंदवत आघाडी मिळवली. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून विजय मिळवला. मात्र, चौथ्या व पाचव्या सामन्यांत भारताने आपला खेळ उंचावला. विशेष म्हणजे भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात आपला प्रभाव पाडला. त्यामुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ व्यवस्थापनासमोर अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत.

हेही वाचा – विश्लेषण : रिझर्व्ह बँकेकडून दरकपातीचा दिलासा अद्याप दूरच का?

या मालिकेत कोणत्या खेळाडूंनी छाप पाडली?

रोहित शर्मा व शुभमन गिल यांच्या अनुपस्थितीत भारताच्या सलामीची धुरा ऋतुराज गायकवाड व युवा यशस्वी जैस्वाल यांच्या खांद्यावर होती. ऋतुराजने पाच सामन्यांच्या मालिकेत २२३ धावा केल्या आणि मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने या दरम्यान ५८ व १२३ धावांची खेळी केली. यशस्वीनेही १३८ धावांचे योगदान दिले. तर, कर्णधार सूर्यकुमार यादव १४४ धावांसह मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी होता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या रिंकू सिंहने या मालिकेतही निर्णायक योगदान दिले. त्याने पाच सामन्यांत १०५ धावा केल्या. मात्र, संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात त्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली. युवा लेग-स्पिनर रवी बिश्नोईने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने पाच सामन्यांत ९ बळी मिळवत मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवला. ३२ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली. अक्षर पटेलनेही निर्णायक क्षणी ६ गडी बाद करत संघाच्या विजयात योगदान दिले.

कोणते खेळाडू आपल्याला विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसू शकतील?

यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या फलंदाजांची नावे विश्वचषकासाठी आघाडीवर असतील. यशस्वीने आतापर्यंत खेळलेल्या सर्व प्रारुपांत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत १३ ट्वेन्टी-२० सामने खेळले असून त्यात ३७० धावा केल्या आहेत. यामध्ये शतकाचाही समावेश आहे. यशस्वी आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. त्यामुळे आगामी काळात गिलसोबत खेळण्याचा पर्याय म्हणून यशस्वीकडे पाहिले जाऊ शकते. ऋतुराज गायकवाडही आपल्या शैलीपूर्ण खेळासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १९ ट्वेन्टी-२० सामन्यांत ५०० धावा केल्या आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील शतकाचाही समावेश आहे. तसेच, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यालाही सलामीला पर्यायी फलंदाज म्हणून संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. रिंकू सिंहनेही ‘आयपीएल’ सामन्यांमध्ये चमक दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने भारताकडून ट्वेन्टी-२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करत चमकदार कामगिरी केली. त्याने आतापर्यंत १० ट्वेन्टी-२० सामन्यांत १८० धावा केल्या आहे आणि रिंकूला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाल्यास तो संघासाठी विजयवीराची भूमिकाही पार पाडू शकतो. युवा तिलक वर्माने आतापर्यंत खेळलेल्या १३ ट्वेन्टी-२० सामन्यांत २८१ धावा केल्या. तसेच, त्याला वेस्ट इंडिजमध्ये खेळण्याचाही अनुभव आहे. त्याचा फायदा संघाला होऊ शकतो. रवी बिश्नोईनेदेखील नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत कामगिरीने स्वत:चे संघातील महत्त्व पटवून दिले. त्यामुळे बिश्नोईला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक दिसत आहे. आतापर्यंत बिश्नोईने भारताकडून २१ ट्वेन्टी-२० सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ३४ गडी बाद केले आहेत. मुकेश कुमारनेही आपल्या छोटेखानी कारकिर्दीत चमक दाखवली. त्यामुळे त्याच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

हेही वाचा – विश्लेषण : मुंबईसाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार? निःक्षारीकरण प्रकल्प कसा आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी बिश्नोई महत्त्वाचा का?

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या ट्वेन्टी-२० संघात रवी बिश्नोईला स्थान देण्यात आले. यावरून संघ व्यवस्थापन त्याचा ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी विचार करत असल्याचे कळते. भारताला विश्वचषकापूर्वी केवळ सहा ट्वेन्टी-२० सामने खेळण्यास मिळणार आहेत. त्यामुळे निवड समितीने अनुभवी युजवेंद्र चहलच्या जागी सध्यातरी बिश्नोईला पसंती दिल्याचे दिसते आहे. यावर्षी खेळलेल्या ९ ट्वेन्टी-२० सामन्यांत चहलने नऊ गडी बाद केले. तर, बिश्नोईने ११ सामन्यांत १८ बळी मिळवले. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने या मालिकेदरम्यान अनेक कठीण परिस्थितीतून संघाला बाहेर काढत निर्णायक भूमिका पार पाडली. तसेच, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडनेही बिश्नोईचे कौतुक केले. बिश्नोईला कर्णधार सूर्यकुमार यादवचीही चांगली साथ मिळाली. सूर्यकुमारने त्याला ‘पॉवरप्ले’मध्ये गोलंदाजी देण्याचे धाडस दाखवले. त्यानेही आघाडीच्या फलंदाजांना बाद करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला. तसेच, बिश्नोईची गोलंदाजी शैली ही त्याच्या चांगलीच पथ्यावर पडली. तो आपल्या ‘गुगली’ चेंडूंने फलंदाजांची अडचण वाढवतो. त्यामुळे आगामी काळात तो भारतासाठी ट्वेन्टी-२० प्रारुपांत प्रमुख गोलंदाज ठरू शकतो.