निमा पाटील

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. त्यापूर्वी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन मुख्य पक्ष तयारीला लागले आहेत. अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातच ‘नो लेबल्स’ हा मध्यममार्गी पक्षदेखील निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याच्या विचारात आहे. ही चळवळ काय आहे आणि त्यांनी निवडणूक लढवली तर त्याचा काय परिणाम होईल हे पाहू या.

‘नो लेबल्स’ चळवळ काय आहे?

‘नो लेबल्स’ हा अमेरिकेतील राजकीय पक्ष नाही, तर ना-नफा राजकीय संस्था आहे. अमेरिकेतील सध्याचे दोन्ही पक्ष म्हणजे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक हे अनुक्रमे डावीकडे आणि उजवीकडे झुकलेले म्हणून ओळखले जातात. मात्र, अमेरिकी जनतेला या दोन्ही पक्षांमधील मध्यममार्ग हवा आहे आणि ही गरज आपण भरून काढू शकतो असा ‘नो लेबल्स’चा दावा आहे. जो कनिंगहॅम हे ‘नो लेबल्स’चे राष्ट्रीय संचालक आहेत. विशेष म्हणजे ते डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी काँग्रेस सदस्य आहेत.

‘नो लेबल्स’ २०२४ च्या निवडणुकीची तयारी करत आहे का?

अमेरिकेत ‘नो लेबल्स’ ही चळवळ २०१० पासून सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी केवळ राजकीय पर्याय देण्याचा विचार करून चळवळ सुरू ठेवली. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. आता मात्र, २०२४ ची निवडणूक त्यांनी अधिक गांभीर्याने घेतल्याचे दिसते. या निवडणुकीसाठी सात कोटी डॉलरचा निधी उभारण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातून आपल्याला मते मिळावीत यावर त्यांचा भर आहे. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक या दोन्ही पक्षांना ताकदवान पर्याय म्हणून मतदारांनी आपला विचार करावा यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

‘नो लेबल्स’ची विचारसरणी काय आहे?

आपली संस्था डाव्या आणि उजव्या अशा दोन टोकांच्या विचारांना कंटाळलेल्या मतदारांसाठी आहे असा दावा या संस्थेच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे. सध्या देशातील सुमारे ५० टक्के मतदार डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक पक्षामध्ये विभागलेले आहेत. तर उरलेले ५० टक्के मतदार स्वतंत्र मताचे आहेत. अशा मतदारांसाठी आपली संस्था योग्य पर्याय आहे असे ‘नो लेबल्स’चे म्हणणे आहे. अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही याचा अद्याप निर्णय झालेला नाही पण त्यासाठी आमची तयारी सुरू आहे असे जो कनिंगहॅम यांनी सांगितले आहे. मात्र, बहुसंख्य उमदेवारांना पुन्हा एकदा जो बायडेन किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी एक पर्याय नको आहे असा त्यांचा दावा आहे.

दिवसेंदिवस ChatGPT अकार्यक्षम? नेमकं काय घडतंय? वाचा….

‘नो लेबल्स’बद्दल समर्थक आणि विरोधकांचे काय मत आहे?

‘नो लेबल्स’च्या समर्थकांच्या मते, ही चळवळ डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक या दोन्ही पक्षांना राजकीय पटलाच्या डाव्या आणि उजव्या स्थानावरून मध्यम मार्गावर आणू शकते. विरोधकांना हा दावा मान्य नाही. त्यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेच्या निवडणुकीत स्वतःला मध्यममार्गी म्हणवणारा पर्याय रिपब्लिकन पक्षालाच फायद्याचा ठरेल. जर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिक पक्षाची उमेदवारी मिळाली तर ‘नो लेबल्स’च्या उमेदवारीमुळे ट्रम्प यांना २०२४ ची निवडणूक जिंकणे सोपे होईल.

कनिंगहॅम यांचे यावर काय म्हणणे आहे?

खुद्द जो कनिंगहॅम यांना ही टीका मान्य नाही. आपण डेमोक्रॅटिक पक्षाचे लोकप्रतिनिधी होतो याकडे ते लक्ष वेधून घेतात. आम्ही भरपूर पैसा खर्च करत आहोत, त्यामुळे आम्हाला निवडणुकीचा निकाल बिघडवण्यात रस नाही असे ते म्हणतात. ‘नो लेबल्स’ला डेमोक्रॅटिक पक्षाची मते मिळतील तशीच ती रिपब्लिक पक्षाचीही मिळतील अशी त्यांनी खात्री आहे. तसेच ट्रम्प यांना पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी मदत करण्यातही रस नाही असे ते त्यांचे म्हणणे आहे. दुसरे म्हणजे नोव्हेंबर २०२४ पर्यंत आमचे काही कार्यक्रम ठरलेले आहेत. त्यावरच पुढील निर्णय घेतला जाईल असे ते सूचित करतात.

‘नो लेबल्स’ निवडणूक लढवण्याचा निर्णय केव्हा घेईल?

जो कनिंगहॅम यांनी या निवडणुकीसाठी दोन निकष ठेवले आहेत. एक म्हणजे दोन्ही पक्षांचे अध्यक्षपदासाठीचे उमदेवार बहुसंख्य अमेरिकन मतदारांच्या पूर्ण नापसंतीचे असावेत. दुसरे म्हणजे, नो लेबल्सच्या उमेदवाराला ‘इलेक्टोरल कॉलेज’ची पसंती मिळण्याची खात्री असावी. जर देशाचा कल अचानक बदलला आणि मतदारांनी केवळ द्विपक्षीय पद्धतीलाच पसंती देण्याचे ठरवले तर मात्र ‘नो लेबल्स’ माघार घेईल. थोडक्यात निवडणुकीमध्ये विजयाची थोडीफार तरी शक्यता दिसत असल्याशिवाय ‘नो लेबल्स’ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. स्पष्ट पराभव समोर दिसत असेल तर त्यांना निवडणूक लढवण्यात रस नाही.

विश्लेषण: भारत-चीनदरम्यान ‘स्टेपल्ड व्हिसा’चा वाद काय? 

‘नो लेबल्स’वर काय टीका होते?

‘नो लेबल्स’ संस्थेवर काही मुद्द्यांवर टीका होते. एकतर त्यांच्या सभासदांमध्ये सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत दिसून येत नाही. दुसरे म्हणजे काही समस्यांवर त्यांनी सुचवलेले उपाय तकलादू आहेत. त्यात गांभीर्याचा अभाव आहे. ‘नो लेबल्स’ला ही टीका मान्य आहे. कनिंगहॅम यांच्या मते कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये संपूर्ण मतैक्य शक्य नाही, त्यामुळे ‘तुम्ही आमच्याशी ७० टक्के सहमत असाल तर आम्हाला मत द्या आणि १०० टक्के सहमत असेल तर तुम्हाला मानसोपचारांची गरज आहे’ असे ते गमतीने सुचवतात.

Story img Loader