काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला गेल्या काही वर्षांतील सर्वसामान्य नागरिकांवरचा सर्वांत भीषण ठरला. विशेष म्हणजे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स सध्या भारताच्या दौऱ्यावर असताना तो झाला. यानिमित्ताने अमेरिकी नेते किंवा उच्चपदस्थांचे भारत दौरे आणि काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी यांच्या समीकरणाची अस्वस्थ करणारी पुनरावृत्तीच दिसून आली.
पहलगाम २०२५
अमेरिकेचे अध्यक्ष जे. डी. व्हान्स भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी नवी दिल्लीत २१ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि आता ते जयपूर, आग्रा दौऱ्यावर आहेत. २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता काश्मीर खोऱ्यातील पहलगाम या अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळाच्या वेशीवर असलेल्या बैसरन या कुरणवजा जागेवर दहशतवाद्यांनी नृशंस हल्ला केला आणि २६ जणांचे प्राण घेतले. हा हल्ला लष्करे तैय्यबा संघटनेतून स्थापन झालेल्या रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने घडवून आणला. पर्यटकांवर काश्मीरमध्ये इतका भीषण हल्ला होण्याच्या घटना तशा दुर्मिळ आहेत. हा हल्ला पुलवामात २०१९मध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा सर्वाधिक भीषण हल्ला ठरतो. त्या हल्ल्यात सुरक्षा दलांंना (प्रामुख्याने केंद्रीय राखीव पोलीस दल) लक्ष्य करण्यात आले होते. यावेळी मात्र काश्मीरची जीवनदायिनी असलेल्या पर्यटन व्यवसायावरच दहशतवाद्यांनी हल्ला केला. याचे दूरगामी परिणाम संभवतात.
चित्तीसिंगपुरा २०००
अमेरिकेचे अध्यक्ष तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्याच्या एक दिवस आधी म्हणजे २० मार्च २००० रोजी जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात चित्तीसिंगपुरा या गावातील ३६ शीख ग्रामस्थांची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी गावावर हल्ला करून, तेथील शीख ग्रामस्थांना वेचून बाजूला केले आणि अत्यंत क्रूर प्रकारे त्यांची हत्या केली. क्लिंटन यांचा दौरा २१ ते २५ मार्च या काळात होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा क्लिंटन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतही उपस्थित केला होता. त्याही दौऱ्यात क्लिंटन हे जयपूर आणि आग्रा येथे गेले. अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री मेडेलिन ऑलब्राइट आणि परराष्ट्र उपमंत्री स्ट्रोब तालबोट हे दिल्लीत राहिले होते.
कालूचाक २००२
दोनच वर्षांनंतर अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या सहायक मंत्री ख्रिस्तिना रोका भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्या काळात म्हणजे १४ मे २००२ रोजी तीन दहशतवाद्यांनी हिमाचल प्रदेश परिवहन मंडळाच्या एका बसवर हल्ला केला. ही बस मनालीहून जम्मू येथे जात होती. बसवरील हल्ल्यात सात प्रवासी ठार झाले. या दहशतवाद्यांनी तेथून मग जवळच असलेल्या लष्करी निवासतळावर हल्ला केला. त्यांनी केलेल्या बेछुट गोळीबारात २३ जण ठार झाले. यात १० लहान मुले, आठ महिला आणि पाच लष्करी जवानांचा समावेश होता.
पाक लष्करप्रमुखांची चिथावणी?
काश्मीर हे आमच्या नसानसांत आहे आणि तसे ते राहील, असे विधान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी अलीकडेच केले होते. बऱ्याच दिवसांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखाने अशा प्रकारे विखारी विधान केले. भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी भिन्न धर्म, भिन्न संस्कृती, भिन्न भाषा यांच्या आधारे झाली आहे आणि आमच्या राष्ट्र संस्थापकांनी याच मुद्द्यांवर वेगळ्या देशाची निर्मिती केली, असे मुनीर म्हणाले.