ब्रिटनमधील ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने दिलेल्या एका वृत्तामुळे भारतात खळबळ उडाली आहे. अपोलो हॉस्पिटल ‘कॅश फॉर किडनी’ रॅकेटमध्ये कथितकपणे गुंतलेले असल्याचा दावा या वृत्तपत्रात करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये म्यानमारमधील गरीब लोकांना त्यांचे मूत्रपिंड विकण्यासाठी आमिष दाखवले जात असल्याचा दावा टेलिग्राफ या वृत्तपत्राने केला आहे. अपोलो हॉस्पिटलने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. “या वृत्तपत्रात करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि पूर्णपणे खोटे आहेत. तसेच हे आरोप चुकीच्या माहितीवर आधारलेले आहे असून दिशाभूल करणारे आहेत,” असे स्पष्टीकरण अपोलो हॉस्पिटलने दिलेले आहे. याच पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमके काय आहे? हे जाणून घेऊ या….

‘कॅश फॉर किडनी’ रॅकेट काय आहे?

‘द टेलिग्राफ’ वृत्तपत्रातील वृत्तानुसार म्यानमारमधील ग्रामीण भागातील तरुण आणि गरीब लोक दिल्लीतील अपोलो रुग्णालयात येतात. जगभरातील श्रीमंत रुग्णांना मूत्रपिंड देण्याच्या बदल्यात या गरीब लोकांना पैसे दिले जातात. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केले जातात तसेच मूत्रपिंड देणारी व्यक्ती ही रुग्णाची नातेवाईक आहे हे भासवण्यासाठी फोटो काढले जातात. हे फोटो संबंधित रुग्णाच्या कुटुंबाचे आहेत, असे सांगितले जाते. भारत तसेच म्यानमारच्या कायद्यानुसार अनोळखी व्यक्ती ही एखाद्या रुग्णाला थेट अवयवदान करू शकत नाही.

रुग्णांना अवयव दान करणारे कसे शोधले जातात?

टेलिग्राफच्या वृत्तानुसार अपोलो रुग्णालयातील रॅकेट उघडे पाडण्यासाठी त्यांच्या एका वार्ताहाराने आजारी रुग्णाचा नातेवाईक असल्याचे दाखवले. संबंधित रुग्णाला लवकरात लवकर मूत्रपिंडाची गरज असून त्याचे कुटुंबीय मूत्रपिंड देऊ शकत नाहीत, असे सांगण्यात आहे. या रिपोर्टरने अपोलो रुग्णालयाच्या म्यानमारमधील कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर या कार्यालयातून एक अनोळखी व्यक्ती मूत्रपिंड देण्यासाठी आणली जाईल, असे या वार्ताहाराला सांगण्यात आले. अपोलो रुग्णालयाच्या एका एजेंटने वार्ताहाराचा म्यानमारमधील एका २७ वर्षीय तरुणाशी संपर्क करुन दिला. मी गरीब आहे. माझे पालक आर्थिक दृष्टीने चांगल्या स्थितीत नाहीत, असे या तरुणाने वार्ताहाराला सांगितले. वार्ताहाराने सांगितल्यानुसार कोणत्या व्यक्तीकडून मूत्रपिंड हवे आहे? याची निवड करण्याची परवानगी रुग्णांना दिली जाते.

एका मूत्रपिंडासाठी किती रुपये दिले जातात?

या वार्ताहाराला मूत्रपिंडासाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती काही कागदपत्रांच्या माध्यमातून देण्यात आली. टेलिग्राफच्या वृत्तानुसार वंशावळ काढण्यासाठी २२ हजार रुपये, विमानखर्च २१ हजार रुपये, वैद्यकीय मंडळाच्या नोंदणीसाठी १६ हजार ७०० रुपये लागतील, असे या कागदपत्रांत नमूद करण्यात आले होते. रुग्णाला एकूण १ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा खर्च येईल, असे या कागदत्रांत नमूद होते. यामध्ये मूत्रपिंडाचे दान करणाऱ्याला दिल्या जाणाऱ्या ७० ते ८० लाख रुपयांचा उल्लेख नव्हता, असा दावा द टेलिग्राफने केला आहे.

प्रक्रिया कशी पार पडते?

संबंधित रुग्णाने मूत्रपिंडासाठीची रोख रक्कम दिल्यास मूत्रपिंड देणारी व्यक्ती म्यानमारमधून भारतात पाठवली जाते. त्यानंतर मूत्रपिंडाचे दान करणारी व्यक्ती आणि रुग्ण ट्रान्सप्लान्ट ऑथोरायझेशन समितीपुढे मुलाखतीसाठी उभे राहतात. रुग्ण तसेच मूत्रपिंडदाता यांच्यात काय नातं आहे, हे तपासण्याची जबाबदारी या समितीवर असते. या समितीत केंद्र आणि राज्य सरकारचा एक अधिकारी असतो. तसेच दोन निवृत्त आएएस अधिकारी असतात. यात दोन रुग्णालय सल्लागारांचाही समावेश असतो. अपोलो रुग्णालयाच्या म्यानमारमधील एजंटच्या हवाल्यानुसार ही समिती फक्त नावालाच असते. या समितीकडून मूत्रपिंडदाता तसेच रुग्णातील नाते खरे आहे का? हे तपासण्यासाठी फक्त वरवरचे प्रश्न विचारले जातात, असे टेलिग्राफच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

रुग्ण आणि मूत्रपिंड देणारे एकमेकांचे नातेवाईक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी बनावट वंशावळ, घराची कागदपत्रे, लग्नाचे प्रमाणपत्र तसेच बनावट फोटो तयार केले जातात, असाही आरोप टेलिग्राफमध्ये करण्यात आला आहे.

डॉक्टरांचा या रॅकेटमध्ये समावेश आहे का?

टेलिग्राफने आपल्या वृत्तात डॉ. संदीप गुलेरिया या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांनी ब्रिटनमध्ये प्रशिक्षण घेतलेले असून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत गुलेरिया यांचा सहभाग होता, असे रुग्ण आणि एजन्टने टेलिग्राफच्या वार्ताहाराला सांगितलेले आहे. याच वृत्तात डेक्कन हेराल्ड या वृत्तपत्रातील २०१६ सालच्या एका वृत्ताचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी अपोलो रुग्णालयावर अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत का?

याआधी २०१६ साली अपोलोच्या इंद्रप्रस्थ रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना अशाच कथित मूत्रपिंडाच्या रॅकेटमध्ये अटक करण्यात आली होती. या दोन कर्मचाऱ्यांसह मूत्रपिंड देणारी व्यक्ती, एजन्ट यांनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींबाबतचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही.