देशातील मुख्य पर्यटन ठिकाणांपैकी एक म्हणजे जम्मू-काश्मीर. या ठिकाणी देशाच्या विविध भागांतून आणि परदेशांतून पर्यटक येतात. ते काश्मीर खोऱ्यातील निसर्गसौंदर्याचे साक्षीदार होतात आणि येथील बर्फवृष्टीचा आनंद घेतात. मात्र, यंदा या काश्मीरच्या पर्यटनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे जानेवारीचा पंधरवडा उलटूनही काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झालेली नाही. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात गुलमर्गला एकूण ९५ हजार ९८९ पर्यटकांनी भेट दिली होती. त्यापैकी ५४७ जण विदेशी पर्यटक होते. मात्र, यंदा ही संख्या ६० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी न होण्याची नेमकी कारणे काय आहेत? आणि त्याचा काश्मीरवर कसा परिणाम होईल, जाणून घेऊ.
काश्मीरमध्ये कोरडा हिवाळा
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये हिवाळ्यातील पाऊस हा प्रामुख्याने बर्फवृष्टीच्या स्वरूपात होतो. साधारणपणे या प्रदेशात वर्षातली पहिली बर्फवृष्टी डिसेंबरच्या पहिल्या १५ दिवसांत होते आणि पुढे ती संपूर्ण जानेवारी महिन्यात कायम राहते. मात्र, यंदा काश्मीरमधील हिवाळा कोरडाच राहिला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये डिसेंबर महिन्यात २० टक्के; तर जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांपर्यंत शून्य टक्का बर्फवृष्टीची नोंद झाली आहे. लडाखबाबत बोलायचे झाल्यास डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात लडाखमध्ये एकदाही बर्फवृष्टी झालेली नाही.
हेही वाचा – विश्लेषणः भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जागतिक गुंतवणूकदारांना ‘या’ ३ मुख्य चिंता; कसा मार्ग काढणार?
काश्मीरमध्ये बर्फवृष्टी न होण्याची कारणे
काश्मीरमध्ये होणारी बर्फवृष्टी ही केवळ पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही, तर पर्यावरण, हिवाळी पिके, पाणी व्यवस्थापन व स्थानिक अर्थव्यवस्था या सर्व दृष्टींनेही महत्त्वाची आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीत घट होताना दिसून आली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, तापमानात झालेली वाढ व प्रशांत महासागरातील एल निनोची घटना, अशी याची मुख्यत: तीन कारणे असू शकतात
वेस्टर्न डिस्टर्बन्सेस : जेव्हा देशातील हवामान बदलते तेव्हा भूमध्य समुद्र, कॅस्पियन व लाल समुद्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या दाबामुळे समुद्रातल्या आर्द्रतेसोबत हवा फिरू लागते. वाऱ्याची दिशा असेल, त्याच दिशेला हा डिस्टर्बन्स निर्माण होतो. ही दिशा समजून घेऊन, हवामान शास्त्रज्ञ वेस्टर्न डिस्टर्बन्सचा अंदाज वर्तवतात.
हिमालयीन प्रदेशात, तसेच उत्तर व वायव्य भारतात हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी ही मुख्यत्वे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे होते. दरवर्षी हिवाळ्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सरासरी चार ते सहा घटना अपेक्षित असतात. मात्र, यंदा डिसेंबर महिन्यात केवळ एक घटना घडली. त्यामुळे या भागात म्हणावी तशी बर्फवृष्टी झालेली नाही.
या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, हवामान शास्त्रज्ञ तथा मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझमचे संचालक एपी डिमरी म्हणाले, “मागील काही वर्षांत वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या घटनांमध्ये घट होत चालली आहे. हिवाळ्यात साधारणपणे वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या पाच किंवा सहा घटना अपेक्षित असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत केवळ दोन ते तीन घटना घडल्या आहेत. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात कमी बर्षवृष्टी बघायला मिळाली.”
वाढते तापमान : पुढे बोलताना डिमरी म्हणाले, ”बर्फवृष्टी कमी होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे या भागातील वाढते तापमान. मागील काही दिवसांत श्रीनगरमधील तापमान बघता, त्याची तुलना दिल्लीच्या तापमानाशी करता येईल. अनेकदा तर श्रीनगरचे तापमान दिल्लीपेक्षा जास्त असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे काश्मीरमधील घटत्या बर्फवृष्टीला वाढते तापमानही कारणीभूत आहे.”
अल निनो : मागील दशकाचा विचार केला, तर २०१५, २०१८ व २०२२ ही काही वर्षे आहेत; ज्या वर्षी अल निनोची घटना घडली आहे. या वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमधील हिवाळा हा तुलनेने कोरडा राहिला आहे, तसेच कमी बर्फवृष्टीची नोंद झाली आहे. या संदर्भात बोलताना, श्रीनगर येथील हवामान विभागाचे प्रमुख मुख्तार अहमद म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून प्रशांत महासागरात एल निनो कायम आहे. पुढचे काही दिवस अल निनो कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम जागतिक हवामानावरही दिसून येतो आहे. अल निनोचा परिणाम कदाचित उत्तर भारतातील बर्फवृष्टीवरही होण्याची शक्यता आहे.”
काश्मीरमधील कमी बर्फवृष्टीचे परिणाम
काश्मीरमधील कमी बर्फवृष्टीचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम जाणवू शकतात. दीर्घकालीन परिणामांचा विचार केला, तर कमी बर्फवृष्टीमुळे काश्मीरमध्ये जलविद्युत निर्मितीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. तसेच कमी बर्फवृष्टीने काश्मीरमधील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय कमी बर्फवृष्टीमुळे येथील भूजल पातळी खाली जाऊ शकते.
अल्पकालीन परिणामांबाबत बोलायचे झाल्यास, कमी बर्फवृष्टीमुळे या भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम पिकांवरही होऊ शकतो. त्यामुळे येथील पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये होणारी बर्फवृष्टी ही बागायती पिकांसाठीही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. परिणामत: कमी बर्फवृष्टीमुळे यंदा सफरचंद आणि केशरच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच याचा परिणाम काश्मीरमधील अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.