१ जून ही तारीख कदाचित रशियाचे राष्ट्रपती आयुष्यभर विसरणार नाहीत. याच दिवशी युक्रेनने रशियाच्या चार हवाई तळांवर असा काही हल्ला केला की त्यांची सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे हादरली. ऑपरेशन स्पायडर वेब हल्ल्याबाबत युक्रेनने असा दावा केला आहे की, त्यांनी रशियाचे सुमारे सात अब्ज डॉलर्सचं नुकसान केलं आहे. यामध्ये आश्चर्यकारक बाब अशी आहे की, हा हल्ला केवळ साध्या ११७ ड्रोन्सच्या साहाय्याने करण्यात आला आहे. भयंकर असा हल्ला युक्रेनने केला अशी चर्चा होत असली तरी या हल्ल्यामागचे मास्टरमाइंड कोण असा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.
युक्रेनच्या राष्ट्रपतींनी याबाबत असे सांगितले आहे की, त्यांनी या हल्ल्याची तयारी गेल्या १८ महिन्यांपासून केली होती आणि सर्व काही विचारपूर्वक केले गेले आहे. आता एका रशियन ब्लॉगरने असं म्हटलं आहे की, या ड्रोन हल्ल्यामागचा मास्टरमाइंड युक्रेनचा ३७ वर्षीय डीजे आहे. युक्रेनने म्हटले आहे की, स्पायडर वेब ऑपरेशनअंतर्गत ४१ रशियन विमाने नष्ट केली गेली. यामध्ये अणु-सक्षम Tu-95 आणि Tu-22M या स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सचा समावेश आहे.
कोण आहे हे ऑपरेशन स्पायडर वेब हल्ल्याचे मास्टरमाइंड जोडपे
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, रशियातील युद्धासंदर्भात माहिती देणाऱ्या ब्लॉगर्सने या हल्ल्यामागे ३७ वर्षीय युक्रेनियन डीजे आर्टेम टिमोफिव्ह याचे नाव घेतले आहे. त्यांनी याबाबत असा दावा केला आहे की, आर्टेमने अशा एक ट्रकचा वापर केला, ज्यामुळे ड्रोन लपलेले होते. घरांसाठी लाकूड नेण्याच्या बहाण्याने हे ट्रक रशियामध्ये नेण्यात आले. आर्टेमची पत्नी एकटेरिना टिमोफिव्ह हीदेखील या कटात सहभागी असल्याचे या ब्लॉगर्सने म्हटले आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याचे सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या टिमोफिव्हचा रशियाने आता शोध सुरू केला आहे, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
हल्ल्यासाठी आर्टेमच्या ट्रकचा वापर
आर्टेम हा काही वर्षांपूर्वी रशियातील चेल्याबिन्स्क इथे गेला होता. तिथे त्याने वाहतूक व्यवसाय सुरू केला होता. याच व्यवसायाचा वापर त्याने या कटात केल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे त्याची पत्नी स्वत:ला जादूगर म्हणवते आणि ती टॅटू कलाकार आणि स्टायलिस्ट म्हणून काम करत होती. रशियन माध्यमांच्या माहितीनुसार, ती एक कामुक लेखिका म्हणूनही प्रसिद्ध होती. ऑपरेशन स्पायडर वेबमध्ये तिने तिच्या पतीला मदत केल्याचे मानले जाते. युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने १८ महिने या हल्ल्याची योजना आखली होती. ड्रोन कंटेनरमध्ये लपवून ट्रकद्वारे रशियन विमानतळांवर नेण्यात आले होते. या कंटेनरचे छत रिमोट पद्धतीने उघडण्यात आले आणि नंतर ड्रोनने उड्डाण केले. या ड्रोनने बेलाया, डायघिलेव्हो, इवानोवो आणि ओलेन्या विमानतळांवर हल्ला केला. यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या गुप्तचर संस्थेच्या एफएसबीच्या कार्यालयाशेजारीच या ड्रोनसाठीचे कमांड सेंटर असल्याचे उघड केले आहे.
रशियाने असा आरोप केला आहे की, चेल्याबिन्स्कमधील ट्रक कंपनी टिमोफिव्हची होती. रशियन लॉरी चालकांसाठी लांब पल्ल्याचे अंतर पार करणे दुर्मीळ नसल्यामुळे त्यांचा व्यवसाय या हल्ल्यासाठी एक योग्य पर्याय होता. टिमोफिव्हचे ट्रक मुर्मन्स्कमधील ओलेन्या एअरबेस, सायबेरियातील इर्कुत्स्क प्रदेशातील बेलाया एअरबेस आणि चेल्याबिन्स्कपासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या डायघिलेव्ह आणि इव्हानोव्ह बेसवर नेले जात होते. डेली मेलच्या वृत्तानुसार, आर्टेमने रशियामधील विविध ठिकाणी लाकडी वस्तू वाहून नेण्यासाठी चार जड मालवाहू चालकांना कामावर ठेवले होते. यापैकी दोन चालकांनी तपासकर्त्यांना सांगितले की, आर्टेम नावाच्या एका माणसाने त्यांना हे सामान वाहून नेण्यास सांगितले. एक चालक मुर्मन्स्क प्रदेशात गेला आणि दुसरा इर्कुत्स्कला गेला. जेव्हा चालक चार रशियन एअरबेसजवळ होते, तेव्हा त्यांना रशियन सिम कार्ड आणि रशियन टेलिकम्युनिकेशन नेटवर्क वापरून एका अज्ञात नंबरवरून कॉल आले. त्यांना ट्रक कुठे थांबवायचे हे सांगण्यात आले, असे वृत्त मेट्रो. यूके या माध्यमाने दिले. रशियन युद्ध विमानांवर हल्ला करण्यासाठी ट्रकमधून एकाच वेळी शेकडो स्फोटकांनी भरलेले ड्रोन उडाले आणि रशियाच्या ३४ टक्के स्ट्रॅटेजिक क्रूझ क्षेपणास्त्र वाहकांना नष्ट केले.
संशयित जोडप्याचा शोध सुरू
रशिया या युक्रेनियन जोडप्याचा शोध घेत आहे. “आर्टेम आता इर्कुत्स्क प्रदेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात संशयित आहे,” असे रशियन ऑनलाइन वृत्त स्रोत रीडोव्हकाने दिले. “त्याच्या नावावर चार लॉरी नोंदणीकृत होत्या आणि त्यापैकी एक ड्रोनचा स्रोत होती, ज्यामार्फत रशियन हवाई तळावर हल्ला केला.” एकटेरिना दोन आठवड्यांपासून ऑनलाइन आली नाही आणि तेव्हापासून तिने तिचे नेहमीचे सक्रिय सोशल मीडिया अकाउंटही सुरू ठेवलेले नाही. तिच्या पतीला जवळजवळ एक आठवड्यापूर्वी चेल्याबिन्स्क इथल्या अपार्टमेंटमध्ये शेवटचे पाहिले गेले होते, त्यामुळे हे दोघंही पती-पत्नी आता कुठे आहेत याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.