-अन्वय सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी अष्टपैलू आणि १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे. ‘बीसीसीआय’ची १८ ऑक्टोबरला निवडणूक होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार (११ ऑक्टोबर) आणि बुधवारचा (१२ ऑक्टोबर) दिवस होता. मंगळवारी बिन्नी यांनी आपला अर्ज दाखल केला असून आता निवडणूक ही केवळ औपचारिकता असेल असे म्हटले जाते आहे. मात्र, ६७ वर्षीय बिन्नी अचानकपणे ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार कसे बनले आणि सौरव गांगुली अध्यक्षपदाच्या शर्यतीतून कसा बाहेर पडला, याचा घेतलेला आढावा.

रॉजर बिन्नी कोण आहेत?

वेगवान गोलंदाज आणि सक्षम फलंदाज अशी ख्याती असणारे बिन्नी हे १९८३च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. त्यांनी या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याची किमया साधली होती. त्यांनी आठ सामन्यांत १८ गडी बाद करत भारताच्या विश्वविजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बिन्नी यांनी २७ कसोटी (४७ बळी व ८३० धावा) आणि ७२ एकदिवसीय (७७ बळी व ६२९ धावा) सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर बिन्नी यांनी अन्य भूमिका बजावल्या. २००० सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे ते प्रशिक्षक होते. तसेच त्यांनी राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम केले. बिन्नी सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेमध्ये (केएससीए) पदाधिकारी आहेत.

‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदासाठी बिन्नी यांचे नाव कसे पुढे आले?

‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणुकांसाठीच्या प्रारूप मतदार यादीत कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (केएससीए) प्रतिनिधी म्हणून रॉजर बिन्नी यांचे नाव देण्यात आले होते. यापूर्वी, ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सचिव संतोष मेनन हे ‘केएससीए’चे प्रतिनिधित्व करायचे. मात्र, आता या यादीत बिन्नी यांचे नाव आल्यानंतर विविध चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर गांगुली आणि सचिव जय शहा यांच्यासह ‘बीसीसीआय’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिल्लीमध्ये बैठका झाल्या. या बैठकांअंती ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदासाठी बिन्नी यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले होते.

गांगुलीची अध्यक्षपदी फेरनिवड का नाही?

दिल्ली येथे झालेल्या ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये अध्यक्ष म्हणून गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली गेली. तसेच ‘बीसीसीआय’शी संलग्न राज्य क्रिकेट संघटनाही गांगुलीच्या कामगिरीबाबत खुश नसल्याचे म्हटले गेले. ‘बीसीसीआय’मध्ये अध्यक्ष म्हणून सलग दोन कार्यकाळ भूषवण्याची प्रथाही नाही. त्यामुळे या बैठकांअंती गांगुलीची अध्यक्षपदी फेरनिवड होणार नाही, हे स्पष्ट झाले होते. परंतु ‘बीसीसीआय’कडून गांगुलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी शिफारस केली जाऊ शकते, असे म्हटले जात होते. मात्र, आता त्याचीही शक्यता अत्यंत कमी आहे. गांगुलीने ‘आयपीएल’चे अध्यक्षपद भूषवण्यासही नकार दिला आहे.

‘बीसीसीआय’मधील अन्य पदांसाठी उमेदवार कोण?

गांगुलीच्या जागी सचिव जय शहा यांची ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी निवड होऊ शकेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आता बिन्नी अध्यक्षपद भूषवण्याची शक्यता असून जय शहा सचिवपदी कायम राहतील, असे म्हटले जाते आहे. तसेच ‘बीसीसीआय’मधील अन्य मुख्य पदासांठी राजीव शुक्ला (उपाध्यक्ष), देवजित सैकिया (सहसचिव), आशीष शेलार (कोषाध्यक्ष) आणि अरुण धुमाळ (आयपीएल अध्यक्ष) हे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे शेलार यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठीही अर्ज दाखल केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roger binny likely to become bcci new president print exp scsg
First published on: 12-10-2022 at 09:56 IST