scorecardresearch

विश्लेषण: नुपूर शर्मांनी केलेल्या वक्तव्यानंतर उदयपूर, अमरावतीसारख्या हत्याकांडासाठी कारणीभूत ठरलेली ईश्वरनिंदा म्हणजे काय?

मागील काही दिवसात ईश्वरनिंदा किंवा धार्मिक कारणातून हत्या झाल्याच्या काही घटना भारतात घडल्या आहेत.

nupur sharma blasphemy
भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा…

मागील काही दिवसात ईश्वरनिंदा किंवा धार्मिक कारणातून हत्या झाल्याच्या काही घटना भारतात घडल्या आहेत. भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी केली होती. त्यानंतर उदयपूर येथील कन्हैय्यालाल नावाच्या व्यक्तीने नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. यातून कन्हैय्या लाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. तर महाराष्ट्रातील अमरावती याठिकाणी देखील असाच प्रकार घडला, येथील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली.

अन्य एका घटनेत अहमदाबाद येथील किशन नावाच्या व्यक्तीने कृष्ण हा पैगंबरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचं म्हटलं होतं. त्याचीही हत्या करण्यात आली. शहर, व्यक्ती आणि ईश्वरनिंदेच्या पद्धती बदलत गेल्या, पण त्यांचा शेवट हा हत्येत झाला आहे. ईश्वरनिंदेच्या तळाशी गेल्यावर लक्षात येईल, की हे फक्त एका धर्मापुरतं मर्यादित नाही. अशा हत्या इतर धर्मात देखील झाल्या असून ईश्वरनिंदेला २५०० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. चला तर मग जाणून घेऊया… ईश्वरनिंदेची उत्पत्ती, इतिहास आणि वेगवेगळ्या धर्मांमधील त्याचे अस्तित्व…

दैनिक भास्करने दिलेल्या संदर्भानुसार, ईश्वरनिंदा संबंधित कथा-कहाण्या बायबलमध्ये वाचायला मिळतात. बायबलचे दोन भाग पडतात, एक म्हणजे ‘ओल्ड टेस्टामेंट’ आणि दुसरं म्हणजे ‘न्यू टेस्टामेंट’. न्यू टेस्टामेंटची सुरुवात जीसस क्राइस्ट यांच्या जन्मापासून सुरू होते. २००० वर्षांपूर्वी जीसस क्राइस्ट यांच्यावर देखील ईश्वरनिंदा केल्याचे आरोप होते. याच कारणातून त्यांना सुळावर चढवण्यात आलं. जीसस क्राइस्ट स्वत:ला ईश्वराचा मुलगा म्हणायचे, हीच बाब ईश्वरनिंदा असल्याच ठरवून यहुद्यांनी त्यांना सुळावर चढवलं.

काही तज्ज्ञांच्या मते, धर्माची जडणघडण होत असताना, श्रद्धेला कायम राखण्यासाठी ईश्वरनिंदेची सुरुवात झाली. ईश्वरनिंदेला इंग्रजीत “ब्लास्फेमी” (Blasphemy) म्हटलं जातं. हा ग्रीक शब्द असून याचा अर्थ ‘मी निंदा करतो’ असा होतो. काही धर्म किंवा धार्मिक आचरणानुसार ईश्वरनिंदा याचा अर्थ धार्मिक गुरू, ग्रंथ किंवा वास्तूचा अवमान करणं होय. NALSAR विद्यापिठाचे उप कुलगुरू फैजान मुस्तफा यांच्या मते १३ व्या शतकात युरोपात ईश्वरनिंदेचं नवीन रुप समोर आलं. धर्मनिरपेक्ष राज्याला आव्हान देणं ईश्वरनिंदा मानली जाऊ लागली.

१७ व्या शतकात इंग्लंडमधील रहिवासी असणाऱ्या जॉन टेलर याने जीसस क्राइस्ट यांच्याविरोधात अवमानकारक शब्द वापरले होते. तेव्हा इंग्लंडचे तत्कालीन सरन्यायाधीश मॅथ्यू हेल यांनी या कृत्याला राष्ट्रद्रोह म्हटलं होतं. तर १६६९ साली स्वीडीश रॉयल नेव्हीच्या दोन जवानांनी “माझ्या हृदयात जीसस वसतो” या काव्यपंक्तीमध्ये बदल करून “माझ्या हृदयात राक्षस वसतो” असं केलं होतं. त्यामुळे दोन्ही जवानांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

इस्लाम धर्मात ईश्वरनिंदेचा उगम १०५० साली झाला. तेव्हाच्या सुन्नी धार्मिक गुरूंनी राजांच्या साथीनं ईश्वरनिंदा करणाऱ्यांसाठी कायदे तयार करायला सुरुवात केली. मुस्लीम धर्मगुरू अबू हामिद मुहम्मद इब्न मुहम्मद अल गजाली यांनी इस्लामध्ये कट्टरतावाद पेरला. ईश्वरनिंदा करणाऱ्यास मृत्यूदंड देणं त्यांनी कायदेशीर ठरवलं. त्यानंतर १२ व्या शतकापर्यंत कट्टरतावाद आणखी वाढत गेला.

दुसरीकडे, पद्मभूषण पुरस्कार विजेते मौलाना वहीदुद्दीन खान यांच्या मते, प्रत्येक कालखंडात लोकांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर नकारात्मक टीका केली. पण अशा लोकांना मारहाण करण्याबाबत किंवा त्यांना शिक्षा करण्याबाबत कुराणमध्ये कुठेही लिहिलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण ११ दशकानंतर मुस्लीम धर्मगुरुंनी आपापल्या पद्धतीने ईश्वरनिंदेची व्याख्या करायला सुरुवात केली. तसेच ईश्वरनिंदा करणाऱ्याला शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. तर हिंदू धर्मात कुठेही ईश्वरनिंदेचा उल्लेख आढळत नाही. हिंदू धर्माला इतिहासात सहिष्णू धर्म मानलं गेलं आहे.

ईश्वरनिंदेबाबत भारतात विशेष कायदे नाहीत. १८६० साली इंग्रजांनी ईश्वरनिंदा संबंधित तीन कायदे आणले होते. त्यानंतर १९२७ साली कलम २९५ मध्ये उप कलम २९५ (अ) जोडण्यात आलं, त्यानुसार धार्मिक भावना दुखावणं गुन्हा मानला जावू लागला. असं असलं तरी भारतीय संविधानातील कलम १९ (अ) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आला आहे. हे कलम ईश्वरनिंदेच्या परस्परविरोधी कलम आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is the blasphemy that led to murders like udaipur and amravati after nupur sharma statement on prophet mohammed rmm